देशभरातील सहकार प्रशिक्षण क्षेत्रातील तज्ञांनी विद्यापीठासाठी योगदान द्यावे – केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांचे आवाहन
राष्ट्रीय सहकारी विद्यापीठातून प्रशिक्षण घेतलेल्यांना रोजगार उपलब्ध होणार

आणंद, गुजरात – आगामी काळात सहकार क्षेत्रात क्रांती घडविणे आणि देशाला आत्मनिर्भर करण्यासाठी राष्ट्रीय स्तरावरील पहिले त्रिभुवन सहकार विद्यापीठ महत्त्वपूर्ण योगदान देईल, असा विश्वास केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी व्यक्त केले आहे. पहिल्या राष्ट्रीय सहकार विद्यापीठाच्या भूमिपूजन कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल उपस्थित होते. या क्षेत्रातील घराणेशाही संपुष्टात आणण्याचे काम करेल असे ते म्हणाले.
विद्यापिठाच्या उभारणीसाठी सुमारे 500 कोटी खर्च अपेक्षित असून जवळपास 125 एकर जागेवर विद्यापिठाची उभारणी करण्यात येणार आहे. विद्यापीठाला त्रिभुवनदास किशीभाई पटेल यांचे नाव देण्यात आले आहे. सहकार मंत्रालयाचे सचिव डॉ. आशिष कुमार भुटानी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
चार वर्षांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील कोट्यवधी गरीब आणि गावकर्यांच्या जगण्याची आशा निर्माण करण्यासाठी व त्यांना आर्थिकदृष्ट्या समृद्ध करण्यासाठी सहकार मंत्रालयाची स्थापना केली, असे नमूद करून ते म्हणाले, सहकार मंत्रालयाच्या स्थापनेपासून, गेल्या चार वर्षांत, मंत्रालयाने भारतातील सहकार क्षेत्राच्या विकासासाठी, या क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी आणि एकसमान विकासाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी 60 नवीन उपक्रम हाती घेतले आहेत. सहकार क्षेत्राचा विकास व्हावा, सहकारातून शेतकर्यांचे उत्पन्न वाढावे आणि सहकार चळवळीत महिला शक्ती आणि युवा वर्गाचा सहभाग वाढावा, यादृष्टीने सहकार चळवळ चिरकाल टिकून राहावी, हे क्षेत्र पारदर्शकता आणि लोकशाहीपूर्ण बनावे या हेतूने सर्व उपक्रम राबवले जात असल्याचे त्यांनी संगितले.
* विद्यापीठाची पायाभरणी म्हणजे सहकार क्षेत्राला बळकटी –
त्रिभुवन सहकारी विद्यापीठाची पायाभरणी म्हणजे सहकार क्षेत्राला बळकटी देतांना या क्षेत्रातील सर्व उणिवांची कसर भरून काढण्याच्या वाटचालीतला एक महत्त्वाचा उपक्रम आहे. पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्त्वाखाली देशभरातली सहकार चळवळ वेगाने प्रगती करत आहे. विद्यापिठाची पायाभरणी म्हणजे पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्त्वाखाली टाकले गेलेले एक क्रांतिकारी पाऊल आहे. देशभरात 40 लाख कामगार सहकार चळवळीशी जोडले गेले आहेत. 80 लाख जण मंडळांचे सदस्य आहेत आणि 30 कोटी लोक, म्हणजेच देशातील प्रत्येक चौथी व्यक्ती ही सहकार चळवळीशी जोडली गेलेली आहे, ही बाब त्यांनी अधोरेखित केली.
* विद्यापीठाच्या माध्यमातून प्रशिक्षणाची सुविधा –
देशात सहकार क्षेत्राच्या विकासाच्या अनुषंगाने, सहकारी संस्थांमधील कर्मचारी आणि सदस्यांना प्रशिक्षण देण्यासाठी कोणतीही व्यवस्था नव्हती. पूर्वी कर्मचार्यांना सहकारी संस्थांमध्ये भरती झाल्यानंतर प्रशिक्षण दिले जात होते. मात्र, आता विद्यापीठाच्या स्थापनेनंतर ज्यांनी प्रशिक्षण घेतले आहे, त्यांनाच नोकरी मिळेल. यामुळे सहकारी संस्थांमधील घराणेशाही संपुष्टात येईल. पारदर्शकता स्थापित होईल आणि त्रिभुवन सहकारी विद्यापीठातून शिक्षण घेणार्यांना नोकर्याही मिळतील असे त्यांनी सांगितले.
* विविध समस्यांची सोडवणूक करता येणे शक्य –
विद्यापीठात युवक केवळ तांत्रिक कौशल्य, लेखा, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि विपणनाची सर्व आवश्यक वैशिष्ट्येच शिकणार नाहीत. सहकार चळवळीच्या माध्यमातून देशातील दलित, आदिवासी आणि महिलांसाठी असलेल्या सहकार मूल्यांचाही अभ्यास करतील. विद्यापीठामुळे सहकार क्षेत्रातील अनेक समस्या सोडवता येतील. सीबीएसईने इयत्ता 9 वी ते 12 वीच्या अभ्यासक्रमात सहकार हा विषय समाविष्ट केला आहे. गुजरात सरकारनेही अभ्यासक्रमात सहकार विषय समाविष्ट करावा, जेणेकरून सामान्य लोकांनाही सहकाराबाबत माहिती मिळू शकेल, असे त्यांनी सूचित केले.
* सहकारी संस्थांच्या प्रशिक्षणासाठी अभ्यासक्रम तयार करणार –
विद्यापीठ संपूर्ण देशभरातील सहकारी संस्थांच्या प्रशिक्षणासाठी एकसंध अभ्यासक्रम तयार करून धोरणे, नवोन्मेष, संशोधन आणि प्रशिक्षणाच्या माध्यमातून सहकारी संस्थांना पुढे नेण्याचे काम करेल. विद्यापीठ प्रतिभावान व्यक्तींना व्यासपीठ उपलब्ध करून देईल आणि सहकाराचे धोरण तयार केले जाईल जे सर्वांसाठी मार्गदर्शक ठरेल हे विद्यापीठ 2 लाख नवीन व 85 हजार जुन्या पीएसीएस (प्राथमिक कृषी पतसंस्थां)च्या माध्यमातून सर्व योजनांची अंमलबजावणी प्रत्यक्षात करण्याचे कामही करेल. विद्यापीठाच्या स्थापनेनंतर सहकारी चळवळ बहरेल, वाढेल आणि भारत संपूर्ण जगात सहकाराचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जाईल. त्रिभुवन सहकारी विद्यापीठात तयार होणारी धोरणे आणि अभ्यासक्रम सहकाराच्या आर्थिक मॉडेलला एका जनआंदोलनात रूपांतरित करण्याचे कार्य करतील. विद्यापीठ सर्व मोठ्या सहकारी संस्थांसाठी पात्र कर्मचार्यांची पूर्तता करेल. नजीकच्या काळात सहकारी टॅक्सी सेवा सुरू करायची आहे. सहकारी विमा कंपनीही निर्माण करायची आहे. त्यामुळे प्रत्येक क्षेत्रातील विशेष ज्ञान असलेले अधिकारी, कर्मचारी आणि सहकारी नेते आवश्यक आहेत. देशभरातील सहकारी प्रशिक्षण तज्ञांनी विद्यापीठात सहभागी व्हावे व योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.
Leave a Reply