सहकारी बँकांकडे पाहण्याचा रिझर्व्ह बँकेचा दृष्टीकोन सकारात्मक – सतीश मराठे

महाबळेश्वर – सहकारी बँकांच्या माध्यमांतून समाजाच्या तळागाळातील लोक बँकिंग क्षेत्राशी जोडले जातात. कोरोनानंतरच्या काळात सहकारी बँकांच्या कर्जवसुलीवर परिणाम झालेला आहे. त्यामुळे सहकारी बँकांची आर्थिक स्थिती कमकुवत होते काय असा प्रश्न होता. मात्र सहकारी बँकाची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी प्रयत्नशील आहेत. या बँकांबाबतचा रिझर्व्ह बँकेचा दृष्टीकोन सकारात्मक आहे, असे भारतीय रिझर्व्ह बँकेचे संचालक सतीश मराठे यांनी सांगितले.
सहकार भारती कोल्हापूर विभागाच्या वतीने सातारा, सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील नागरी बँकांचा महाबळेश्वर येथे प्रशिक्षण वर्ग पार पडला. यावेळी नागरी सहकारी बँकांचे पदाधिकारी, अधिकारी यांना मार्गदर्शन करताना मराठे बोलत होते. सहकार भारतीचे महामंत्री विवेक जुगादे, संघटक संजय परमने, सांगली अर्बन बँकेचे अध्यक्ष गणेश गाडगीळ, महाराष्ट्र सहकारी बँक्स असोसिएशनच्या उपाध्यक्षा वैशाली आवाडे, सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक राजेंद्र राजपुरे, सहकार विभागाचे जिल्हा उपनिबंधक संजय सुद्रीक, महाबळेश्वरचे सहाय्यक निबंधक क्षीरसागर उपस्थित होते.
देशातील 1400 बँकांमध्ये एकही बँक पीसीएमध्ये (प्राँम्प्ट करेक्टिव्ह अँक्शन) नाही. ही समाधानकारक बाब आहे. असे नमूद करून ते म्हणाले, देशातील 55 कोटी सर्वसामान्यांची जनधन खाती नागरी सहकारी बँकांमध्ये आहेत, त्यामुळे सामान्यांना सहज बँकिंग सेवा उपलब्ध करून देणारी प्रणाली नागरी बँकांकडे आहे. देशातील 100 कोटींहून अधिक लोक मोबाईलचा वापर करतात तर 75 कोटी जनता इंटरनेट वापरत आहे. सायबर सिक्युरिटी ही बाब सर्वांना पाळावी लागणार आहे. सायबर घटना ही समस्या सरकारपुढे आव्हान निर्माण करीत आहे. नागरी सहकारी बँकांनी आपली टेक्नॉलॉजी वरचेवर अपग्रेड करणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे व्यवसाय वाढवून कर्मचारी खर्च व भांडवली खर्च कमी ठेवण्याचा प्रयत्न करावा, असे त्यांनी सांगितले.
सहकारी बँकांमध्ये समन्वय ठेवून एकमेकांची टेक्नॉलॉजी वापरता येतेय का, ते पाहावे. मोठ्या बँकांनी छोट्या बँकांना माफक दराने टेक्नॉलॉजी उपलब्ध करून द्यावी. भारतीय रिझर्व्ह बँक जगभरातील मध्यवर्ती बँकांच्या तुलनेत चांगली कामगिरी करीत आहे. अनेक देशाच्या मध्यवर्ती बँका भारतीय रिझर्व्ह बँकेच्या तंत्राचा अभ्यास करण्यासाठी भारतात येत आहेत, ही देशाच्या दृष्टीने अभिमानाची बाब आहे. देशातील बँकांमध्ये ग्रॉस एनपीएचे प्रमाण 2 टक्क्यांपेक्षा कमी तर नेट एनपीए एक टक्क्यांपेक्षा कमी आहे. भारतात साडेसात लाख गावे आहेत. जगाच्या मानाने भारताने पेमेंट सिस्टिममध्ये खूप मोठी प्रगती केली आहे. त्यात दिवसेंदिवस वाढ होत असून टेक्नॉलॉजीमध्येही झपाट्याने बदल होत आहे. ज्या गतीने यामध्ये बदल होत आहे. ते पाहता येत्या चार-पाच वर्षांत बँकिंग क्षेत्राला प्रगती करण्यासाठी चांगला वाव आहे. संधी आहेत, त्या दृष्टीने सहकारी बँकांनी आपली दिशा ठरवली पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.
रिझर्व्ह बँकेचे निवृत्त अधिकारी अविनाश जोशी यांनी सहकारी बँकांच्या बदलेल्या लेखापरीक्षणाची माहिती सांगितली. रिझर्व्ह बँकेने सहकारी बँकांच्या अंतर्गत व वैधानिक लेखापरीक्षणासाठीचे बदलेले परिपत्रक विस्तृतपणे उपस्थितांसमोर मांडले.
वस्तू व सेवा करविभागाचे निवृत्त सहआयुक्त विद्याधर गोखले यांनी प्रतिनिधींना केवायसीबाबत दक्षता घेण्यास सांगितले. शासनाच्या प्रिव्हेन्शन आँफ मनी लाँडरिंग अॅक्टविषयी माहिती सांगितली. सहकार भारतीचे कोल्हापूर विभाग प्रमुख चंद्रकांत धुळप, सहप्रमुख नरेंद्र गांधी, सातारा जिल्हा अध्यक्ष डॉ. रवींद्र भोसले, प्रदिप दिक्षित, श्रीकांत पटवर्धन, धोंडीराम पागडे, दीपक बावळेकर, मल्हारी पेटकर, प्रशांत कात्रट, दत्तप्रसाद जाधव, दत्तात्रय पवार, विनायक भिसे, शशिकांत पवार आदींनी स्वागत केले. आनंद शेलार यांनी सूत्रसंचालन केले.