सहकाराच्या क्षेत्रात तंत्रज्ञानाच्या माध्यमातून परिवर्तन घडवून आणणे शक्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सूतोवाच

नवी दिल्ली – देशामध्ये सहकार क्षेत्राचा अजून मोठ्या प्रमाणावर विस्तार होण्यासाठी जागतिक स्तरावरील संस्थांच्या बरोबर भागीदारी करण्याची आवश्यकता आहे. तसेच सहकाराच्या क्षेत्रात तंत्रज्ञानाच्या माध्यमातून परिवर्तन घडवून आणणे आणि युवक व महिलांचा सहभाग वाढविण्यासाठी विविध योजना तयार करण्याची गरज असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.
सहकार क्षेत्राच्या वाटचालीचा आणि आगामी काळातील योजनांचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान मोदी यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच एक उच्चस्तरीय बैठक झाली. त्यावेळी पंतप्रधान मोदी बोलत होते. केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा, सहकार मंत्रालयाचे सचिव डॉ. आशिष कुमार भूतानी पंतप्रधानांचे प्रधान सचिव डॉ. पी. के. मिश्रा, शक्तिकांत दास आणि अन्य अधिकारी यावेळी उपस्थित होते.
निर्यातीच्या बाजारावर अधिक प्रमाणात लक्ष केंद्रित करण्याप्रमाणेच कृषिपद्धती सुधारण्यासाठी सहकारी संस्थांच्या माध्यमातून परीक्षण मॉडेल विकसित करण्याची गरज असल्याचे नमूद करून ते म्हणाले, सहकार मंत्रालयाच्या विविध उपक्रमाच्या माध्यमातून ‘सहकार से समृद्धी’वर अधिक भर देण्याची आवश्यकता आहे. त्याचप्रमाणे सहकारी संस्थांमध्ये स्पर्धा असावी, मात्र ती निकोप असायला हवी. त्याचबरोबर सहकारी संस्थेच्या मालमत्तेचे दस्तऐवजीकरण करण्याची आवश्यकता असे त्यांनी सांगितले.