देशाचा जीडीपीचा दर वाढण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची आवश्यकता : आरबीआय संचालक सतीश मराठे यांची अपेक्षा

सहकार भारती संस्थापक सदस्य आणि आरबीआय संचालक सतीश मराठे यांचा अमृत महोत्सवी सोहळा नुकताच येथे उत्साहात साजरा करण्यात आला. त्याविषयीचे सचित्र वृत्त…..
पुणे – सहकार भारती संस्थापक सदस्य आणि आरबीआयचे संचालक सतीश मराठे यांच्या अमृत महोत्सवी सोहळ्याच्या निमित्ताने कॉसमॉस बँकेतील सभागृहात विशेष सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. सहकार भारतीचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. उदय जोशी, महाराष्ट्राचे माजी प्रदेशाध्यक्ष डॉ. मुकुंद तापकीर आणि विद्यमान महामंत्री विवेक जुगादे आणि सहकार भारतीचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच विविध सहकारी बँका, पतसंस्था साखर कारखाने, गृहनिर्माण संस्था शासकीय अधिकारी तसेच अन्य सहकारी संस्थेतील पदाधिकारी, अधिकारी आणि कार्यकर्ते यांनी मराठे यांना शुभेच्छा दिल्या.
सहकार सुगंधचे संपादक भालचंद्र कुलकर्णी, कॉसमॉस बँकेचे माजी अध्यक्ष मिलिंद काळे आणि बुलढाणा सहकारी पतसंस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिरीष देशपांडे यांनी सोहळ्याचे नियोजन केले होते. यावेळी मराठे यांचे सुवासिनींनी औक्षण केले. त्यानंतर कॉसमॉस बँकेचे अध्यक्ष प्रल्हाद कोकरे आणि माजी अध्यक्ष मिलिंद काळे यांच्या हस्ते श्री. मराठे, डॉ. जोशी आणि डॉ. तापकीर यांचा पगडी प्रदान करून सन्मान करण्यात आला.
आगामी काळात अर्थव्यवस्थेची गती वाढणार –
मनोगत व्यक्त करताना मराठे यांनी सांगितले की, गेल्या 10 वर्षांच्या कालावधीत देशाची अर्थव्यवस्था गतिमान झाली आहे. तसेच आगामी किमान दहा वर्षे ही गती आणखी वाढणार आहे. मात्र त्याचप्रमाणे सर्वसामान्य जनतेचे उत्पन्न वाढण्याची गरज आहे. यासाठी सहकारी बँकांनी प्रामुख्याने ग्रामीण भागावर अधिक लक्ष देण्याची गरज आहे. कृषी प्रक्रिया, दूध व्यवसाय, पशुसंवर्धन याप्रमाणे सहकार क्षेत्रातील अन्य घटकांकडे जास्त लक्ष दिले पाहिजे. त्यामुळे सध्याचा जीडीपीचा जो दर आहे. त्यामध्ये वाढ होऊन तो किमान साडे आठ ते नऊ टक्के होऊ शकेल. तसेच ग्रामीण भागासाठी नवनवीन सेवा सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा बँकांनी पुढाकार घ्यायला हवा. कारण आगामी काही वर्षांत सहकार क्षेत्राचे महत्त्व मोठ्या प्रमाणावर वाढण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे.
सहकारातील विविध व्यक्तीमत्त्वांची उपस्थिती –
कार्यक्रमाला सहकार चळवळीतील अनेक मान्यवर उपस्थित होते. निवडणूक प्राधिकरण मुख्य आयुक्त अनिल कवडे माजी सहकार आयुक्त दिनेश ओउळकर कॉसमॉस बँक माजी अध्यक्ष मिलिंद काळे अधिकारी संजय खडके बँकिंग तज्ञ गणेश निमकर, अभय माटे, महाराष्ट्र गृहनिर्माण सहकारी संघाचे सुहास पटवर्धन, लेखक श्रीकांत जाधव, सुधीर पंडित अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे गोविंदराव कुलकर्णी लेखिका वंदना धर्माधिकारी, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ सहकार अध्यासनचे प्रमुख अनिल कारंजकर उद्यम सहकारी बँकेच्या उपाध्यक्ष अनास्कर तसेच योगिराज सहकारी पतसंस्था, पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक्स असोसिएशन, विश्वेश्वर सहकारी बँक सरस्वती महिला सहकारी पतसंस्था, महाराष्ट्र हाऊसिंग फेडरेशन, जनता सहकारी बँक, जनसेवा सहकारी बँक, राजगुरूनगर सहकारी बँक, पिंपरी चिंचवड सहकारी बँक, पुणे ऑडिटर्स असोसिएशन, श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखाना आदी संस्थांच्या पदाधिकारी, अधिकारी यांनी मराठे यांचा सन्मान करून शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्र संचालन सहकार सुगंध मासिकाचे संपादक भालचंद्र कुलकर्णी यांनी केले.