Category: Latest News

राज्यातील सर्व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांमध्ये यापुढे ७० टक्के जागा स्थानिकांसाठी राखीव ठेवणे आणि नोकरभरती प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने राबविणे असे दोन महत्त्वपूर्ण निर्णय शासनाने घेतले आहेत.

  • रिझर्व्ह बँकेच्या सहकार क्षेत्राला चालना देणाऱ्या निर्णयांचे सहकार भारतीकडून स्वागत

    दि. ५ ऑगस्ट – भारतीय रिझर्व्ह बँकेचे (आरबीआय) गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी जाहीर केलेल्या आर्थिक धोरण निवेदनाचे तसेच सहकार क्षेत्राच्या बळकटीकरणासाठी करण्यात आलेल्या महत्त्वपूर्ण घोषणांचे सहकार भारती स्वागत करत असल्याची माहिती राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. उदय जोशी यांनी आज येथे दिली.

    आरबीआयने आता नवीन नागरी सहकारी बँकांना परवाने देण्याचा निर्णय घेतला आहे. सन २००३ नंतर प्रथमच हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असून, तो सहकार क्षेत्रासाठी अत्यंत दिलासादायक असल्याचे सहकार भारतीचे मत आहे.

    निमशहरी व ग्रामीण भागातील पतपुरवठ्यातील तूट भरून काढण्यासाठी नवीन नागरी सहकारी बँकांची आवश्यकता सातत्याने अधोरेखित करण्यात येत होती. सहकार भारतीनेही नवीन सहकारी बँका स्थापन करण्यासाठी परवाने देण्याची मागणी विविध स्तरांवर सातत्याने केली होती. आरबीआयचा हा निर्णय देशातील नागरी सहकारी बँकांच्या कार्यक्षमता आणि सुशासनामध्ये झालेल्या सुधारणेची पोचपावती असल्याचे सहकार भारतीने म्हटले आहे. तथापि, नवीन सहकारी बँकांच्या नोंदणीसाठी आवश्यक असलेल्या प्रवेश निकषांबाबत (Entry Point Norms) आरबीआयने व्यवहार्य आणि वास्तववादी निकष निश्चित करावेत, तसेच पुढील पाच वर्षांसाठी कार्यक्षमतेची उद्दिष्टे गाठण्यासाठी टप्प्याटप्प्याने प्रगती करण्याची संधी उपलब्ध करून द्यावी, अशी अपेक्षाही सहकार भारतीने व्यक्त केली आहे.

    निवडक सशक्त पतसंस्थांना नागरी सहकारी बँकांमध्ये रूपांतरित करण्यासाठीही आता संधी उपलब्ध होईल, असा विश्वास सहकार भारतीने यावेळी व्यक्त केला आहे. प्रादेशिक ग्रामीण बँकांमध्ये (RRBs) जोखीम व्यवस्थापन प्रणाली लागू करण्याच्या निर्णयामुळे त्या बँकांमधील सुशासन आणि कार्यक्षमता अधिक मजबूत होईल, असा विश्वासही सहकार भारतीने व्यक्त केला आहे.

  • कॉसमॉस बँक-भारत टॅक्सी मध्ये सामंजस्य करार

    पुणे – कॉसमॉस बँक आणि भारत टॅक्सी यांच्यामध्ये गुरूवारी , दि. २३ जुलै २०२६ सामंजस्य करार (MOU) महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते व केंद्रीय सहकार राज्यमंत्री श्री. मुरलीधर मोहोळ यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. कॉसमॉस बँकेचे अध्यक्ष श्री. सचिन आपटे आणि नॅशनल को ऑपरेटिव्ह डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनचे (NCDC) कर्नल हिमांशू यांनी करारावर स्वाक्षरी केल्या. सदर कार्यक्रम नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर संपन्न झाला, यावेळी कॉसमॉस बँकेचे उपाध्यक्ष सीए डॉ. यशवंत कासार, बँकेचे ज्येष्ठ संचालक श्री. प्रविणकुमार गांधी तसेच महाराष्ट्राचे सहकार मंत्री श्री. बाबासाहेब पाटील व इतर मान्यवर उपस्थित होते.
    भारत टॅक्सी हा देशातील पहिला राईड हेलिंग प्लॅटफॉर्म आहे. सहकार क्षेत्राला बळ देणारा, रोजगार उपलब्ध करून देणारा, सामाजिक सुरक्षितता देणारा भारत सरकारचा हा महत्वाचा उपक्रम आहे. भारत टॅक्सी ॲप करता सदर सामंजस्य करार करण्यात आला.
    ‘भारत टॅक्सी अंतर्गत ज्यांना स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा आहे, अशा व्यक्तींना फोर व्हीलर घेण्यासाठी कॉसमॉस बँक अर्थसहाय्य करणार आहे. अशांकरिता एक कर्ज योजना बँकेने तयार केली असून या कार लोनसाठी स्पर्धात्मक व्याजदर बँकेतर्फे देण्यात आला आहे. सुरुवातीला ही कर्ज योजना बँकेच्या महाराष्ट्र आणि गुजरात राज्यातील शाखांमध्ये सुरू करण्यात येत आहे. सदर दोन राज्यात मिळून बँकेच्या १६३ शाखा आहेत. भविष्यात ही योजना बँकेच्या शाखा असलेल्या इतर राज्यातूनही सुरू करण्याचा आमचा मानस आहे’, अशी माहिती कॉसमॉस बँकेचे अध्यक्ष श्री. सचिन आपटे यांनी यावेळी दिली.

    ( फोटो ओळी- डावीकडून कॉसमॉस बँकेचे अध्यक्ष श्री. सचिन आपटे, केंद्रीय सहकार राज्यमंत्री श्री. मुरलीधर मोहोळ, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस, नॅशनल को ऑपरेटिव्ह डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनचे (NCDC) कर्नल हिमांशू आणि अन्य मान्यवर.)