अर्थसंकल्पातील सहकार क्षेत्राच्या तरतुदींबद्दल संमिश्र प्रतिक्रिया

विकास संस्था व सहकार खात्याच्या संगणकीकरणावर भर -
केंद्र सरकारच्या नुकत्याच सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पात ग्रामीण भागातील विकास सहकारी संस्था तसेच केंद्र आणि राज्य शासनाच्या अखत्यारीत असणार्या सहकार कार्यालयाचे संगणकीकरणावर विशेष भर देण्यात आला आहे आणि त्यासाठी वाढीव तरतूद देखील करण्यात आली आहे. मात्र सहकार क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी सुचविण्यात आलेल्या सूचनांकडे दुर्लक्ष झाले आहे. तसेच सहकार क्षेत्राच्या विकासासाठी कोणतीही भरीव तरतूद करण्यात आली नाही.
– डॉ. उदय जोशी, राष्ट्रीय अध्यक्ष, सहकार भारती
सर्व समावेशक अर्थसंकल्प -
अर्थसंकल्पाचे वर्णन सर्वसमावेशक अर्थसंकल्प असे करता येईल. या अर्थसंकल्पात समाजातील प्रत्येक घटकाला काही ना काही देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. किसान क्रेडिट कार्डची मर्यादा पाच लाख रुपयांपर्यंत वाढवून शेतकरी वर्गाला मोठ्या प्रमाणावर दिलासा देण्यात आला आहे.
– अभय मंडलिक, बँकिंग तज्ञ
ग्रामीण अर्थव्यवस्था सक्षम करणारा अर्थसंकल्प -
ग्रामीण अर्थव्यवस्था सक्षम करणारा अर्थसंकल्प केंद्र सरकारने सादर केला असून सहकार क्षेत्राला बळकटी देणारा आहे. ग्रामीण भागात सहकार क्षेत्राचा मोठा वाटा असून देशाची अर्थव्यवस्था सक्षम करण्यासाठी अर्थसंकल्पात सहकाराला विशेष प्राधान्य देण्यात आले आहे. त्यासाठी 1186 कोटीची तरतूद करण्यात आली आहे. तसेच संगणकीकरणावर भर देताना 560 कोटीची तरतूद करण्यात आली आहे आणि राष्ट्रीय सहकार विभाग निगमसाठी 500 कोटीची तरतूद करण्यात आली आहे.
– विवेक जुगादे, महामंत्री, प्रदेश सहकार भारती
जिल्हा आणि सहकारी बँक सक्षम होतील -
ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत होण्याच्या दिशेने सरकारची वाटचाल होत असून सहकार क्षेत्रातील त्रिस्तरीय पतसंरचना सुदृढ होईल. शेतकर्यांच्या उत्पन्नात वाढ झाल्याने विविध कार्यकारी संस्था आणि राज्य सहकारी बँका सक्षम होतील. तसेच अडचणीतील सहकारी संस्थांना फायदा होऊ शकेल. यंदाचे वर्ष हे आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष म्हणून युनोने जाहीर केले आहे. त्यामुळे सहकार क्षेत्राच्या सक्षमीकरणासाठी थेट सवलती मिळतील अशी अपेक्षा होती. राष्ट्रीय सहकार विकास
महामंडळास सरकारने वित्तपुरवठा करण्याचे धोरण स्विकारले आहे. त्यामुळे सर्व सहकारी संस्थांना त्याचा फायदा होईल.
– विद्याधर अनास्कर, राज्य सहकार बँक प्रशासकीय मंडळ अध्यक्ष
किसान क्रेडिट कार्डची मर्यादा वाढविली -
किसान क्रेडिट कार्ड योजनेची मर्यादा तीन लाख रूपयावरून पांच लाख रुपये करण्याचा निर्णय स्वागतार्ह असून यामुळे सध्याची नियमित कर्ज परतफेड करणार्या शेतकर्यांना तीन लाख रुपयांपर्यंतचे कर्ज शून्य टक्के दराने उपलब्ध
होणार आहे. राज्य शासनाने अर्थसंकल्पात पांच लाख पीक कर्ज शून्य टक्के दराने उपलब्ध होण्यासाठी तरतूद करावी त्यामुळे शेतीला अर्थपुरवठा वाढविण्यात यश येणार आहे
– प्रा. दिगंबर दुर्गाडे, अध्यक्ष, पुणे जिल्हा सहकारी बँक
साखरेचा किमान विक्री दर इथेनॉल खरेदी बाबत सुतोवाच नाही-
साखरेचा किमान विक्री दर आणि इथेनोल खरेदी याबाबत अर्थसंकल्पात कोणतेच सुतोवाच झाले नाही. त्यामुळे सहकार क्षेत्रातला मोठा उद्योग असणार्या साखर उद्योगाची निराशा झाली आहे. तसेच ऊसतोडणी मजुरांचे प्रश्न ऊस तोडणी यंत्र अनुदान याबाबत दिलासा नाही. साखर उद्योगाच्या हाती काहीच लागले नाही. ऊस शेतीमध्ये एआयच्या वापरासाठी करण्यात आलेल्या आर्थिक तरतुदीचा निर्णय चांगला आहे.
– संजय खताळ, राज्य सहकारी साखर कारखाना संघ व्यवस्थापकीय संचालक
ऊस तोडणी यांत्रिकीकरणांबाबत भाष्य ?
कृषि क्षेत्राबाबतच्या घोषणा आशादायक असूनही साखर उद्योगाची निराशा झाली आहे. बायो सीएनजी आणि इथेनॉल या प्रदूषण विरहित इंधनावर चालणार्या वाहनांना जीएसटी करात सवलत देण्याची मागणी जुनी आहे. त्यावर निर्णय नाही. उसाची एफआरपी वाढत असतांना गेली पांच वर्षे साखरेच्या किमान विक्री दरात वाढ झाली नाही. इथेनॉल किंमत लिटर मागे 5 रुपयांनी वाढणे आवश्यक होते, पण
त्याबाबत काही झाले नाही.
– बी. बी. ठोंबरे, अध्यक्ष -विस्मा.
सवलत अपेक्षित होती -
सहकारी साखर कारखाने, सहकारी बँका, पतसंस्था, ग्राहक भांडारे यांना अर्थसंकल्पात काही प्रमाणात सवलती अपेक्षित होती. मात्र त्याबाबत प्रत्यक्ष काही झाले नाही.
– सूर्यकांत पाठक, कार्यकारी संचालक ग्राहक पेठ
दुग्धजन्य पदार्थावरील करात सवलत नाही -
अर्थसंकल्पात दुग्धजन्य पदार्थावरील जीएसटी करात कोणतीच सवलत देण्यात आली नाही अथवा कोणतीही घोषणा नाही. त्यामुळे दुग्ध व्यवसायाचा अपेक्षाभंग झाला आहे. शेतीला प्रोत्साहन देणारा हा व्यवसाय करमुक्त होण्यासाठी धोरणात्मक
निर्णय होणे अपेक्षित होते. खरे तर दूध उत्पादक शेतकर्यांना बळकटी देण्याची गरज होती. कारण हा हा व्यवसाय शेतीला जोडधंदा म्हणून पहिलं जातो
– गोपाळ म्हस्के, अध्यक्ष राज्य सहकारी दूध उत्पादक प्रक्रिया संघ
सकारात्मक अर्थसंकल्प -
केंद्र सरकारने नुकताच सादर केलेला अर्थसंकल्प हा सकारात्मक असूनही सहकार क्षेत्राबाबत अथवा जीएसटीबाबत काही स्वतंत्र घोषणा होणे अपेक्षित होते, मात्र तसे काही झाले नाही. याखेरीज अन्य विषयावरील तरतुदी योग्य आहेत.
– सुशील जाधव, लोकमान्य मल्टिपर्पज सोसायटी पुणे विभाग प्रमुख.
Related Post
- आंतरराष्ट्रीय सहकार वर्षाच्या निमित्ताने.....
- नागरी सहकारी बँकांच्या सहाय्यासाठी स्वतंत्र महामंडळ मुंबई, मालेगाव येथे अमित शहांकडून उद्घाटन
- देशभरात सहकार भारतीच्या विस्ताराबरोबरच प्रशिक्षण सुविधा उपलब्ध करणार : सहकार भारती राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. उदय जोशी
- केंद्रीय अर्थसंकल्पावरील प्रतिक्रिया
- सहकार भारती महाराष्ट्र प्रदेशच्या माजी अध्यक्षा डॉ. शशिताई अहिरे यांचे निधन
- सहकार भारतीच्या संघटनात्मक बांधणीसाठी अखेरपर्यंत डॉ.शशिताई अहिरे यांचे योगदान - सतीश मराठे
- आंतरराष्ट्रीय सहकार वर्षानिमित्ताने राज्यभरात सहकार दिंडीने उत्साह
- मा श्री सतीशजी मराठे अमृत महोत्सव समारंभ....
Related Posts

सहकार भारती महाराष्ट्र प्रदेशच्या माजी अध्यक्षा…..
सहकार भारती महाराष्ट्र प्रदेशच्या माजी अध्यक्षा डॉ. शशिताई अहिरे यांचे…
नागरी सहकारी बँकांनी नियमांचे पालन करणे आवश्यक
नागरी सहकारी बँकांनी नियमांचे पालन करणे आवश्यक माजी केंद्रीय मंत्री…