Category: Blog

  • विवेकानंद नागरी सहकारी प्रत्यय संस्थेने ओलांडला 100 कोटी ठेवींचा टप्पा

    विवेकानंद नागरी सहकारी प्रत्यय संस्थेने ओलांडला 100 कोटी ठेवींचा टप्पा

    नागपूर – येथील विवेकानंद नागरी सहकारी प्रत्यय संस्थेची आढावा व नियोजन बैठक झाली. बैठकीमध्ये सर्व संचालक अधिकारी व कर्मचारी यांनी मागील आर्थिक वर्षातील प्रगतीचा आढावा घेत भविष्यातील कामाचे नियोजन केले.

    संस्थेचे अध्यक्ष विवेक जुगादे यांनी सांगितले की, विवेकानंद सोसायटीच्या स्थापनेपासूनच संस्थेने वेगळेपण जपले आहे. यंदाच्या सन 24-25 आर्थिक वर्षात संस्थेने दमदार प्रगती केली असून संस्थेच्या ठेवी, कर्ज व नफ्यात लक्षणीय वाढ झाली आहे. आर्थिक वर्षात 100 कोटींच्या ठेवींचा टप्पा गाठत एक नवा विक्रम प्रस्थापित केला आहे.

    संस्थेला यंदा 3 कोटींच्या वर ढोबळ नफा प्राप्त झाला आहे. सन 25-26 या आर्थिक वर्षात संस्थेचा एकूण व्यवसाय 180 कोटींच्या वर नेण्याचा संकल्प करण्यात आला.

    संचालक सुधीर दप्तरी, कल्याण दिवाण, मधु गौर, विवेक बापट, श्रीकांत आगलावे, विवेक धाक्रस, डॉ. राधिका मुरकुटे, डॉ. माधुरी इंदूरकर दीपक बारड, राहुल वेलंकीवार, मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद गोंधळेकर यांसह संस्थेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

    मागील आर्थिक वर्षात संस्थेच्या प्रगतीसाठी विशेष योगदान देणारे संस्थेचे कर्मचारी सतीश धापोडकर, ब्रजेश जोशी, मीनल दंदे यांना सन्मानित करण्यात आले.

  • सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांमध्ये बेरोजगाराची समस्या कमी करण्याची क्षमता : राष्ट्रीय बँक परिषदेत व्यापक चर्चा

    सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांमध्ये बेरोजगाराची समस्या कमी करण्याची क्षमता : राष्ट्रीय बँक परिषदेत व्यापक चर्चा

    पुणे – देशातील बेरोजगाराची समस्या कमी करण्याची क्षमता सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगामध्ये असून सर्वाधिक रोजगार निर्माण करणारे क्षेत्र म्हणून या क्षेत्राकडे पाहण्यात येईल, असे मत राज्य सहकारी बँकेचे प्रशासक आणि बँकिंग तज्ञ विद्याधर अनास्कर यांनी सांगितले.

    सहकार भारती, अर्थ संवाद आणि ग्लोबल इंडियन ओरिजिन नेटवर्क यांच्या संयुक्त विद्यमाने बँकिंग अँन्ड एमएसएमई सेक्टर कनक्लेव्ह या विषयावरील एक दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. व्यासपीठावर जेष्ठ उद्योजक राम भोगले, विश्‍वेश कुलकर्णी, इंद्रनील चितळे, प्रवीण बढेकर आणि सहकार भारती पुणे महानगर अध्यक्ष दिनेश गांधी उपस्थित होते.

    देशामध्ये युवकांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे, असे नमूद करून ते म्हणाले, सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्र हा अर्थव्यवस्थेचा महत्वाचा कणा आहे. यामुळे देशाच्या अर्थ व्यवस्थेला अधिक गती मिळणार आहे. बांधकाम उद्योगास कर्ज देण्यासाठी सहकारी बँका तयार असतात. मात्र आरबीआयने प्राधान्यक्रम क्षेत्रात बांधकाम क्षेत्राचा विचार करण्यात आला नाही, पण बँकाच्या सुरक्षिततेसाठी बांधकाम क्षेत्राला कर्ज पुरवठा हा सुरक्षित आहे, पण आरबीआयच्या भूमिकेमुळे ते शक्य होत नाही.

    * उद्योग व्यवसाय हा बंधन मुक्त करण्याची  गरज –

    देशातील उद्योग व्यवसाय हा बंधन मुक्त करण्याची गरज जेष्ठ उद्योगपती अभय फिरोदिया यांनी बोलताना व्यक्त केली. ते म्हणाले, देशातील शेतकरी वर्ग हा अन्नदाता आहे, तसा मतदाता आहे. त्यांना आवश्यक त्या सर्व सुविधा देण्याची आवश्यकता आहे. तसेच देशातील उद्योग व्यवसाय क्षेत्र बंधन मुक्त करण्याची तितकीच आवश्यकता आहे, तरच व्यवसाय विकसित होण्यास हातभार लागणार आहे. एखादा नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी सरकारची परवानगी आवश्यक असते. मात्र याबाबत सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग संघटनेने केंद्र आणि राज्य शासनाकडे मागण्यांबाबत पाठपुरावा करण्याची आवश्यकता आहे. तसेच या क्षेत्राबाबतच्या  धोरणात आवश्यक ते बदल करण्यासाठी पाठपुरावा करण्याची तयारी ठेवली पाहिजे.

    परिषदेच्या आयोजनामागची भूमिका सहकार भारती पुणे महानगर अध्यक्ष गांधी यांनी मांडली. डॉ. केतन जोगळेकर यांनी प्रास्ताविक आणि ममता क्षेमकल्याणी यांनी आभार मानले.