Category: Blog

  • नागरी सहकारी बँकांनी नियमांचे पालन करणे आवश्यक

    नागरी सहकारी बँकांनी नियमांचे पालन करणे आवश्यक

    माजी केंद्रीय मंत्री जॉर्ज फर्नांडिस यांनी स्थापन केलेली न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँक या बँकेवर रिझर्व बँकेने नुकतीच बंधने घातली आहेत. या बँकेबद्दल वृत्तपत्रात आणि समाज माध्यमांवर ज्या बातम्या आलेल्या आहेत, त्यावरून बँकिंगबाबतचे सर्वसामान्य नियम पाळले गेले नाहीत, असे दुर्दैवाने दिसते.

    बँकेचे अंतर्गत लेखा परीक्षक, वैधानिक लेखापरीक्षक आणि काही प्रमाणात रिझर्व बँकेचे तपासणी अधिकारी या सर्वांच्या भूमिकांबद्दल वृत्तपत्रे आणि समाज माध्यमातून टीका करण्यात आलेली आहे. बँकेची परिस्थिती वाईट असताना नियामक या नात्याने ही परिस्थिती सुधारण्याऐवजी ठेवीदारांना त्यांचे हक्काचे पैसे मिळणे बंद झाले, यावर तीव्र स्वरूपाच्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. याचा परिणाम म्हणून नुकतेच रिझर्व बँकेने निर्बंधामध्ये सुधारणा केली असून रुपये 25000 पर्यंतची रक्कम एकदा काढण्याची ठेवीदारांना मुभा दिली आहे.

    हा निर्णय आधीही घेता येऊ शकला असता! डी.आय.सी.जी.सी.कडून पाच लाख रुपयांपर्यंतच्या ठेवी असणार्‍यांना 90 दिवसांत पैसे मिळतील असे जाहीर झालेले आहे. डीआयसीजीसीचा याबाबतीतला अलिकडचा अनुभव लक्षात घेता हे पैसे मिळण्यास यापेक्षा अधिक कालावधीही लागू शकतो. या व्यतिरिक्त संस्थात्मक ठेवी, तसेच पाच लाख रुपयांच्यावर ज्यांनी ठेवी ठेवल्या आहेत अशा ठेवीदारांना सध्या तरी कोणताही दिलासा देण्यात आलेला नाही. अशाप्रकारे निर्बंध घातलेल्या बँकांचे यापूर्वीचे अनुभव संस्थात्मक ठेवींसाठी आणि नंतर अवसायक नेमल्यानंतरही, ठेवी ठेवणार्‍यांच्या बाबतीत अत्यंत प्रतिकूल स्वरूपाचे आहेत. पाच लाख रुपयांच्यावर ज्यांच्या ठेवी आहेत आणि ज्या संस्थांच्या ठेवी आहेत अशा ठेवीदारांना ज्या दिव्यातून जावे लागते त्याबद्दल फक्त कल्पना करता येते. रिझर्व बँक, डी.आय.सी.जी.सी. आणि अगदी अर्थमंत्रालय देखील याबाबतीत फारशी अनुकूल भूमिका घेताना दिसत नाही.

    * नागरी सहकारी बँकांवर परिणाम –

    एखाद्या नागरी सहकारी बँकेवर रिझर्व बँकेने निर्बंध जारी केल्यानंतर त्या परिसरातील सर्व नागरी सहकारी बँकांवर त्याचा दृश्य परिणाम होतो. ठेवी कमी होतात, खातेदारांच्या विश्‍वासाला तडा जातो. बँकिंगमधील सहकारी बँक या प्रारूपाला धक्का बसतो, सहकाराबाबत उलट सुलट विचार येतात, परिणामी नागरी सहकारी बँकांच्या व्यवसायावर प्रतिकूल परिणाम होतो. न्यू इंडिया बँकेबद्दल आलेल्या बातम्यांच्या अनुषंगाने नागरी सहकारी बँकांनी सिस्टिम आणि प्रोसिजर बाबत अत्यंत काटेकोर राहण्याची गरज आहे.

    कागदावरील नियम प्रत्यक्ष पाळले जातात की नाही हे बघण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा असली पाहिजे. रोख रकमेच्या बाबतीत एवढी मोठी रोख रक्कम बँकेमध्ये का ठेवण्यात आली असेल हा एक साधा प्रश्‍न पडतो. शिल्लक रोख रक्कम ठराविक अंतराने तपासून ती पुस्तकाप्रमाणे जुळत असल्याबाबत खात्री करण्याची बँकांची पूर्वापार पद्धत आहे. या सोबतच काँकरंट ऑडिटर, स्टॅच्यूटरी ऑडिटर्स यांनी रोखरक्कम मोजून प्रत्यक्ष तपासणी करणे अपेक्षित असते. या प्रकारचे सर्व नियम सर्व बँकात असूनही हे नियम कागदावर राहिलेले असावेत, असे दिसते. यातून घ्यावयाचा धडा म्हणजे हे काम प्रत्यक्ष होत असल्याची खात्री करून घेणे गरजेचे आहे.

    ऑपरेशनल बँकिंगमध्ये एकाचे काम दुसर्‍याने तपासण्याची नियमित पद्धत आहे.

    हे नक्की होत आहे याची खात्री करण्याची गरज निर्माण झाली आहे. गरजेप्रमाणे तपासणी करणारे आलटून पालटून बदलणेही आवश्यक आहे. ठराविक काळानंतर नंतर काउंटर्स बदलणे आवश्यक आहे. या नियमाची काटेकोर अंमलबजावणी झाली पाहिजे.

    थोडक्यात मूलभूत नियमांची अंमलबजावणी व्यवस्थित होत असल्याची खात्री करणे हे आवश्यक आहे. शाखा पातळीवरील होत असलेल्या व्यवहारांमध्ये सर्व नियम व्यवस्थित पाळले जावेत हा धडा या घटनेमधून सर्व बँकांनी घेणे गरजेचे आहे.

    – डॉ. अभय मंडलिक

    (लेखक खामगाव अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेचे

    संचालक व बँकिंग क्षेत्राचे अभ्यासक आहेत.)

  • सहकारी बँकांकडे पाहण्याचा रिझर्व्ह बँकेचा दृष्टीकोन सकारात्मक – सतीश मराठे

    महाबळेश्‍वर – सहकारी बँकांच्या माध्यमांतून समाजाच्या तळागाळातील लोक बँकिंग क्षेत्राशी जोडले जातात. कोरोनानंतरच्या काळात सहकारी बँकांच्या कर्जवसुलीवर परिणाम झालेला आहे. त्यामुळे सहकारी बँकांची आर्थिक स्थिती कमकुवत होते काय असा प्रश्‍न होता. मात्र सहकारी बँकाची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी प्रयत्नशील आहेत. या बँकांबाबतचा रिझर्व्ह बँकेचा दृष्टीकोन सकारात्मक आहे, असे भारतीय रिझर्व्ह बँकेचे संचालक सतीश मराठे यांनी सांगितले.

    सहकार भारती कोल्हापूर विभागाच्या वतीने सातारा, सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील नागरी बँकांचा महाबळेश्‍वर येथे प्रशिक्षण वर्ग पार पडला. यावेळी नागरी सहकारी बँकांचे पदाधिकारी, अधिकारी यांना मार्गदर्शन करताना मराठे बोलत होते. सहकार भारतीचे महामंत्री विवेक जुगादे, संघटक संजय परमने, सांगली अर्बन बँकेचे अध्यक्ष गणेश गाडगीळ, महाराष्ट्र सहकारी बँक्स असोसिएशनच्या उपाध्यक्षा वैशाली आवाडे, सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक राजेंद्र राजपुरे, सहकार विभागाचे जिल्हा उपनिबंधक संजय सुद्रीक, महाबळेश्‍वरचे सहाय्यक निबंधक क्षीरसागर उपस्थित होते.

    देशातील 1400 बँकांमध्ये एकही बँक पीसीएमध्ये (प्राँम्प्ट करेक्टिव्ह अँक्शन) नाही. ही समाधानकारक बाब आहे. असे नमूद करून ते म्हणाले, देशातील 55 कोटी सर्वसामान्यांची जनधन खाती नागरी सहकारी बँकांमध्ये आहेत, त्यामुळे सामान्यांना सहज बँकिंग सेवा उपलब्ध करून देणारी प्रणाली नागरी बँकांकडे आहे. देशातील 100 कोटींहून अधिक लोक मोबाईलचा वापर करतात तर 75 कोटी जनता इंटरनेट वापरत आहे. सायबर सिक्युरिटी ही बाब सर्वांना पाळावी लागणार आहे. सायबर घटना ही समस्या सरकारपुढे आव्हान निर्माण करीत आहे. नागरी सहकारी बँकांनी आपली टेक्नॉलॉजी वरचेवर अपग्रेड करणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे व्यवसाय वाढवून कर्मचारी खर्च व भांडवली खर्च कमी ठेवण्याचा प्रयत्न करावा, असे त्यांनी सांगितले.

    सहकारी बँकांमध्ये समन्वय ठेवून एकमेकांची टेक्नॉलॉजी वापरता येतेय का, ते पाहावे. मोठ्या बँकांनी छोट्या बँकांना माफक दराने टेक्नॉलॉजी उपलब्ध करून द्यावी. भारतीय रिझर्व्ह बँक जगभरातील मध्यवर्ती बँकांच्या तुलनेत चांगली कामगिरी करीत आहे. अनेक देशाच्या मध्यवर्ती बँका भारतीय रिझर्व्ह बँकेच्या तंत्राचा अभ्यास करण्यासाठी भारतात येत आहेत, ही देशाच्या दृष्टीने अभिमानाची बाब आहे. देशातील बँकांमध्ये ग्रॉस एनपीएचे प्रमाण 2 टक्क्यांपेक्षा कमी तर नेट एनपीए एक टक्क्यांपेक्षा कमी आहे. भारतात साडेसात लाख गावे आहेत. जगाच्या मानाने भारताने पेमेंट सिस्टिममध्ये खूप मोठी प्रगती केली आहे. त्यात दिवसेंदिवस वाढ होत असून टेक्नॉलॉजीमध्येही झपाट्याने बदल होत आहे. ज्या गतीने यामध्ये बदल होत आहे. ते पाहता येत्या चार-पाच वर्षांत बँकिंग क्षेत्राला प्रगती करण्यासाठी चांगला वाव आहे. संधी आहेत, त्या दृष्टीने सहकारी बँकांनी आपली दिशा ठरवली पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.

    रिझर्व्ह बँकेचे निवृत्त अधिकारी अविनाश जोशी यांनी सहकारी बँकांच्या बदलेल्या लेखापरीक्षणाची माहिती सांगितली. रिझर्व्ह बँकेने सहकारी बँकांच्या अंतर्गत व वैधानिक लेखापरीक्षणासाठीचे बदलेले परिपत्रक विस्तृतपणे उपस्थितांसमोर मांडले.

    वस्तू व सेवा करविभागाचे निवृत्त सहआयुक्त विद्याधर गोखले यांनी प्रतिनिधींना केवायसीबाबत दक्षता घेण्यास सांगितले. शासनाच्या प्रिव्हेन्शन आँफ मनी लाँडरिंग अ‍ॅक्टविषयी माहिती सांगितली. सहकार भारतीचे कोल्हापूर विभाग प्रमुख चंद्रकांत धुळप, सहप्रमुख नरेंद्र गांधी, सातारा जिल्हा अध्यक्ष डॉ. रवींद्र भोसले, प्रदिप दिक्षित, श्रीकांत पटवर्धन, धोंडीराम पागडे, दीपक बावळेकर, मल्हारी पेटकर, प्रशांत कात्रट, दत्तप्रसाद जाधव, दत्तात्रय पवार, विनायक भिसे, शशिकांत पवार आदींनी स्वागत केले. आनंद शेलार यांनी सूत्रसंचालन केले.