सहकार भारती डेअरी प्रकोष्ट आयोजित
दूध व्यवसायाच्या प्रगतीसाठी राष्ट्रीय अधिवेशनात व्यापक चर्चा

गुजरात – आणंद – सहकार भारती डेअरी प्रकोष्टाच्या वतीने दोन दिवसीय राष्ट्रीय अधिवेशन येथे नुकतेच पार पडले. दोन दिवसीय अधिवेशनात दुधाची गुणवत्ता, ती वाढविण्यासाठी उपाययोजना आदी विषयावर व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले होते.
गुजरातचे सहकार मंत्री जगदीश विश्वकर्मा, अमूल दुध संघाचे अध्यक्ष विपुलभाई पटेल, एनडीडीबी अध्यक्ष मीनेश शाह, गुजरात विधानसभा अध्यक्ष शंकर चौधरी, सहकार भारतीचे राष्ट्रीय महामंत्री दीपक चौरासिया राष्ट्रीय प्रकोष्ट प्रमुख देवेंद्र शर्मा आदी पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते.
दोन दिवासीय परिषदेचा प्रारंभ पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून झाला. परिषदेच्या पहिल्या सत्रात गुजरात विधानसभा अध्यक्ष शंकर चौधरी यांनी यशोगाथाच्या माध्यमातून प्रत्यक्ष कार्य करताना आलेले अनुभव मांडले, तर दुसर्या सत्रात दुधाची उत्पादकता आणि त्याची गुणवत्ता वाढीसाठी कोणती उपाययोजना करता येणे शक्य आहे, यावर व्यापक प्रमाणात चर्चा करण्यात आली. तसेच तिसर्या सत्रात आनंद कृषी विश्व विद्यालयाचे कुलपती कटारिया यांनी स्वदेशी गायी तर त्यानंतर गोपाल यांनी कृषि क्षेत्रातील दुग्ध व्यवसाय याविषयी भाष्य केले.
आजवरच्या अमूल उद्योग समुहाच्या यशस्वी वाटचालीची माहिती प्रबंध निदेशक जयेन मेहता यांनी सांगितली. तसेच या क्षेत्रात काम करताना अमूल समूह हा शेतकर्यांच्या आणि दूध व्यवसायात कशा प्रकारे सहाय्यभूत होऊ शकेल याबाबत सविस्तर विवेचन केले. तसेच या विषयासंबंधी उपस्थित करण्यात आलेल्या प्रश्नांना त्यांनी समर्पक उत्तरे दिली. अधिवेशनाच्या समारोप सत्रात सहकार भारतीचे राष्ट्रीय संघटन मंत्री संजय पांचपोर यांनी सहकाराच्या माध्यमातून व्यवसायामध्ये कशाप्रकारे वाढ करता येईल याबाबत सविस्तर विवेचन केले.
अधिवेशनासाठी देशाच्या विविध राज्यातून दूध उत्पादक व्यावसायिक सहकार भारतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. तसेच दूध व्यवसायाच्या क्षेत्रात यशस्वीपणे कार्यरत असणार्या गायित्री बेन, मित्तल बेन, मिना बेन आणि या क्षेत्रातील उद्योजक महिलांनी यशस्वी वाटचालीचे अनुभव सांगितले.
दोन दिवसीय राष्ट्रीय अधिवेशनात एकूणच दूध उत्पादन, त्याची गुणवत्ता, उपपदार्थ निर्मिती बाजारपेठेची मागणी अशा विविध बाबींंवर विचार विनिमय करण्यात आला.