
पुणे, दि. 24 – दैनंदिन व्यवहारात नागरी सहकारी बँकांनी बदलत्या काळानुसार सर्वंकष बदल करणे गरजेचे आहे. आजच्या स्पर्धेच्या युगात गुंतवणूकदारांबरोबरच कर्जदार देखील चिकित्सक झाला आहे, त्यामुळे विश्वासार्हता जपण्याबरोबरच बँकिंग साक्षरता वाढवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन रिझर्व्ह बँक आणि नाबार्डचे संचालक सतीश मराठे यांनी आज येथे व्यक्त केले.
सहकार सुगंध आयोजित “बदलते बँकिंग” या परिसंवादात ते बोलत होते. जागतिक पुस्तक दिनाचे औचित्य साधून ज्येष्ठ बँकिंग तज्ज्ञ गणेश निमकर लिखित “बँकिंग साक्षरता” या पुस्तकाचे प्रकाशन यावेळी करण्यात आले. त्यानिमित्ताने हा परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. यावेळी सहकार भारतीचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. उदय जोशी, राज्य सहकार निवडणूक प्राधिकरणाचे आयुक्त अनिल कवडे, बुलडाणा क्रेडिट सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष राधेश्याम चांडक, नॅफकबचे उपाध्यक्ष मिलिंद काळे, महाराष्ट्र अर्बन को-ऑप बँक्स फेडरेशनचे अध्यक्ष अजय ब्रह्मेचा, सहकार भारतीचे प्रदेश महामंत्री विवेक जुगादे, सहकार सुगंध मासिकाचे संपादक भालचंद्र कुलकर्णी आणि पुस्तकाचे लेखक गणेश निमकर व्यासपीठावर उपस्थित होते. राज्याचे सहकार आयुक्त व निबंधक दीपक तावरे आणि राज्य सहकारी बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर यांनी दृकश्राव्य माध्यमातून यावेळी शुभेच्छा दिल्या.
परिसंवादात बोलतांना मराठे पुढे म्हणाले की, सध्याच्या स्थितीमध्ये देशातील किमान 50 टक्के जनता बँकिंग क्षेत्रापासून दूर आहे. त्याचबरोबर आर्थिक साक्षरता वाढावण्याची गरज आहे. एकीकडे गुंतवणूकदारांची संख्या वाढत आहे, कर्ज व्यवहार देखील वाढत आहेत, तर दुसरीकडे व्याजदर दिवसेंदिवस कमी होत आहेत. या बदलत्या बँकिंगच्या दृष्टीने ग्राहकांमध्ये बँकिंग साक्षरता होणे आवश्यक असून त्यासाठी हे पुस्तक उपयुक्त ठरणारे आहे.
Leave a Reply