सहकारातून समृद्धीकडे नेणारा प्रकाश!

सहकारातून समृद्धीकडे नेणारा प्रकाश!

दिवाळी हा केवळ दिव्यांचा उत्सव नाही, तर तो प्रकाश, आनंद, एकोपा आणि नवसर्जनाचा उत्सव आहे. अंधारावर प्रकाशाचा, अन्यायावर सत्याचा आणि स्वार्थावर सामूहिकतेचा विजय – हीच या उत्सवाची ओळख आहे! दिवाळीत आपण सर्व काही उजळवतो. त्याचप्रमाणे सहकार चळवळ समाजातील प्रत्येक घटकाला विकासाच्या प्रवाहात आणण्याचा प्रयत्न करते, त्याचे जीवनमान उजळवण्याचा प्रयत्न करते. दिवाळीत आपण कुटुंबासह आनंद साजरा करतो; सहकार आपल्याला समाजासह आनंद वाटण्याची प्रेरणा देतो. दोन्हींचा केंद्रबिंदू एकच आहे, तो म्हणजे आपण सगळे मिळूनच अंधारावर मात करुन सर्वांना प्रकाश देऊ या. दिवाळीचा दीप घर उजळवतो, सहकाराचा दीप समाज उजळवतो, असे या दिपोत्सवाच्या निमित्ताने म्हणावेसे वाटते.

सहकार म्हणजे एकत्र येऊन, विश्‍वासाच्या बळावर, परस्पर साहाय्याने विकासाचा मार्ग तयार करणे. ग्रामीण भागातील शेतकरी, कामगार, महिला अशा सर्वसामान्यांनी जेव्हा सहकाराच्या तत्त्वावर संस्था उभारल्या, तेव्हा त्या केवळ आर्थिक व्यवहारापुरत्या मर्यादित राहिल्या नाहीत; तर त्या समाजकार्य, शिक्षण, स्वावलंबन आणि सामाजिक समरसतेच्या संस्था झाल्या. साखर, दूध, बँकिंग, वस्त्र, शेती, शिक्षण – प्रत्येक क्षेत्रात सहकाराने सामान्य माणसाला उभारी दिली आणि आर्थिक प्रवाहात सामील केले. हेच दिवाळीच्या तेजासारखे समाजजीवन उजळविणारे कार्य आहे. सहकार म्हणजे केवळ संस्था नव्हे, तर लोकशाहीतील सामाजिक अर्थशास्त्र आहे. एकासाठी सर्व आणि सर्वांसाठी एक ही तत्त्वे या चळवळीची ओळख आहेत. नफा हा उद्देश नसून सदस्यांचा परस्पर विकास हेच ध्येयवाक्य! त्यामुळे सहकारी संस्था ही सामाजिक जबाबदारी आणि आर्थिक स्वावलंबन यांचा संगम आहे.

सन 1978 मध्ये सहकार चळवळीच्या वृद्धि आणि शुद्धीसाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रेरणेने सहकार भारती या स्वयंसेवी संघटनेचे कार्य सुरु झाले, जे आज संपूर्ण देशभर पसरले आहे. ‘बिना संस्कार नहीं सहकार, बिना सहकार नहीं उद्धार हे ब्रीद घेवून गेली 47 वर्षे सहकार भारती अविरतपणे कार्यरत आहे. रा. स्व. संघाच्या शताब्दी वर्षात यंदाची दिवाळी साजरी होत आहे. संघाच्या प्रेरणेने गेल्या 100 वर्षात विविध प्रकारच्या सामाजिक, आर्थिक, राजकीय अशा सर्वच स्तरावर विविध संस्था, संघटना सुरु झाल्या. त्यातीलच एक म्हणजे सहकार चळवळीत काम करणारी सहकार भारती! संघाचे द्वितीय सरसंघचालक प.पू. गोळवलकर गुरुजींनी एक मूलमंत्र दिला, तो म्हणजे – मै नहीं, तु ही! याचाच अर्थ सहकारातील प्रत्येक सभासद, प्रत्येक कार्यकर्ता आणि प्रत्येक संस्था जेव्हा वैयक्तिक (मी) नाही, तर सामुहिक (आपण) या भावनेने काम करेल तेव्हा खर्‍या अर्थाने सहकारातून समृद्धी साकारतांना दिसेल.

भारत आज जगातील पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहे आणि भारताचा जीडीपी 4 ट्रिलियन डॉलरच्या उंबरठ्यावर आहे. या वाढीच्या प्रवासात सहकार क्षेत्राचे योगदान निश्‍चितच मोठे आहे. आज देशात साडेआठ लाखांहून अधिक सहकारी संस्था कार्यरत असून, त्यांचे थेट किंवा अप्रत्यक्ष 25 कोटी सभासद आहेत. कृषी उत्पादन, साखर उद्योग, दुध व दुग्धजन्य उत्पादने, सूतगिरण्या, शेतमाल विपणन, सहकारी बँका आणि पतसंस्था या क्षेत्रांत सहकाराचा सुमारे 25-30% इतका वाटा आहे. महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, केरळ, तमिळनाडू या राज्यांनी या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. देशातील एकूण साखर उत्पादनांपैकी सुमारे 60% उत्पादन सहकारी साखर कारखान्यांतून होते. अमूल, इफ्को सारख्या ब्रँडने तर सहकाराची जागतिक ओळख निर्माण केली आहे. सहकार क्षेत्राने केवळ उत्पादनच नाही, तर समान वितरण, न्याय्य किंमती आणि ग्रामीण रोजगार निर्मितीसाठीही मोठे योगदान दिले आहे. ‘आत्मनिर्भर भारत’ साध्य करण्यासाठी केवळ मोठ्या उद्योगांचीच नाही, तर लघु व मध्यम घटकांचीही गरज आहे. ग्रामीण उद्योजकता, कृषी प्रक्रिया उद्योग, दुध व दुग्धजन्य व्यवसाय, ग्रामीण बँकिंग या सर्व क्षेत्रांमध्ये सहकार हा सर्वांत महत्त्वपूर्ण घटक आहे.

आजच्या जागतिकीकरणाच्या आणि तंत्रज्ञानाच्या युगात सहकार चळवळीपुढे आव्हाने आहेत तशाच संधी देखील अनेक आहेत. पारदर्शकता, डिजिटल रूपांतरण, तरुणांचा सहभाग आणि व्यावसायिक व्यवस्थापन – या चार स्तंभांवर नवीन सहकारी क्रांती उभी राहात आहे. दिवाळीप्रमाणेच सहकारालाही नव्या आव्हानांची संधी आहे. या प्रकाशपर्वात जर प्रत्येक सहकारी संस्थेने आत्मपरीक्षण करून नवा संकल्प केला, तर समाजाच्या आर्थिक आणि सामाजिक विकासाचा दीप पुन्हा तेजोमय होईल.

सहकार सुगंधचे वाचक, जाहिरातदार, हितचिंतक आणि सहकार चळवळीतील सर्व कार्यकर्त्यांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा ! जय सहकार!

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *