देशाच्या आर्थिक भविष्याला आकार व स्थिरता आणण्यात आरबीआयची भूमिका महत्त्वपूर्ण – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

0 Comments

देशाच्या आर्थिक भविष्याला आकार व स्थिरता आणण्यात आरबीआयची भूमिका महत्त्वपूर्ण – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

मुंबई – देशाच्या आर्थिक भविष्याला आकार देण्यात आणि स्थिरता येण्यामध्ये आरबीआयची भूमिका महत्वपूर्ण राहिली आहे, असे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी येथे बोलताना सांगितले. आरबीआयच्या 90 व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात राष्ट्रपती मुर्मू बोलत होत्या.

आगामी काळातील वाटचाल ही नवीन आव्हानांची असणार आहे, असे नमूद करून त्या म्हणाल्या, मात्र त्या स्थितीमध्ये आरबीआय स्थैर्य, नावीन्य आणि सर्वसमावेशकता याबाबत कटिबद्धता कायम राखेल. आरबीआय ही केवळ काळानुरूप बदलत गेली नसून बँकेने देशाच्या आर्थिक स्थित्यंतरात मोलाची भूमिका बजावली आहे. महागाई आटोक्यात आणणे आणि वित्तीय समावेशनाला गती देतानाच बँकेने वित्तीय स्थिरता कायम राखली असून आर्थिक विकासाला गती दिली आहे. देशाच्या आर्थिक भवितव्याला बँकेने आकार देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. देशाच्या अतुलनीय विकासाचा बँक हा केंद्रबिंदू आहे, असे त्या म्हणाल्या.

बँकेने नाबार्ड, सिडबी आणि नॅशनल हौसिंग बँक यांसारख्या संस्था स्थापन करून वित्तीय परिस्थिती भक्कम करण्याचे काम अनेक वर्षात केले आहे. या वित्तीय संस्थांच्या माध्यमातून कृषी, लघु उद्योग आणि गृहनिर्माण क्षेत्राला आवश्यक पाठबळ मिळू शकले आहे. सामान्य नागरिकांचा कमावलेला विश्‍वास हे गेल्या नऊ दशकातील बँकेचे सर्वात मोठे यश आहे असे त्यांनी नमूद केले.

बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी सांगितले की, बँकेने ग्राहक संरक्षण अधिक सक्षम करताना चौकटीत व्यापकता आणली आहे. यामुळे वित्तीय स्थिरता आणि कार्यक्षमता यातील संतुलन कायम राखता आले आहे. बँक आज एका प्रगतीच्या टप्प्यावर उभी आहे. बँकेने सुरुवातीपासून विस्ताराची भूमिका घेतली आहे. सध्याच्या स्थितीत वित्तीय स्थिरता, आर्थिक विकास, किंमत स्थिरता हे घटक महत्वाचे आहेत. तंत्रज्ञान क्षेत्रात होणारे बदल, जागतिक स्तरावरची अनिश्‍चितता, तापमान बदलाचे आव्हान आणि जनतेच्या अपेक्षा यांकडेदेखील अधिक लक्ष द्यावे लागणार आहे, असे त्यांनी सांगितले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts