
मुंबई – सहकार हे ग्रामीण विकासाचे प्रभावी माध्यम असून सहकार चळवळीने शेतकर्यांना बळ दिले आहे. त्याचप्रमाणे केंद्र सरकार आणि राज्य शासनाच्या सहकार धोरणामुळे एकूणच सहकार क्षेत्राला बळ मिळाले आहे, असे मत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले आहे.
महाराष्ट्र राज्य सहकारी संघ व सहकारी महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय सहकार दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या ‘सहकार गौरव पुरस्कार-2026’ या समारंभात ‘सहकार महर्षी’ म्हणून राज्य सहकारी बँक प्रशासक विद्याधर अनास्कर तर राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन यांना ‘सहकार गौरव पुरस्कार-2026’ राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते
प्रमुख अतिथी म्हणून विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, उद्योगमंत्री व रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत, सहकार राज्यमंत्री पंकज भोयर व भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण व आमदार प्रसाद लाड उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन महाराष्ट्र राज्य सहकारी संघाचे अध्यक्ष आमदार प्रवीण दरेकर यांनी केले होते. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, पहिली सहकारी पतपेढी सन 1904 मध्ये सुरू झाली. तर सन 1911 मध्ये शिखर बँक स्थापन करण्यात आली. सहकाराचा विचार समाजात रुजविण्यात धनंजयराव गाडगीळ, विठ्ठलराव विखे पाटील, वैकुंठभाई मेहता यांनी सहकाराला दिशा दिली, असे ते म्हणाले.
- राज्य सहकारी संघाचा निधी सुरू करणार –
राज्य सहकारी संघाच्या निधीबाबत बोलताना त्यांनी सांगितले, की राज्य सहकारी संघाला मोठी परंपरा आहे आणि सहकार क्षेत्राला दिशा देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. यासाठी सहकार क्षेत्रात प्रशिक्षित कार्यकर्ते तयार झाले पाहिजेत, म्हणून बंद असणारा निधी नव्याने सुरू करण्यात येणार आहे, असे त्यांनी जाहीर केले.
यामध्ये ‘सहकार महर्षी’ म्हणून विद्याधर अनास्कर, ‘सहकार रत्न’ म्हणून भगिनी निवेदिता बँकेच्या अध्यक्षा सीए रेवती पैठणकर, ‘सहकार भूषण’ म्हणून आमदार विनय कोरे व ‘सहकार गौरव’ म्हणून अॅड. दीपक पटवर्धन यांचा सन्मान करण्यात आला. सहकार चळवळीच्या विकासासाठी दिलेले मोलाचे योगदान, प्रभावी नेतृत्व, समर्पित कार्य आणि सहकार क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत पुरस्कार निवड समितीने अॅड. पटवर्धन यांची पुरस्कारासाठी निवड केली होती सहकारामध्ये उत्तम काम करणारे अॅड. पटवर्धन हे माझ्या मतदार संघातील असल्याचा सार्थ अभिमान आहे, असे उद्योग मंत्री सामंत यांनी सांगितले.
सहकारामध्ये उत्तम काम करणार्या व्यक्तींचा हा गौरव असून त्यांच्या चांगल्या व उत्तम कामाला शासनाचा नेहमी पाठिंबा राहील, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले. - या वेळी सहकार क्षेत्रातील अन्य पुरस्कार प्रदान करण्यात आले. ते याप्रमाणे – सहकार गौरव पुरस्कार प्राप्त विजेते –
- महिला सहकार शक्ती पुरस्कार – दि अण्णासाहेब सावंत नागरी सहकारी बँकेच्या अध्यक्षा शोभा सावंत
- सहकार विभूषण पुरस्कार – शिवाजीराव नलावडे, मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक.
- सहकार प्रेरणा पुरस्कार आणि कार्यालयीन कामकाजासाठीचे विशेष प्रशस्तिपत्र : विभागीय सहनिबंधक शहाजी पाटील आणि जिल्हा उपनिबंधक राजेश लव्हेकर
- सहकार नवोन्मेष पुरस्कार – मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे सिद्धार्थ कांबळे, मुंबई हाउसिंग फेडरेशनचे प्रकाश दरेकर आणि चारकोप अभिलाषा गृहनिर्माण सहकारी सोसायटीचे श्रीकांत कवठणकर
- सहकार ग्रामविकास पुरस्कार – डॉ. नामदेव उसेंडी, गडचिरोली जिल्हा आदिवासी बांबू प्रक्रिया सहकारी संस्था
- सहकार बँकिंग उत्कृष्टता पुरस्कार – सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाले. * सहकार कृषिरत्न पुरस्कार – संजय सुने (अमरावती), सचिन देशमुख-पारवेकर (यवतमाळ) आणि दिलीप पाटील (नंदुरबार)
- दूध उत्पादक व सेवा सोसायटी पुरस्कार – छत्रपती संभाजीनगर जिल्हा दूध उत्पादक संघाचे अध्यक्ष विजय काळे आणि लाडसावंगी विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचे अध्यक्ष गोकुळ राजपूत
- सहकार समाजसेवा पुरस्कार – सेकंडरी स्कूल एम्प्लॉइज को. ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील
- सहकार नेतृत्त्व पुरस्कार – महाराष्ट्र राज्य सहकारी संघ पुणेचे अध्यक्ष अशोक जगताप. * आदर्श सहकारी पतसंस्था पुरस्कार – ज्ञानदीप सहकारी पतसंस्था व्ही. जी. पवार
- सहकार उद्योग पुरस्कार – गोराई मच्छीमार सहकारी संस्थेचे अध्यक्ष ऑल्डिन वसईकर. * सहकार परिवर्तन पुरस्कार – दि मुंबई अग्निशमन दल एम्प्लॉइज को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचे अध्यक्ष दशरथ घनवट.
- युवा आणि ग्राहक सहकार पुरस्कार – महाराष्ट्र स्टेट को. ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशनचे अध्यक्ष रोहित निकम आणि महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह कन्झ्युमर्स फेडरेशनचे अध्यक्ष विठ्ठलराव भोसले.
Leave a Reply