Category: Blog

  • बचतगट : आत्मनिर्भर स्त्रीशक्तीची ओळख!

    बचतगट : आत्मनिर्भर स्त्रीशक्तीची ओळख!

    आपल्या ग्रामीण आणि निमशहरी भारतात जेथे आर्थिक अपुर्‍या संधी, शिक्षणाचा अभाव आणि सामाजिक बंधने अजूनही महिलांसमोर अडचण म्हणून उभी राहतात, तेथे एक शांत पण ठाम क्रांती घडत आहे. ती म्हणजे महिला स्वयंसहायता बचतगटांची चळवळ. ही चळवळ म्हणजे केवळ अर्थसहाय्याची योजना नाही, तर ती आत्मविश्‍वास, एकजूट आणि सशक्तीकरणाची खरी चळवळ ठरत आहे. ज्याला सहकार तत्त्वांचा आधार आहे. भारतातील सहकाराची संस्कृती दर्शविणारी ही चळवळ आहे.

    गेल्या दोन दशकांत अशा हजारो बचतगटांनी ग्रामीण महिलांना त्यांच्या आर्थिक आणि सामाजिक चौकटीबाहेर जाऊन स्वबळावर उभे राहण्याची प्रेरणा दिली आहे. घराच्या चार भिंतीतून बाहेर पडून महिला आता उद्योजक, प्रशिक्षक आणि समाजपरिवर्तनाच्या चालक बनत आहेत. महिला बचतगटांचे यश केवळ त्यांच्या लघु अर्थसंचालनात नाही. व्यवसाय उभारणी, शेतीपूरक उद्योग, अन्नप्रक्रिया, शिवणकाम, हस्तकला यासारख्या क्षेत्रांत त्यांनी उल्लेखनीय प्रगती केली आहे. अनेक गटांनी तर स्थानिक बाजारपेठेत स्वतःची ओळख निर्माण केली आहे आणि काही गट ई-कॉमर्सच्या माध्यमातूनही मोठा व्यवसाय करीत आहेत.

    या बचतगटांमुळे निर्माण होणार्‍या आर्थिक सशक्ततेसह एक सामाजिक आत्मभान जागृत होत आहे. महिलांच्या निर्णय क्षमतेत वाढ, आत्मभान, सन्मान आणि हक्क यांची जाणीव अधिक बळकट होत आहे. अनेक गट गावपातळीवरील प्रशासनात, ग्रामसभांमध्ये सक्रिय सहभाग घेतात. हीच खरी लोकशाही आहे, जिथे सामान्य स्त्रीचा आवाज ऐकून घेतला जातो. पण अजूनही या चळवळीला अधिक बळ देण्यासाठी स्थानिक पातळीवर प्रशिक्षण, बाजारपेठेची उपलब्धता, तांत्रिक सहाय्य आणि पतपुरवठा यामध्ये सातत्यपूर्ण प्रयत्नांची, म्हणजेच खर्‍या सहकाराच्या पाठिंब्याची गरज आहे. शासन, स्वयंसेवी संस्था आणि समाजातील सक्षम घटकांनी हे दायित्व अधिक गांभीर्याने घ्यावे, हीच आजच्या घडीची गरज आहे. सहकार क्षेत्रातील धुरीणांनी याकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे.

    आज महिला बचतगट हे ‘स्वयंसहाय्यते’चे प्रतिक नाही तर ‘समूहशक्तीच्या सामर्थ्याचा जिवंत पुरावा’ आहेत. त्यांच्या यशाच्या कथा फक्त आकड्यांमध्ये नव्हे, तर त्यांच्या डोळ्यांत चमकणार्‍या आत्मविश्‍वासात आणि त्यांच्यात जागृत झालेल्या नेतृत्वगुणांमध्ये दिसून येतात. या चळवळीला सलाम करत, आपण सारेच या स्त्रीशक्तीला हातभार लावण्यासाठी सज्ज होऊ या. कारण स्वयंपूर्ण भारताची वाट आत्मनिर्भर महिलांमधूनच जाते.

    आपल्या देशात महिलांच्या सक्षमीकरणासाठी विविध स्तरांवर प्रयत्न केले जात आहेत. त्यातील एक प्रभावी माध्यम म्हणजे महिला स्वयंसहायता बचतगट. हे गट ग्रामीण तसेच शहरी भागातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करून त्यांना आत्मनिर्भरतेचा मार्ग दाखवतात. महिला स्वयंसहाय्यता बचतगट हे केवळ आर्थिक व्यवहाराचे माध्यम नसून सामाजिक परिवर्तनाचे शक्तिशाली साधन आहे. बचतगटांच्या या चळवळीमुळे महिलांची वाटचाल सबला ते समर्थ, शक्तीशाली महिला अशी होतांना दिसते आहे. सहकार क्षेत्राची ही मोठी उपलब्धी आहे.

    सहकार भारतीच्या माध्यमातून संपूर्ण देशभरात महिलांद्वारे बचत गटांबरोबरच विविध प्रकारचे उद्योग-व्यवसाय चालविले जात आहेत. सहकार चळवळीतील एक प्रमुख घटक म्हणून महिलांच्या कार्याची दखल सहकार भारतीने घेतली आहे. त्यादृष्टीने विविध प्रकारचे उपक्रम राबविले जात आहेत. यामध्ये अधिकाधिक महिलांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन आहे.

    जय सहकार !

  • दूध व्यवसायाच्या प्रगतीसाठी राष्ट्रीय अधिवेशनात व्यापक चर्चा

    सहकार भारती डेअरी प्रकोष्ट आयोजित

    दूध व्यवसायाच्या प्रगतीसाठी राष्ट्रीय अधिवेशनात व्यापक चर्चा

    गुजरात – आणंद – सहकार भारती डेअरी प्रकोष्टाच्या वतीने दोन दिवसीय राष्ट्रीय अधिवेशन येथे नुकतेच पार पडले. दोन दिवसीय अधिवेशनात दुधाची गुणवत्ता, ती वाढविण्यासाठी उपाययोजना आदी विषयावर व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले होते.

    गुजरातचे सहकार मंत्री जगदीश विश्‍वकर्मा, अमूल दुध संघाचे अध्यक्ष विपुलभाई पटेल, एनडीडीबी अध्यक्ष मीनेश शाह, गुजरात विधानसभा अध्यक्ष शंकर चौधरी, सहकार भारतीचे राष्ट्रीय महामंत्री दीपक चौरासिया राष्ट्रीय प्रकोष्ट प्रमुख देवेंद्र शर्मा आदी पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते.

    दोन दिवासीय परिषदेचा प्रारंभ पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून झाला. परिषदेच्या पहिल्या सत्रात गुजरात विधानसभा अध्यक्ष शंकर चौधरी यांनी यशोगाथाच्या माध्यमातून प्रत्यक्ष कार्य करताना आलेले अनुभव मांडले, तर दुसर्‍या सत्रात दुधाची उत्पादकता आणि त्याची गुणवत्ता वाढीसाठी कोणती उपाययोजना करता येणे शक्य आहे, यावर व्यापक प्रमाणात चर्चा करण्यात आली. तसेच तिसर्‍या सत्रात आनंद कृषी विश्‍व विद्यालयाचे कुलपती कटारिया यांनी स्वदेशी गायी तर त्यानंतर गोपाल यांनी कृषि क्षेत्रातील दुग्ध व्यवसाय याविषयी भाष्य केले.

    आजवरच्या अमूल उद्योग समुहाच्या यशस्वी वाटचालीची माहिती प्रबंध निदेशक जयेन मेहता यांनी सांगितली. तसेच या क्षेत्रात काम करताना अमूल समूह हा शेतकर्‍यांच्या आणि दूध व्यवसायात कशा प्रकारे सहाय्यभूत होऊ शकेल याबाबत सविस्तर विवेचन केले. तसेच या विषयासंबंधी उपस्थित करण्यात आलेल्या प्रश्‍नांना त्यांनी समर्पक उत्तरे दिली. अधिवेशनाच्या समारोप सत्रात सहकार भारतीचे राष्ट्रीय संघटन मंत्री संजय पांचपोर यांनी सहकाराच्या माध्यमातून व्यवसायामध्ये कशाप्रकारे वाढ करता येईल याबाबत सविस्तर विवेचन केले.

    अधिवेशनासाठी देशाच्या विविध राज्यातून दूध उत्पादक व्यावसायिक सहकार भारतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. तसेच दूध व्यवसायाच्या क्षेत्रात यशस्वीपणे कार्यरत असणार्‍या गायित्री बेन, मित्तल बेन, मिना बेन आणि या क्षेत्रातील उद्योजक महिलांनी यशस्वी वाटचालीचे अनुभव सांगितले.

    दोन दिवसीय राष्ट्रीय अधिवेशनात एकूणच दूध उत्पादन, त्याची गुणवत्ता, उपपदार्थ निर्मिती बाजारपेठेची मागणी अशा विविध बाबींंवर विचार विनिमय करण्यात आला.