Category: Latest News

राज्यातील सर्व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांमध्ये यापुढे ७० टक्के जागा स्थानिकांसाठी राखीव ठेवणे आणि नोकरभरती प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने राबविणे असे दोन महत्त्वपूर्ण निर्णय शासनाने घेतले आहेत.

  • मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते बँकिंग तज्ञ विद्याधर अनास्कर यांना‘सहकार महर्षी’, अ‍ॅड. दीपक पटवर्धन यांना ‘सहकार गौरव पुरस्कार’ प्रदान

    मुंबई – सहकार हे ग्रामीण विकासाचे प्रभावी माध्यम असून सहकार चळवळीने शेतकर्यांना बळ दिले आहे. त्याचप्रमाणे केंद्र सरकार आणि राज्य शासनाच्या सहकार धोरणामुळे एकूणच सहकार क्षेत्राला बळ मिळाले आहे, असे मत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले आहे.
    महाराष्ट्र राज्य सहकारी संघ व सहकारी महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय सहकार दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या ‘सहकार गौरव पुरस्कार-2026’ या समारंभात ‘सहकार महर्षी’ म्हणून राज्य सहकारी बँक प्रशासक विद्याधर अनास्कर तर राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष अ‍ॅड. दीपक पटवर्धन यांना ‘सहकार गौरव पुरस्कार-2026’ राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते
    प्रमुख अतिथी म्हणून विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, उद्योगमंत्री व रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत, सहकार राज्यमंत्री पंकज भोयर व भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण व आमदार प्रसाद लाड उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन महाराष्ट्र राज्य सहकारी संघाचे अध्यक्ष आमदार प्रवीण दरेकर यांनी केले होते. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, पहिली सहकारी पतपेढी सन 1904 मध्ये सुरू झाली. तर सन 1911 मध्ये शिखर बँक स्थापन करण्यात आली. सहकाराचा विचार समाजात रुजविण्यात धनंजयराव गाडगीळ, विठ्ठलराव विखे पाटील, वैकुंठभाई मेहता यांनी सहकाराला दिशा दिली, असे ते म्हणाले.

    • राज्य सहकारी संघाचा निधी सुरू करणार –
      राज्य सहकारी संघाच्या निधीबाबत बोलताना त्यांनी सांगितले, की राज्य सहकारी संघाला मोठी परंपरा आहे आणि सहकार क्षेत्राला दिशा देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. यासाठी सहकार क्षेत्रात प्रशिक्षित कार्यकर्ते तयार झाले पाहिजेत, म्हणून बंद असणारा निधी नव्याने सुरू करण्यात येणार आहे, असे त्यांनी जाहीर केले.
      यामध्ये ‘सहकार महर्षी’ म्हणून विद्याधर अनास्कर, ‘सहकार रत्न’ म्हणून भगिनी निवेदिता बँकेच्या अध्यक्षा सीए रेवती पैठणकर, ‘सहकार भूषण’ म्हणून आमदार विनय कोरे व ‘सहकार गौरव’ म्हणून अ‍ॅड. दीपक पटवर्धन यांचा सन्मान करण्यात आला. सहकार चळवळीच्या विकासासाठी दिलेले मोलाचे योगदान, प्रभावी नेतृत्व, समर्पित कार्य आणि सहकार क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत पुरस्कार निवड समितीने अ‍ॅड. पटवर्धन यांची पुरस्कारासाठी निवड केली होती सहकारामध्ये उत्तम काम करणारे अ‍ॅड. पटवर्धन हे माझ्या मतदार संघातील असल्याचा सार्थ अभिमान आहे, असे उद्योग मंत्री सामंत यांनी सांगितले.
      सहकारामध्ये उत्तम काम करणार्या व्यक्तींचा हा गौरव असून त्यांच्या चांगल्या व उत्तम कामाला शासनाचा नेहमी पाठिंबा राहील, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले.
    • या वेळी सहकार क्षेत्रातील अन्य पुरस्कार प्रदान करण्यात आले. ते याप्रमाणे – सहकार गौरव पुरस्कार प्राप्त विजेते –
    • महिला सहकार शक्ती पुरस्कार – दि अण्णासाहेब सावंत नागरी सहकारी बँकेच्या अध्यक्षा शोभा सावंत
    • सहकार विभूषण पुरस्कार – शिवाजीराव नलावडे, मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक.
    • सहकार प्रेरणा पुरस्कार आणि कार्यालयीन कामकाजासाठीचे विशेष प्रशस्तिपत्र : विभागीय सहनिबंधक शहाजी पाटील आणि जिल्हा उपनिबंधक राजेश लव्हेकर
    • सहकार नवोन्मेष पुरस्कार – मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे सिद्धार्थ कांबळे, मुंबई हाउसिंग फेडरेशनचे प्रकाश दरेकर आणि चारकोप अभिलाषा गृहनिर्माण सहकारी सोसायटीचे श्रीकांत कवठणकर
    • सहकार ग्रामविकास पुरस्कार – डॉ. नामदेव उसेंडी, गडचिरोली जिल्हा आदिवासी बांबू प्रक्रिया सहकारी संस्था
    • सहकार बँकिंग उत्कृष्टता पुरस्कार – सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाले. * सहकार कृषिरत्न पुरस्कार – संजय सुने (अमरावती), सचिन देशमुख-पारवेकर (यवतमाळ) आणि दिलीप पाटील (नंदुरबार)
    • दूध उत्पादक व सेवा सोसायटी पुरस्कार – छत्रपती संभाजीनगर जिल्हा दूध उत्पादक संघाचे अध्यक्ष विजय काळे आणि लाडसावंगी विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचे अध्यक्ष गोकुळ राजपूत
    • सहकार समाजसेवा पुरस्कार – सेकंडरी स्कूल एम्प्लॉइज को. ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील
    • सहकार नेतृत्त्व पुरस्कार – महाराष्ट्र राज्य सहकारी संघ पुणेचे अध्यक्ष अशोक जगताप. * आदर्श सहकारी पतसंस्था पुरस्कार – ज्ञानदीप सहकारी पतसंस्था व्ही. जी. पवार
    • सहकार उद्योग पुरस्कार – गोराई मच्छीमार सहकारी संस्थेचे अध्यक्ष ऑल्डिन वसईकर. * सहकार परिवर्तन पुरस्कार – दि मुंबई अग्निशमन दल एम्प्लॉइज को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचे अध्यक्ष दशरथ घनवट.
    • युवा आणि ग्राहक सहकार पुरस्कार – महाराष्ट्र स्टेट को. ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशनचे अध्यक्ष रोहित निकम आणि महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह कन्झ्युमर्स फेडरेशनचे अध्यक्ष विठ्ठलराव भोसले.

  • ‘भारताची अर्थव्यवस्था भक्कम स्थितीत’– सतीश मराठे

    सरकारी कर्जरोखे पुस्तक प्रकाशन प्रसंगी डावीकडून - भालचंद्र कुलकर्णी, मुकुंद लेले, दीपक पटवर्धन, जयंत काकतकर, सतीश मराठे, विद्याधर अनास्कर व भरत फाटक

    पुणे, दि. ३ जुलै – सध्याच्या युध्दाच्या अस्थिरतेतदेखील भारताची अर्थव्यवस्था भक्कम स्थितीत असून दरडोई उत्पन्नात देखील चांगली वाढ झाली आहे तर सुमारे २५ कोटींहून अधिक नागरिक हे दारिद्र्यरेषेच्यावर आले आहेत. दुसरीकडे १५ कोटींहून अधिक स्वयंरोजगार करणारे वाढले आहेत, ही प्रगतीच्या दिशेने जाणारी आशादायी वाटचाल आहे, असे प्रतिपादन रिझर्व्ह बँक आणि नाबार्डचे संचालक सतीश मराठे यांनी आज येथे केले.

    सहकार सुगंध प्रकाशित आणि जयंत काकतकर लिखित “सरकारी कर्जरोखे – गुंतवणुकीचा एक उकृष्ट पर्याय” या पुस्तकाच्या प्रकाशन प्रसंगी ते बोलत होते. सहकार सप्ताहाच्या निमित्ताने कॉसमॉस बँकेच्या सहकार सभागृहात संपन्न झालेल्या या प्रकाशन समारंभात राज्य सहकारी बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर, राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन, ज्येष्ठ गुंतवणूक सल्लागार सीए भरत फाटक, सकाळ मनीचे संपादक मुकुंद लेले, लेखक जयंत काकतकर, सहकार सुगंध मासिकाचे संपादक भालचंद्र कुलकर्णी व्यासपीठावर उपस्थित होते.

    यावेळी मराठे पुढे म्हणाले की, सध्याची अर्थव्यवस्था सक्षमतेकडे जात असतांना नजीकच्या काळात विविध स्तरांवर सुधारणा देखील होणार आहेत. निर्यातीला चालना मिळेल आणि उत्पादन क्षमता वाढणार आहे, परिणामी देशाची प्रतिमा उंचावणार आहे. नव्याने स्टार्ट अप वाढत असल्याने रोजगाराच्या संधी अधिक प्रमाणात व्यापक होणार आहेत असेही ते म्हणाले. सर्वसामान्य जनतेने गुंतवणुकीला प्राधान्य देण्याची गरज असून त्यामध्ये सरकारी कर्ज रोख्याला प्राधान्य द्यावे. यासाठी हे पुस्तक उपयुक्त आहे.

    यावेळी अनास्कर म्हणाले की, सर्वसामान्य गुंतवणूकदारांचा कल हा कर्जरोख्याकडे वाढत आहे आणि लेखकाच्या समोर सर्वसामान्य गुतवणूकदार आहे. एका अर्थाने गुंतवणुकीसाठी योग्य मार्गदर्शन पुस्तकाच्या माध्यमातून झाले आहे. सर्वात महत्वाची बाब म्हणजे या पुस्तकामुळे आर्थिक साक्षरता होण्यास हातभार लागणार आहे. महागाईचा वाढता दबाव आणि तुटीची स्थिती लक्षात घेता हे पुस्तक गुंतवणूकीसाठीचा चांगला पर्याय देणारे आहे.

    यावेळी पटवर्धन म्हणाले की, राज्यात पतसंस्था चळवळीची व्याप्ती मोठी आहे. त्यातील काहींनी केवळ ५ टक्के गुंतवणूक कर्जरोख्यात केलेली आहे. या पुस्तकामुळे पतसंस्थांना गुंतवणूकीसाठी नवा दृष्टीकोन मिळणार आहे. संपादक लेले यांनी पुस्तकाची आवश्यकता प्रतिपादित केली ते म्हणाले, कर्जरोखे हा लोकप्रिय असा विषय नाही त्यापेक्षा आज शेअर्सची चर्चा अधिक होते. या पुस्तकाच्या निमित्ताने कर्जरोख्यांची चर्चा व्यापक होण्यास हातभार लागणार आहे. या पुस्तकाच्या माध्यमातून या विषयाबाबत जागरूकता निश्चितच वाढेल. यावेळी फाटक म्हणाले की, हे पुस्तक म्हणजे सगळ्या गुंतवणुकीचा पाया आहे. कोणतीही जोखीम नसणारा सरकारी कर्जरोखा आहे, तो सुरक्षिततेचा मानदंड आहे.

    नागरी सहकारी बँक आदर्श उपविधी समिति अध्यक्षपदी नियुक्त झालेले सहकार विभागाचे माजी अतिरिक्त आयुक्त दिनेश ओऊळकर, कॉसमॉस सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी निवड झालेले सचिन आपटे, उपाध्यक्ष सीए यशवंत कासार आणि व्यवस्थापन मंडळ अध्यक्षपदी निवड झालेले संजीव खडके तसेच पुस्तकाचे सहयोगी लेखक आशिष कुवळेकर आणि पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या उपाध्यक्षपदी निवडून आलेले दैनिक पुढारीचे वरिष्ठ पत्रकार किशोर बरकाले यांचा यावेळी विशेष सन्मान करण्यात आला. लेखक काकतकर यांनी प्रास्ताविक केले तर सर्वांचे स्वागत प्रकाशक भालचंद्र कुलकर्णी यांनी केले व आभार मानले. वर्षा कुलकर्णी-दाणी यांनी सूत्रसंचालन केले.