सहकारी बँकांनी सायबर सुरक्षतेबाबत सक्षम यंत्रणा करावी – आरबीआय गव्हर्नर मल्होत्रा

मुंबई – ठेवीदारांच्या आणि ग्राहकांच्या विश्वासाला प्राधान्य देण्याबरोबर सहकारी बँकांनी माहिती तंत्रज्ञान आणि सायबर सुरक्षेबाबत सक्षम यंत्रणा कार्यान्वित करण्याची गरज असल्याचे आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी सहकारी बँकाच्या विशेष संयुक्त बैठकीत सांगितले. निवडक सहकारी बँकांचे पदाधिकारी आणि राष्ट्रीय स्तरावरील संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते. नूतन पदाची सूत्रे स्विकारल्यानंतर त्यांनी नागरी सहकारी बँकेच्या पदाधिकार्यांशी संवाद साधला.
नॅशनल अर्बन को-ऑप. फायनान्स अँड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनचे अध्यक्ष ज्योतिंद्रभाई मेहता, नॅशनल फेडरेशन ऑफ अर्बन को-ऑप. बँक्स अँड क्रेडिट सोसायटीचे उपाध्यक्ष मिलिंद काळे तसेच सारस्वत को-ऑप. बँक अध्यक्ष गौतम ठाकुर, एसव्हीसी को-ऑप. बँक अध्यक्ष दुरेश चंद्रावकर, कॉसमॉस सहकारी बँक अध्यक्ष प्रल्हाद कोकरे, टीजेएसबी बँक अध्यक्ष शरद गांगल, जनता सहकारी बँक अध्यक्ष रविंद्र हेजीब, विशाखापट्टणम् को-ऑप. बँक अध्यक्ष राघवेंद्र राव, माणदेशी महिला सहकारी बँक अध्यक्षा चेतना सिन्हा, डोंबिवली नागरी सहकारी बँक अध्यक्ष गणेश धारगलकरे तसेच अन्य सहकारी बँकांचे पदाधिकारी आणि आरबीआयचे डेप्युटी गव्हर्नर एम. राजेश्वर राव आणि स्वामिनाथन जे आणि कार्यकारी संचालक उपस्थित होते.
गव्हर्नर मल्होत्रा यांनी आरबीआयच्या भूमिकेचा पुनरुच्चार करून सांगितले की, नागरी सहकारी बँकांनी ग्राहक सेवेच्या सर्व मानकांचे पालन करावे. तळागाळातील आर्थिक समावेशनाला चालना देण्यासाठी सहकारी बँकांनी बजावलेल्या भूमिकेचे त्यांनी स्वागत केले. या क्षेत्रासमोरील नियामक आणि कार्यात्मक आव्हानाबाबत त्यांनी यावेळी सूचना देण्याचे आवाहन केले. तसेच ग्राहक सेवा आणि ठेवीदार यांच्या विश्वासाला टाडा जाणार नाही याची काळजी घेण्यात यावी.
यावेळी मेहता यांनी सांगितले की, आरबीआय आणि नागरी सहकारी बँक यांच्यातील चर्चा अतिशय सकारात्मक आणि यशस्वी झाली. नागरी सहकारी बँकांसमोरील विविध समस्या आणि त्यावरील उपाययोजना याबाबत सविस्तर चर्चा झाली.