विकास सहकारी सोसायट्या सक्षम करण्याची प्रक्रिया वेगाने सुरु

मुंबई – देशभरातील विकास सहकारी सोसायटी अधिक बळकट करण्याच्या दृष्टीने केंद्रीय सहकार मंत्रालयाने घेतलेल्या महत्त्वपूर्ण निर्णयाचा दृश्य परिणाम आता दिसू लागला आहे. त्याचा एक भाग म्हणून महाराष्ट्रातील जवळपास 10,914 विकास सोसायटीकडून याबाबतची प्रत्यक्ष कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.
या विषयाबाबतची नुकतीच एक बैठक मुंबईत झाली. यावेळी केंद्रीय सहकार सचिव डॉ. आशिशकुमार भूटाणी उपस्थित होते. या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी त्या त्या राज्याच्या मुख्य सचिवाच्या अध्यक्षतेखाली एक समिती तयार करण्यात आली आहे. केंद्रीय सहकार मंत्रालयाच्या कार्यक्रमानुसार सोसायट्यांना अन्य पूरक व्यवसाय करण्याची मुभा मिळाली आहे. राज्यात सध्या 21 हजार सोसायट्या कार्यरत असून त्यातील सुमारे 12 हजार सोसायट्यांना येत्या 5 वर्षांत सक्षम करण्याचे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे.
पीक कर्ज वाटप हे काम मुख्यत्वे सोसायट्याच्या माध्यमातून करण्यात येत होते पण आता बदलत्या काळात गरजेनुसार अन्य व्यवसाय करता येणार आहेत. जन औषधी केंद्र, खत विक्री केंद्र, आदी व्यवसाय करता येणार आहेत. तसेच सोसायट्यांचे संगणकीकरण यावरदेखील भर देण्यात येत आहे. आजवर राज्यातील 92 टक्के सोसायट्यांचे संगणकीकरण पूर्ण करण्यात आले आहे. शेतमाल बाजारपेठ तयार व्हावी यासाठी नॅशनल को-ऑप. एक्स्पोर्ट सोसायटी स्थापन केली आहे. राज्यातील 980 सोसायट्यांनी त्याचे सदस्यत्व घेतले असल्याची माहिती यावेळी सांगण्यात आली.