देशाच्या विकासात सहकाराचे महत्त्वपूर्ण योगदान केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा

देशाच्या विकासात सहकाराचे महत्त्वपूर्ण योगदान : – केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा

 

जनता सहकारी बँकेच्या अमृत महोत्सवी वर्षाची सांगता

सहकारी बँकिंग क्षेत्रात स्वकर्तृत्वाचा ठसा उमटवणाऱ्या येथील जनता सहकारी बँकेने नुकताच अमृत महोत्सवी सोहळा साजरा केला. गेल्या 75 वर्षांच्या काळात बँकिंग क्षेत्राबरोबरच सामाजिक क्षेत्रात देखील विविध उपक्रम यशस्वीपणाने राबविले आहेत.

पुणे – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सन 2047 पर्यंत देशाला पूर्ण विकसित राष्ट्र करणे आणि सन 2027 पर्यंत त्याच्या अर्थव्यवस्थेला 5 ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी करणे हे दोन संकल्प राष्ट्राच्या समोर ठेवले आहेत. सहकारी क्षेत्राच्या योगदानाने दोन गोष्टी साध्य करता येऊ शकतात. प्रत्येक व्यक्तीला त्याच्या क्षमतेनुसार काम देणे आणि प्रत्येक व्यक्तीला देशाच्या विकासाशी जोडणे, प्रत्येक कुटुंबाला समृद्ध करणे हे केवळ सहकारी चळवळीच्या माध्यमातून शक्य आहे, असे मत केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी व्यक्त केले.

जनता सहकारी बँक पुणे बँकेच्या अमृत महोत्सवी वर्षाची सांगता करण्यात आली. अध्यक्षस्थानी केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा होते. अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय सहकार आणि नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण आणि संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटील, बँकेचे अध्यक्ष रवींद्र हेजीब, उपाध्यक्ष अलका पेटकर, मुख्य कार्यकारी अधिकारी जगदीश कश्यप उपस्थित होते. जनता सहकारी बँकेच्या स्मरणिकेचे प्रकाशन यावेळी करण्यात आले. अंब्रेला ऑर्गनायझेशनसाठी 5 कोटींचा धनादेश यावेळी बँकेच्या वतीने देण्यात आला.

* छोट्या लोकांची मोठी बँक –

सहकारमंत्री शहा म्हणाले, छोट्या लोकांची मोठी बँक हा विश्वास जनता सहकारी बँकने सार्थ केला आहे. देशातील पहिली को ऑपरेटिव्ह डिमॅट संस्था बनण्याचा बहुमान बँकेने प्राप्त केला आहे. जनता बँकेची ठेवी 9600 कोटींपेक्षा अधिक आहे, हे बँकेचे यश आणि लोकांचा विश्वास आहे. सामाजिक कार्यात देखील बँक अग्रेसर आहे. कोणतीही संस्था जेव्हा सातत्यपूर्ण प्रगती करते, तेव्हा त्यांचे संस्थापक, संचालक, सदस्य हे तिघे सगळ्या उद्देशांना पूर्ण करतात तेव्हाच ही प्रगती शक्य आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

* महाराष्ट्रात सहकारी बँकांचे मोठे जाळे –

देशात 1465 सहकारी बँका आहेत आणि त्यापैकी 400 हून अधिक फक्त महाराष्ट्रात आहेत. आम्ही एक अंब्रेला संस्था सक्रिय करत आहोत, जी सर्व सहकारी बँकांना शक्य त्या सर्व प्रकारे मदत करेल. अंब्रेला संस्थेसाठी सहकारी बँकांनी 300 कोटी रुपयांचे भागभांडवल उभे केले आहे. यामध्ये केंद्र सरकारचे देखील सहकार्य आहे. पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली सहकार मंत्रालयाने शहरी सहकारी व्यवसाय वाढवण्यासाठी अनेक उपक्रम हाती घेतले आहेत. देशातील पहिले सहकारी संस्थांचे केंद्रीय निबंधक कार्यालय मुरलीधर मोहोळ यांच्या पुढाकाराने पुण्यात सुरू होत असल्याचेही त्यांनी सांगितले.

* बँकेचा अमृत महोत्सव हा सुवर्णक्षण –

अध्यक्ष हेजीब म्हणाले, अनेक आव्हानांना तोंड देत समर्थपणे आपल्या विचारांचा वारसा जपत अमृतमहोत्सवी वर्षामध्ये केलेल्या कामगिरीचे सिंहावलोकन करण्याचा हा सुवर्णक्षण आहे. बँकेवर काम करणारे भागधारक, निष्ठावान खातेदार, निस्वार्थी संचालक आणि प्रामाणिक सेवक ही या बँकेची खरी शक्तिस्थाने आहेत. समाजातील सर्वसामान्यांचे जीवनमान उंचविण्यासाठी बँकेने मागील 75 वर्षे आपली भूमिका अत्यंत प्रभावीपणे निभावली आहे, असे सांगत बँकेच्या योजना आणि सामाजिक कार्यातील उपक्रमांची माहिती दिली.

जगदीश कश्यप यांनी स्वागत केले. रवींद्र हेजीब यांनी प्रास्ताविक केले. अलका पेटकर यांनी आभार मानले.

 

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *