वैकुंठभाई मेहता राष्ट्रीय सहकारी व्यवस्थापन संस्था आयोजित सहकार परिषदेचा समारोप

पुणे – सहकार विषयक शिक्षण देणारे आणि अभ्यास करणारे विद्यापीठ सरकारच्या वतीने नजीकच्या काळात उभारण्यात येणार असून याबाबतचे विधेयक संसदेच्या अधिवेशनात मांडण्यात आले आहे. विधेयक संमत झाल्यावर पुढील कार्यवाही होईल, असे केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले.
ग्रामीण भागात सहकार क्षेत्रामुळे शाश्वत विकास झाला आहे. सहकारी बँका यांना देखील बळकटीकरण करण्यासाठी भाजप सरकारने विशेष प्रयत्न केले आहेत असे नमूद करून ते म्हणाले, सहकारातून समृद्धीकडे जाण्यासाठी आणखी प्रयत्न करण्याची गरज आहे. सेवा सोसायट्या आणि पतसंस्था याची उपयुक्तता वाढत असून सेवा सोसायट्यांना विविध उपक्रमाशी जोडून सक्षम बनविण्यात येत आहे. सन 2025 हे आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष म्हणून जाहीर झाले असून आयोजित करण्यात आलेली तीन दिवसीय सिकटॅब ही आंतरराष्ट्रीय परिषद यशस्वी झाली असे त्यांनी नमूद केले.
सिकटॅब आंतरराष्ट्रीय परिषदेची सांगता भारत सरकारचे सहकार आणि नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. ग्रामीण विकास, कृषी आणि वनीकरण मंत्रालय, लाओ पीडीआरचे उपमहासंचालक अनोसॅक फेंगथिमावोंग, गांबिया सहकाराचे रजिस्ट्रार जनरल बा जिब्रिल संकरेह, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ बँक मॅनेजमेंट संस्थेचे संचालक प्रा. पार्थ रे, इंस्टिट्यूट ऑफ रुरल मॅनेजमेंट गुजरातचे उमाकांत दास वामनिकॉम व सिकटॅबच्या संचालक डॉ. हेमा यादव आदी उपस्थित होते. या परिषदेमध्ये मॉरिशस, बँकोक, नेपाल, श्रीलंका, केनिया, भूतान, नामबिया, झांबिया अशा विविध 13 देशातील तसे भारतातील विविध राज्यातील सहकार क्षेत्रातील नेते, धोरणकर्ते सहकारी तज्ञ एकत्र आले होते. परिषदेमध्ये बारा देशातून प्रतिनिधींनी सहभाग घेतला होता.
डॉ. यादव म्हणाल्या की, तीन दिवसीय चाललेल्या या परिषदेमध्ये सहकार क्षेत्रातील मान्यवरांनी मार्गदर्शन केले. सहकार क्षेत्रातील विचारांची देवाण घेवाण तसेच सहकार क्षेत्रातील विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. परिषदेच्या माध्यमातून भविष्यकाळात भारताबरोबर आशिया खंडातील देशांना याचा फायदा होणार आहे. सिकटॅब परिषदेच्या माध्यमातून ग्रामीण भागात देखील रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार असून वॅमनिकॉम संस्थेतील अनेक विद्यार्थ्यांना देशाच्या कानाकोपर्यात तसेच जगभरात त्यांना सहकार क्षेत्रात रोजगार मिळणार आहे. सूत्रसंचालन सोनल कदम यांनी आणि आभार डॉ. शंतनू घोष यांनी मानले.
Leave a Reply