Category: Blog

  • Collective efforts are needed to increase the country’s GDP rate: RBI Director Satish Marathe’s expectation

    देशाचा जीडीपीचा दर वाढण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची आवश्यकता : आरबीआय संचालक सतीश मराठे यांची अपेक्षा

    सहकार भारती संस्थापक सदस्य आणि आरबीआय संचालक सतीश मराठे यांचा अमृत महोत्सवी सोहळा नुकताच येथे उत्साहात साजरा करण्यात आला. त्याविषयीचे सचित्र वृत्त…..

    पुणे – सहकार भारती संस्थापक सदस्य आणि आरबीआयचे संचालक सतीश मराठे यांच्या अमृत महोत्सवी सोहळ्याच्या निमित्ताने कॉसमॉस बँकेतील सभागृहात विशेष सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. सहकार भारतीचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. उदय जोशी, महाराष्ट्राचे माजी प्रदेशाध्यक्ष डॉ. मुकुंद तापकीर आणि विद्यमान महामंत्री विवेक जुगादे आणि सहकार भारतीचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच विविध सहकारी बँका, पतसंस्था साखर कारखाने, गृहनिर्माण संस्था शासकीय अधिकारी तसेच अन्य सहकारी संस्थेतील पदाधिकारी, अधिकारी आणि कार्यकर्ते यांनी मराठे यांना शुभेच्छा दिल्या.

    सहकार सुगंधचे संपादक भालचंद्र कुलकर्णी, कॉसमॉस बँकेचे माजी अध्यक्ष मिलिंद काळे आणि बुलढाणा सहकारी पतसंस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिरीष देशपांडे यांनी सोहळ्याचे नियोजन केले होते. यावेळी मराठे यांचे सुवासिनींनी औक्षण केले. त्यानंतर कॉसमॉस बँकेचे अध्यक्ष प्रल्हाद कोकरे आणि माजी अध्यक्ष मिलिंद काळे यांच्या हस्ते श्री. मराठे, डॉ. जोशी आणि डॉ. तापकीर यांचा पगडी प्रदान करून सन्मान करण्यात आला.

    आगामी काळात अर्थव्यवस्थेची गती वाढणार –

    मनोगत व्यक्त करताना मराठे यांनी सांगितले की, गेल्या 10 वर्षांच्या कालावधीत देशाची अर्थव्यवस्था गतिमान झाली आहे. तसेच आगामी किमान दहा वर्षे ही गती आणखी वाढणार आहे. मात्र त्याचप्रमाणे सर्वसामान्य जनतेचे उत्पन्न वाढण्याची गरज आहे. यासाठी सहकारी बँकांनी प्रामुख्याने ग्रामीण भागावर अधिक लक्ष देण्याची गरज आहे. कृषी प्रक्रिया, दूध व्यवसाय, पशुसंवर्धन याप्रमाणे सहकार क्षेत्रातील अन्य घटकांकडे जास्त लक्ष दिले पाहिजे. त्यामुळे सध्याचा जीडीपीचा जो दर आहे. त्यामध्ये वाढ होऊन तो किमान साडे आठ ते नऊ टक्के होऊ शकेल. तसेच ग्रामीण भागासाठी नवनवीन सेवा सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा बँकांनी पुढाकार घ्यायला हवा. कारण आगामी काही वर्षांत सहकार क्षेत्राचे महत्त्व मोठ्या प्रमाणावर वाढण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे.

    सहकारातील विविध व्यक्तीमत्त्वांची उपस्थिती –

    कार्यक्रमाला सहकार चळवळीतील अनेक मान्यवर उपस्थित होते. निवडणूक प्राधिकरण मुख्य आयुक्त अनिल कवडे माजी सहकार आयुक्त दिनेश ओउळकर कॉसमॉस बँक माजी अध्यक्ष मिलिंद काळे अधिकारी संजय खडके बँकिंग तज्ञ गणेश निमकर, अभय माटे, महाराष्ट्र गृहनिर्माण सहकारी संघाचे सुहास पटवर्धन, लेखक श्रीकांत जाधव, सुधीर पंडित अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे गोविंदराव कुलकर्णी लेखिका वंदना धर्माधिकारी, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ सहकार अध्यासनचे प्रमुख अनिल कारंजकर उद्यम सहकारी बँकेच्या उपाध्यक्ष अनास्कर तसेच योगिराज सहकारी पतसंस्था, पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक्स असोसिएशन, विश्‍वेश्‍वर सहकारी बँक सरस्वती महिला सहकारी पतसंस्था, महाराष्ट्र हाऊसिंग फेडरेशन, जनता सहकारी बँक, जनसेवा सहकारी बँक, राजगुरूनगर सहकारी बँक, पिंपरी चिंचवड सहकारी बँक, पुणे ऑडिटर्स असोसिएशन, श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखाना आदी संस्थांच्या पदाधिकारी, अधिकारी यांनी मराठे यांचा सन्मान करून शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्र संचालन सहकार सुगंध मासिकाचे संपादक भालचंद्र कुलकर्णी यांनी केले.

     

  • त्रिभुवन सहकार विद्यापीठाच्या निमित्ताने…

    त्रिभुवन सहकार विद्यापीठाच्या निमित्ताने…

    सहकारी संस्थांसाठी पात्र मनुष्यबळ निर्माण करण्याच्या उद्देशाने गुजरातमधील आणंद येथे ‘त्रिभुवन सहकार विद्यापीठ’ स्थापन करण्याच्या विधेयकाला नुकतीच राज्य सभेने मंजुरी दिली आहे आणि यावर राष्ट्रपतींची सही होऊन लवकरच या विद्यापीठाची पायाभरणी केली जाणार आहे. केंद्रात सहकार मंत्रालय स्थापन झाल्यापासून सहकार चळवळीसाठी अनेकविध चांगल्या गोष्टी घडत आहेत, त्यापैकीच ही एक!

    भारतातील सहकारी चळवळीच्या प्रणेत्यांपैकी एक आणि अमूलची पायाभरणी करण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे त्रिभुवनदास किशीभाई पटेल यांच्या नावावरून या विद्यापीठाचे नाव देण्यात आले आहे. हे सहकार क्षेत्रासाठीचे देशातील पहिले असे विद्यापीठ होणार आहे, जे या क्षेत्रातील मनुष्यबळाची क्षमता वाढवणे आणि कुशल व्यावसायिक निर्माण करणे ही गरज पूर्ण करेल. हे प्रस्तावित विद्यापीठ सहकार क्षेत्रातील कर्मचारी आणि संचालक मंडळातील सदस्यांच्या क्षमता बांधणीसाठी दीर्घकाळापासून प्रलंबित असलेल्या समस्येवर उपाययोजना करू शकेल, असा आत्मविश्‍वास केंद्रीय सहकारमंत्री अमितभाई शाह यांनी व्यक्त केला आहे.

    व्यवस्थापकीय, पर्यवेक्षी, प्रशासकीय, तांत्रिक आणि ऑपरेशनल अशा सहकारी संस्थांमध्ये विविध श्रेणीतील नोकर्‍यांसाठी व्यावसायिक पात्र मनुष्यबळाचा स्थिर, पुरेसा आणि दर्जेदार पुरवठा सुनिश्‍चित करण्यासाठी राष्ट्रीय विद्यापीठ स्थापन करून शिक्षण, प्रशिक्षण आणि संशोधनासाठी एक व्यापक, एकात्मिक आणि प्रमाणित रचना तयार करण्यासाठी या सहकार विद्यापीठाचा भविष्यात चांगला उपयोग होऊ शकेल. या त्रिभुवन सहकार विद्यापीठामार्फत सहकारी क्षेत्रात शिक्षण आणि प्रशिक्षण प्रदान करणे, युवा क्षमता निर्माण करणे, पदवी कार्यक्रम, दूरस्थ शिक्षण आणि ई-लर्निंग अभ्यासक्रम देणारी उत्कृष्टता केंद्रे स्थापन करण्याचे नियोजन आहे. दरवर्षी अंदाजे 8 लाख व्यक्तींना प्रशिक्षण देणे तसेच दुग्धव्यवसाय आणि मत्स्यव्यवसाय यासारख्या विशिष्ट क्षेत्राकरिता विशेष उपक्रम राबविण्याचे उद्दीष्ट या सहकार विद्यापीठाने निश्‍चित केले आहे. आज 50 टक्क्यांहून अधिक लोकसंख्या शेती व्यवसायात गुंतलेली आहे आणि साडेआठ लाखांपेक्षा अधिक सहकारी संस्था कार्यरत आहेत. या संस्थांशी सुमारे 30 कोटी लोक जोडलेले आहेत, ज्यांना या विद्यापीठाचा उपयोग निश्‍चितपणे होऊ शकेल.

    दि. 22 ऑक्टोबर 1903 रोजी गुजरातमधील आणंद येथे किशीभाई पटेल यांच्या पोटी जन्मलेले त्रिभुवनदास हे भारतीय स्वातंत्र्यसैनिक, वकील आणि राजकारणी होते. त्यांना भारतातील सहकार चळवळीचे जनक मानले जाते. 1946 मध्ये कैरा जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ आणि आनंद सहकारी चळवळीची स्थापना करण्यात त्यांचा पुढाकार होता.

    भारतीय स्वातंत्र्य चळवळी दरम्यान आणि विशेषतः सविनय कायदेभंग चळवळींमध्ये महात्मा गांधी आणि सरदार वल्लभभाई पटेल यांचे ते अनुयायी बनले. ज्यामुळे त्यांना सन 1930, 1935 आणि 1942 मध्ये वारंवार तुरुंगवास भोगावा लागला होता. सन 1940 च्या दशकाच्या अखेरीस, त्यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली खेडा जिल्ह्यातील शेतकर्‍यांसोबत काम करण्यास सुरुवात केली आणि सन 1946 मध्ये कैरा जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाची स्थापना केली. त्यानंतर सन 1950 मध्ये वर्गीस कुरियन यांना प्रमुखपदी नियुक्त केले. त्यांनी संघाच्या तांत्रिक आणि विपणन धोरणे विकसित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली, तेच आता अमूल नावाने जगभर ओळखले जाते. त्रिभुवनदास पटेल यांच्या नेतृत्वाखाली आणि मार्गदर्शनाखाली आणि वर्गीस कुरियन यांच्यासोबत, आणंदमध्ये गुजरात सहकारी दूध विपणन महासंघ, राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळ आणि ग्रामीण व्यवस्थापन संस्था यासह अनेक संस्था सुरू केल्या.

    त्रिभुवनदास पटेल यांना ‘सामुदायिक नेतृत्वा’साठी सन 1963 चा रॅमन मॅगसेसे पुरस्कार आणि भारत सरकारकडून पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. काँग्रेस पक्षाकडून सन 1967 आणि सन 1968 ते 1974 असे दोनदा राज्यसभेचे खासदार म्हणून त्यांनी काम केले. सन 1970 च्या दशकाच्या सुरुवातीला गुजरातमधील खेडा जिल्ह्यात महिला आणि बाल आरोग्यावर काम करण्यासाठी त्रिभुवनदास फाउंडेशन नावाचा एक धर्मादाय ट्रस्ट आणि एनजीओची स्थापना त्यांनी केली. या संस्था गुजरात राज्यातील 600 हून अधिक गावांमध्ये माता आणि शिशु काळजी क्षेत्रात आजही यशस्वीपणाने कार्यरत आहेत. सहकार चळवळीसाठी संपूर्ण जीवन समर्पित केलेल्या त्रिभुवनदास पटेल यांचे 3 जून 1994 रोजी त्यांचे वयाच्या 90 व्या वर्षी निधन झाले. त्यामुळेच केंद्रीय सहकार विद्यापीठाला त्यांचे नांव देणे अत्यंत उचित मानले जात आहे.

    सर्वच राज्यांमध्ये सध्या अस्तित्वात असलेल्या सहकार प्रशिक्षण संस्था या केंद्रातील नव्या सहकार विद्यापीठाशी संलग्न करण्याची आवश्यकता आहे. प्रशिक्षणाबरोबरच सहकाराचे विधिवत शिक्षण देणारी महाविद्यालये देखील सुरू व्हायला हवीत. सहकार हा विषय राज्यघटनेमध्ये मुलभूत अधिकारात समाविष्ट झाला असल्याने प्राथमिक शिक्षणापासूनच सहकाराचे धडे देशभरातील विद्यार्थ्यांना मिळाले, तर भविष्यात सहकार चळवळीचे सकारात्मक चित्र पाहायला मिळेल. जय सहकार!