महिलांसाठीच्या विविध योजना

सर्व स्त्रीवर्गाला माझा नमस्कार आणि महिला दिनाच्या खूप शुभेच्छा!! मार्च महिना येतो तोच आनंदाची लहर घेऊनी येतो. आपला विशेष अधिकाराचा दिवस महिला दिन मोठ्या दिमाखात साजरा करायचा असतो. महिला अगदी बोलघेवड्या असतात असं म्हणतात आणि ते अगदी खरं आहे. कितीही वय वाढलेले असले तरीदेखील एकत्र आल्यावर ज्या काय गप्पा मारतात, त्याला तोड नसते. कुठले काय त्यांना सापडते आणि एकमेकींना सांगत सुटतात. त्यातली गंमत, मज्जा, मोकळेपणे हसणे चिडवणे आणि गमाडीगंमत!
सरकार यंत्रणेत आणखीन एका महिलेने प्रवेश केला आहे. महिला वर्गाची काळजी घेणारे त्यांना प्रोत्साहन देणारे सध्याचे सरकार आहे हे परत एकदा सिद्ध झाले आहे. दिल्लीच्या मुख्यमंत्री म्हणून श्रीमती रेखा गुप्ता यांची निवड केली आहे. त्यांचे आपल्या सर्वांकडून अगदी मनापासून अभिनंदन आहे. मुख्यमंत्री रेखा ताई तुमचा अभिमान आहे. आपले अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा!
राज्य व केंद्र सरकारद्वारे अनेकविध प्रकारच्या योजना खास करून स्त्री वर्गासाठी राबविल्या जातात. एक स्त्री शिकली, नीट स्थिरस्थावर झाली तर संपूर्ण घर, पुढची पिढी स्थिरतेने जगू लागते. महिलांसाठी व्यवसाय निर्मिती करून स्वत:च्या पायावर उभे राहून सक्षमतेने त्यांचे जीवन आनंदी करण्यासाठीची धडपड सरकारी योजनांद्वारे होताना दिसते. त्यांची कमाई त्यांच्या गरजा पुरविणारी असली पाहिजे. महाराष्ट्र सरकारच्या आत्ता चालू असलेल्या काही योजनांची नामावली फक्त इथे देते. सरकारी केंद्रावर जाऊन त्याचा विशेष अर्ज भरावा.
1. लेक लाडकी योजना (2023) – मुलींच्या शिक्षणाला बळकटी व चालना देणे. त्यांना सशक्त, आत्मनिर्भर, खंबीर, प्रबळ बनविताना आखलेली योजना होय.
2. महिला उद्योगिनी योजना – स्त्रिया उत्तम व्यवसाय करू शकतात, हे सिद्ध झालेले आहे. त्यांची संख्या वाढवण्याचे लक्ष समोर ठेवून आखलेली योजना होय. यातून लघु उद्योग व्यवसाय, किरकोळ विक्रेते, उत्पादक, आणि स्वयंरोजगार करण्यासाठी सरकारकडून अर्थ साहाय्य देण्याची सोय केलेली आहे.
3. स्वर्णिमा योजना – स्वयंरोजगार योजनेचा एक भाग आहे. मागासवर्गीय उद्योजक महिलेस उद्योगासाठी कर्ज उपलब्ध केलेले आहे. नॅशनल बॅकवर्ड क्लासेस फायनान्स डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनद्वारे कमी व्याजदरात कर्ज उपलब्धता सोय केलेली आहे.
4. उद्योजक धोरण योजना – महिला उद्योजकांचा व्यापक वैविध्यपूर्ण विस्तार झालेला आहे. सर्व क्षेत्रांत त्यांनी मुसंडी मारलेली दिसते. स्वत:चा व्यवसाय सुरू करण्यासाठी 20 लाखापासून ते 1 कोटी रुपयांपर्यंत कर्ज उपलब्धता या योजनेद्वारे देण्यात येते. इथे भांडवल सुरूवातीलाच अधिक दिल्याने व्यवसायवृद्धी करणे सहज शक्य होऊ शकते.
5. महिला सन्मान योजना – महाराष्ट्रभर स्टेट ट्रान्स्पोर्ट म्हणजे एसटी प्रवासामध्ये महिलांसाठी 50 टक्के सूट देण्याची ही योजना आहे. त्याने महिला आपल्या मैत्रिणींबरोबर अधिकच्या संख्येने फिरायला बाहेर पडायला लागलेल्या दिसतात.
6. महाराष्ट्र विधवा पेन्शन योजना – पतीनिधनानंतर विधवेचे जिणे अडचणीचे होते खरे. राज्यशासन महिला कल्याण विभागाकडून विधवांना पेन्शन देण्यात येते. दरमहा सुरूवातीला रु. 1000/- पेन्शन देऊ केलेली आहे.
7. प्रधानमंत्री मातृवंदना योजना – यामध्ये गरोदर आणि बाळाला अंगावर पाजणार्या स्त्रियांना रु.5000/-आर्थिक मदत केली जाते. पुढील पिढीचे पोषण योग्य प्रकारे व्हावे, सर्व बालके सुदृढ सशक्त वाढावीत हा हेतू स्पष्ट आहे. ही योजना केंद्र सरकारची आहे. महिला आणि बालविकास मंत्रालयामार्फत सहाय्य करण्यात येते.
8. माझी कन्या भाग्यश्री योजना – मुलींचा जन्मदर प्रमाण सुधार यासाठीची त्यांना आर्थिक दिलासा देणारी योजना आहे. पहिली मुलगी झाल्यावर रु. 50000/- ची ठेव पावती दिली जाते. दुसरी मुलगी झाल्यावर दोघींच्या नावाने रु. 25,000/- अशा दोन पावत्या केल्या जातात. पावतीस सहा वर्ष झाल्यावर पालक त्याचे व्याज काढू शकतात. आणि पावतीची रक्कम मुली 18 वर्षाच्या झाल्यावर काढता येतात.
9. सुकन्या समृद्धी योजना – ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ – वय वर्षे 10 वर्षाच्या आतील मुलींची खाते आईवडील काढू शकतात. दरवर्षी ठराविक पण अधिकतम दीड लाख रुपये खात्यात भरता येते. नंतर मुलीचे शिक्षण व लग्न यासाठी पैसे काढता येतात. 21 वर्षे तिला पूर्ण झाल्यावर सर्व रक्कम केवळ तिच्यासाठी म्हणून काढता येते, यास उत्तम प्रतिसाद मिळाला आहे.
10. जननी सुरक्षा योजना – योजनेद्वारे गरीब कुटुंबातील गरोदर महिलेस आर्थिक मदत देऊन तिची काळजी तिने घ्यावी व बाळाला पोसावे. शासनाकडून रु.1400 मदत होते. शिवाय प्रसुतीचे वेळी अधिक रक्कम दिली जाते. नंतर तिचे स्वत:चे व बाळाचे संगोपन उत्तमरीत्या होणे गरजेचे असते.
11. महिला समृद्धी कर्ज योजना – सामाजिक न्याय व सहाय्य विभागाकडून काही महिलांना व्यावसायिक कर्ज देणारी योजना आहे. स्वत: उद्योग सुरू करणे महत्त्वाचे समजून त्यांना प्रोत्साहित केलेले आहे.
12. लाडकी बहीण योजना – 2024 च्या अंतरिम अर्थसंकल्पात योजनेची घोषणा झाली. प्रतिमहा रु.1500/- देऊन आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या महिलांना देऊन खुश केले आहे. आता त्यांच्या अर्जांची छाननी होऊन मगच पुढील हप्ता दिला जाईल. या अशा एक डझन योजना इथे नमूद केल्या आहेत. वर्तमानपत्रातून यांचा बोलबाला असतो. नवीन योजना आली तर कशी हे अभ्यासा आणि हवा असेल तर फायदा देखील घेऊ शकता. आता… दुसरी महत्वाची यादी इथे देते. स्त्री वर्गाची सुरक्षा हा मुद्दा बिकट होताना दिसतो. तेव्हा एकटीने जाताना भीती वाटेल अशी परिस्थिती काही भागात प्रत्येक गावात असते. तेव्हा त्यांना जर काही त्रास झाला, जीवावर बेतेल असे काही होणार असेल तर तिला त्वरित मदत ही मिळालीच पाहिजे. त्यासाठी केंद्र व राज्य सरकारने काही फोन नंबर्स जाहीर केलेले आहेत. त्यांची यादी पुढे देत आहेत.
1. पोलीस – 100, 112 – 112 नंबर लगेच लागतो. त्यांना हा फोन कुठून आला आहे, त्यांची जागा बरोबर समजू शकते. त्यातून ती स्त्री वा मुलगी काहीच बोलू शकत नाही, अशीही परिस्थिती असू शकते. तेव्हा पोलिसांना मिळालेल्या जागेवर त्वरित अगदी 10/15 मिनिटात पोलिसांची टीम तिथे पोहोचते आणि मुलीला मदत केली जाते. सर्व प्रकारची चौकशी होते.
2. तत्काळ सेवा पोलिसांची – 1906 3. संकट काळी त्वरित मदत – 1091, 1090, 112. 3. घरगुती हिंसा – 181. 4. महिला रेल्वे सुरक्षा – 182. 5. लहान मुलांसाठी मदत घेणे – 1098. 6. राष्ट्रीय मानवाधिकार आयोग – 14433. 7. राष्ट्रीय महिला आयोगात तक्रारीसाठी – +91 1126944880 // 1126944883. 8. चुकीचे कॉल येत असतील तर कळवायचे – 1930. 9. पीएमसी केअर – पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन – 14452. 10. स्वयंपाक गॅस समस्या निराकरण – 1906 // महाराष्ट्रासाठी
आत्ता आणखीन एकच महत्त्वाची गोष्ट इथेच सांगते. महिला दिनानिमित्त महत्त्वाचे काय तेच सांगते… सर्व सहकारी बँकांनी यावर्षी हा दिवस आपल्या बँकेत साजरा करावा, असे सुचवावेसे वाटते. त्यातही महिला डायरेक्टर्स असलेल्यांनी यामध्ये लक्ष घालावे. तो दिवस म्हणजे महिला शेतकरी दिवस – प्रतिवर्षी 15 ऑक्टोबर रोजी. 2017 मध्ये 15 ऑक्टोबर तारखेला शेतकरी महिला दिन म्हणून सरकारने घोषित केले आहे. आपण तर 8 मार्चला साजरा करतो. पण, त्या शेतकरी महिलांना आपल्यासाठीही एक स्वतंत्र दिवस मागील 7 वर्षांपूर्वीच ठरवला गेला हे देखील माहिती नसते. दरवर्षी यावर लेख लिहून लोकांपर्यंत हे सर्व पोचवले आहे. म्हणून या 2025 साली 15 ऑक्टोबर रोजी प्रत्येक बँकेने आपल्या शाखांमधून अथवा गावात एकत्रितरित्या ज्या शेतकरी वर्गाची बँकेत खाती आहेत, त्यांच्या कुटुंबातील आया बहिणींना बँकेत बोलावून त्यांचा सन्मान करावा. चहा कॉफी थोडासा खाऊ देऊन त्यांच्याशी गप्पा माराव्यात. असे सुचविते. ज्या बँकेत असे करायचे ठरेल, प्रत्यक्षात केले जाईल ते सांगावे. याहीपेक्षा मोठ्या प्रमाणात गावोगावी हा दिवस साजरा केला गेला तर खर्या अर्थाने अन्नपूर्णेची खणा नारळाने ओटी भरल्याचे पुण्य आपणा सर्वांना मिळेल. अन्नदात्री तीच आहे आपली. तिची आठवण ठेवून 15 ऑक्टोबरला तिचा सन्मान करा.
– वंदना धर्माधिकारी
मो.नं. : 9890623915 *****