आजच्या काळातही महिला विकासात्मक कामात अग्रेसर
महिला आजच्या युगामध्ये कोठेही कमी नाहीत. जुन्या नव्या युगातील सर्व क्षेत्रे महिलांनी पादाक्रांत केलेली आहे. अनेकविध संस्थांवर महिला काम करीत आहे. या सर्व गोष्टींमध्ये त्यातल्या त्यात अवघड काम म्हणजे आर्थिक क्षेत्रात काम करणे, एखादी बँक किंवा पतसंस्था चालवणे होय.

उत्कर्ष पतसंस्था संस्था फार नावाजलेले आणि विश्वासाला पात्र असलेली ही संस्था दिमाखाने काम करत आहे. पण आर्थिक संस्था चालवणे फार अवघड आहे हे लक्षात आले. सुरुवातीला वाटले सर्वांची साथ आहे तर होईल सोपे पण तेवढे सोपे नाही. काम करताना बारीक सारी गोष्टी किती अडचणीच्या आहेत हे लक्षात आले. आजकाल आर्थिक क्षेत्रामध्ये प्रचंड उलाढाली होत आहेत. अनेक नावाजलेल्या बँका पतसंस्था डबघाईला आल्या आहेत. प्रत्येक ठिकाणी संचालकांची चूक असेल असेही नाही पण काही कारणाने अडचणीत आलेल्या बँका पतसंस्था पाहत आहे. अशा वेळी लोक संभ्रमात आहेत की नक्की आता विश्वास ठेवणार तरी कोणावर?
एखाद्या बँकेमध्ये आपण पैसे ठेवले आणि बँक अडचणीत आली, बँक डुबली तर व्याज राहीलंच, पण मुद्दलही हाती पडेल की नाही याची शाश्वती नसते. अशा वेळी संस्थेला सभासदांना दिलासा देणे आणि चांगले काम करत राहणे हे आपल्या हातात आहे. सध्या डिजिटल युग आहे अत्याधुनिक तंत्रज्ञान आहे. त्यामुळे बँकेचे व्यवहार सहज सोपे होतात पण त्यातही धोके आहेत. पूर्वी कॅशने पैसे देणे घेणे असायचे, मोजून पैसे घेणे व्हायचे. सह्या व्हायच्या समोरासमोर, पण आता तसं नाही. आता एखादी सूक्ष्म चूकसुद्धा कोटीच्या कोटी रकमेचा घात करू शकतो. त्यामुळे काळजी घ्यावी लागते. लोक आता संस्थेत ठेवीचे व्याजदर किती आहे हे पाहत नाही. संस्थेवर काम करणारी माणसं कशी आहेत. किती प्रामाणिक आहेत हेसुद्धा पाहतात. बरेच सुज्ञ लोक फक्त संचालक मंडळ यांच्याकडे पाहूनच ठेवी ठेवत असतात.
महिलांमध्ये आर्थिक साक्षरता येणे फार गरजेचे आहे. पैशाचे बँकेचे व्यवहार महिलांनी स्वतः करावे, स्वतः बँकेत जावं, माहिती घ्यावी. घरात कोण कर्ज काढतंय का यावर लक्ष द्यावे. कारण पैशाचे नियोजन महिला उत्तम प्रकारे करू शकतात. बर्याचदा घरातील पुरुष मंडळींनी कर्ज काढलेले असते आणि घरच्या महिलांना माहीत नसते. मग वसुलीला गेल्यानंतर महिलांना ते कळते आता जास्तीत जास्त महिला या सशक्त स्वावलंबी झालेल्या आहेत. मोकळेपणाने हिंडत फिरत आहेत. काम करत आहेत.
आपण कितीही स्त्री-पुरुष समानतेचा डंका वाजवला तरी निसर्गानेच स्त्री आणि पुरुष यामध्ये काही फरक ठेवलेला आहे, तो योग्यच आहे. तरच हा समाज व्यवस्थित चालू शकेल. स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे. करिअर करण्यास हरकत नाही. पुढे जाण्यास हरकत नाही पण कितीही पुढे आपण गेलो तरी आपली भारतीय संस्कृती. स्त्रियांची शालिनता हाच स्त्रीचा दागिना आहे ते नक्कीच जपलं पाहिजे. एखादी स्त्री कमवत नसेल सोशल वर्क करत नसेल. फक्त ती घरात असेल आणि उत्तम संसार करत असेल. मुलाबाळांचे पाहत असेल. घरच्या पुरुषांची देखभाल. हवं नको ते बघत असेल तर यात कमीपणा मानू नये. कर्तव्य करण्यात काही कमीपणा असू नये.
महिलांनी इतरांबरोबर काही तुलना न करता आपल्याकडे आहे. त्यातच समाधान मानून उत्तम संसार करावा व जीवनाचा आनंद घ्यावा.
– श्रीमती अनुराधा आनंद कोल्हापुरे
अध्यक्ष, उत्कर्ष नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित वाई