
पुणे – सहकाराचे अनेक पैलू आहेत. सहकारी गृहसंस्था आणि अपार्टमेंट हा मोठा भाग असून गृहसंस्थांच्या पातळीवर सहकाराची तत्त्वे रुजवणे आवश्यक आहे. तसेच राजकारण विरहित सहकार अपेक्षित आहे, असे राज्य सहकारी बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर यांनी सांगितले.
भारत सरकारतर्फे 6 जुलै 2021 रोजी स्थापन करण्यात आलेल्या केंद्रीय सहकार मंत्रालयाला यंदा म्हणजे 2026 मध्ये पाच वर्ष पूर्ण होत आहेत. यानिमित्त सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था, यांच्यातर्फे 29 जून 2026 ते 6 जुलै 2026 या कालावधीत सहकार सप्ताह साजरा करण्यात येत आहे. सप्ताहाचे उद्घाटन राज्य सहकारी बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर यांच्या हस्ते झाले, त्या वेळी ते बोलत होते.
अध्यक्षस्थानी ज्येष्ठ सनदी अधिकारी (आयएएस) हरनाम सिंग होते. यावेळी व्यासपीठावर सहकार आयुक्त दीपक तावरे, यशदाचे महासंचालक सुहास दिवसे, महाराष्ट्र हौसिंग अँड अपार्टमेंट फेडरेशनचे अध्यक्ष सुहास पटवर्धन, पुणे जिल्हा सहकारी गृहनिर्माण संस्थेचे उपाध्यक्ष सुभाष कर्णिक होते.
- राजकारणविरहित सहकार अपेक्षित –
अनास्कर म्हणाले, की सहकार आणि राजकारण यांचे नाते अतुट असले, तरीही राजकारणविरहित सहकार अपेक्षित आहे. राजकीय नेतृत्वाने सहकाराभोवतीचे कुंपण या भूमिकेतून काम करावे. तरी देखील सहकार आणि राजकारण यामध्ये लक्ष्मणरेषा असणे आवश्यक आहे. शालेय स्तरापासूनच सहकाराची बीजे रुजविणे अपेक्षित असताना शालेय अभ्यासक्रमातून सहकार नामशेष होत आहे, हे वास्तव खेदजनक आहे.
पूर्वी शाळा-शाळांमध्ये सहकार भांडार स्थापन करून त्याचे नियोजन विद्यार्थ्यांद्वारे केले जात होते. त्यातून प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे सहकाराची तत्त्वे त्यांच्यापर्यंत पाझरत होती. सहकाराची ही तत्त्वे विद्याथिदशेत अधोरेखित व्हावी म्हणून पुढाकार घेऊन तीन धडे तयार करून दिले. मात्र, गेल्या 20 वर्षांत त्याचा समावेश अभ्यासक्रमात झालेला नाही, सहकार जगणे, वाढणे आणि टिकणे ही काळाची गरज आहे, असे त्यांनी नमूद केले - सहकाराचा लाभ सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचे उद्दिष्ट – आयुक्त तावरे म्हणाले, की 6 जुलै 2021 रोजी सहकार मंत्रालयाची स्थापना झाली. सहकार चळवळीला गती आणि नवीन दिशा प्राप्त करून देण्याच्या उद्देशाने गेल्या पाच वर्षांत अनेक क्रांतिकारी निर्णय घेण्यात आले. सहकार विभागातील बदलामुळे या क्षेत्राची निकोप आणि सुदृढपणे वाढ होत आहे. सहकाराचा लाभ सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचे उद्दिष्ट साध्य होत आहे. फेडरेशनचे अध्यक्ष पटवर्धन यांनी प्रास्ताविक तर सूत्रसंचालन सुनील जोशी यांनी केले. सहकार सप्ताहाच्या प्रारंभी सहकार झेंडावंदन करण्यात आले. हरित उपक्रमांतर्गत वृक्षारोपण करून सहकार दिंडी काढण्यात आली.
Leave a Reply