Category: Blog

  • सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या पुनर्विकासासाठी सहकार विभाग तत्पर : पुणे शहर जिल्हा उपनिबंधक संजय राऊत यांची ग्वाही

    सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या पुनर्विकासासाठी सहकार विभाग तत्पर : पुणे शहर जिल्हा उपनिबंधक संजय राऊत यांची ग्वाही

    पुणे – गृहनिर्माण सहकारी संस्थांच्या पुनर्विकासासाठी तसेच कन्व्हेअन्स आणि डिम्ड कन्व्हेअन्स प्रक्रिया राबविण्यासाठी सहकार विभाग कायम तत्पर असून यातील कायदेशीर बाबी समजावून सांगण्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली असल्याचे सहकार विभागाच्या पुणे शहराचे जिल्हा उपनिबंधक संजय राऊत यांनी सांगितले.

    महाराष्ट्र सोसायटीज वेल्फेअर असोसिएशन (महासेवा) आणि को-पेक्स-दी को-ऑपरेटिव्ह एक्स्पर्ट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ’कन्व्हेअन्स, पुनर्विकास व स्वयं-पुनर्विकास जनजागृती’ यावर चर्चासत्र पार पडले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी राऊत यांनी याबाबत आवश्यक कागदपत्रे, नोंदणी प्रक्रिया व सहकार खात्याच्या विविध यशस्वी उपक्रमांची सखोल माहितीदेखील यावेळी दिली.

    प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा उपनिबंधक संजय राऊत, पुणे जिल्हा सहकारी गृहनिर्माण संस्था व अपार्टमेंट फेडरेशनचे अध्यक्ष सुहास पटवर्धन, ज्येष्ठ विधीज्ञ व निवृत्त आयएएस अधिकारी श्यामसुंदर पाटील आणि महासेवाचे संस्थापक अध्यक्ष सीए रमेश प्रभू उपस्थित होते. या निमित्ताने पुनर्विकास व स्वयं-पुनर्विकास यावरील माहितीपर पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले.

    सुहास पटवर्धन यांनी पुनर्विकास प्रक्रियेत व्यावसायिक व तज्ञांच्या योग्य मार्गदर्शनाचे महत्त्व विशद केले.सहकारी संस्थांनी योग्य नियोजन व नियोजनबद्ध कार्यपद्धतीचा अवलंब करावा, असे आवाहन केले. श्यामसुंदर पाटील यांनी कन्व्हेअन्स व डिम्ड कन्व्हेअन्स प्रक्रियेत येणार्‍या विविध अडचणी, स्टॅम्प ड्युटी संबंधित समस्या याबाबत मार्गदर्शन केले. तसेच या समस्यांचे प्रभावी निराकरण करण्याच्या उपाययोजना स्पष्ट केल्या. सीए रमेश प्रभू यांनी स्वयं-पुनर्विकासाच्या गरजेवर प्रकाश टाकत रेरा कायद्याखालील पारदर्शक आणि नियमबद्ध प्रक्रियेचे महत्त्व सांगितले आणि  व्यावसायिक सल्लागारांच्या भूमिकेबाबतही उपस्थितांना बहुमूल्य माहिती दिली.

    चर्चासत्रात सहकारी गृहनिर्माण संस्थांचे पदाधिकारी व सदस्य, ज्येष्ठ विधीज्ञ चार्टर्ड अकाऊंटंट, बांधकाम व्यावसायिक आणि संबंधित क्षेत्रातील अनेकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. चर्चासत्राचे सूत्रसंचालन सीए चैतन्य वाखारिया यांनी केले. महासेवा पुणे अध्यक्ष सीए सचिन शर्मा, को-पेक्सचे संस्थापक सीए दिपेश पटेल सीए ऋषिकेश कोठावळे यांनी आभार मानले.

  • पतसंस्थेमधील गुंतवणुकीवरील परतावा आयकर मुक्त -सहकार आयुक्त तावरे

    पतसंस्थेमधील गुंतवणुकीवरील परतावा आयकर मुक्त -सहकार आयुक्त तावरे

    मुंबई – रिझर्व्ह बँकेच्या परवानगीने काढलेल्या कर्ज रोख्यांमध्ये सहकारी पतसंस्थांसाठी गुंतवणुकीची सुवर्णसंधी उपलब्ध आहे. ही गुंतवणूक वैधानिक तरलतेच्या निकषांत बसणारी असून त्यावर मिळणारा परतावा आयकर मुक्त असल्याचे सहकार आयुक्त दीपक तावरे यांनी सांगितले.

    महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या वतीने येथील वाय. बी. चव्हाण सभागृहात सहकारी पतसंस्थांच्या विविध अडचणी आणि राज्य बँकेच्या रोख्यांमधील गुंतवणूक या विषयावर एकदिवसीय परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. परिसंवादाला राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे आणि  सहकार आयुक्त दीपक तावरे अध्यक्षस्थानी होते. परिसंवादात राज्यातील सहकारी पतसंस्थांना भेडसावणार्‍या विविध अडचणींबाबत सविस्तर चर्चा झाली. व्यासपीठावर सहकार खात्याच्या बँकिंग विभागाचे अधिकारी अनंत कटके आणि सहनिबंधक नितीन काळे होते.

    मलकापूर अर्बन को-ऑप. सहकारी बँक व नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेत अडकलेल्या ठेवी तातडीने परत मिळविण्याची मागणी फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे यांनी केली. तसेच सहकार खात्याचे कामकाज ऑनलाईन करण्याची गरज सांगितली. थकबाकीविषयक प्रकरणांचा निकाल कलम 101 अंतर्गत त्वरित लावावा, असेही नमूद केले. अपसेट प्राईस वेळेत निश्‍चित करण्याची आवश्यकता त्यांनी अधोरेखित केली. राज्य सहकारी बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर यांची नुकतीच नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सल्लागार मंडळाच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. त्यांनी शेतकर्‍यांसाठी एक रकमेच्या परतव्याची चांगली योजना सुरू केल्याने आगामी सहा महिन्यांत ही बँक आर्थिक अडचणीतून बाहेर येण्याची शक्यता आहे, असे ते म्हणाले.

    अनास्कर म्हणाले की, राज्य सहकारी बँकेने त्यांच्या कर्ज रोख्यांवर साडे आठ टक्के व्याजदराने कर्ज सुविधा देण्याचा निर्णय घेतला आहे. या परिसंवादात राज्यातील विविध सहकारी पतसंस्थांनी एकूण 50 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची घोषणा केली. मलकापूर अर्बन बँकेतील ठेवीदारांचे प्रश्‍न मांडण्यासाठी फेडरेशनचे उपाध्यक्ष शांतीलाल शिंगी, संचालक राजाभाऊ देशमुख, आबासाहेब देशमुख यांनी तर अ‍ॅड. अंजली पाटील यांनी नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत सहकारी पतसंस्थांच्या अडकलेल्या ठेवींबाबत भूमिका बजावली.

    कार्यक्रमाला फेडरेशनचे संस्थापक वसंतराव शिंदे, उपाध्यक्ष शांतीलाल शिंगी, संचालक डॉ. अंजली पाटील, राजाभाऊ देशमुख, चंद्रकांत वंजारी, भास्कर बांगर, सुरेश पाटील, शरद जाधव आदींसह राज्यभरातील अनेक सहकारी पतसंस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.