Blog

  • सहकारी बँकांकडे पाहण्याचा रिझर्व्ह बँकेचा दृष्टीकोन सकारात्मक – सतीश मराठे

    महाबळेश्‍वर – सहकारी बँकांच्या माध्यमांतून समाजाच्या तळागाळातील लोक बँकिंग क्षेत्राशी जोडले जातात. कोरोनानंतरच्या काळात सहकारी बँकांच्या कर्जवसुलीवर परिणाम झालेला आहे. त्यामुळे सहकारी बँकांची आर्थिक स्थिती कमकुवत होते काय असा प्रश्‍न होता. मात्र सहकारी बँकाची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी प्रयत्नशील आहेत. या बँकांबाबतचा रिझर्व्ह बँकेचा दृष्टीकोन सकारात्मक आहे, असे भारतीय रिझर्व्ह बँकेचे संचालक सतीश मराठे यांनी सांगितले.

    सहकार भारती कोल्हापूर विभागाच्या वतीने सातारा, सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील नागरी बँकांचा महाबळेश्‍वर येथे प्रशिक्षण वर्ग पार पडला. यावेळी नागरी सहकारी बँकांचे पदाधिकारी, अधिकारी यांना मार्गदर्शन करताना मराठे बोलत होते. सहकार भारतीचे महामंत्री विवेक जुगादे, संघटक संजय परमने, सांगली अर्बन बँकेचे अध्यक्ष गणेश गाडगीळ, महाराष्ट्र सहकारी बँक्स असोसिएशनच्या उपाध्यक्षा वैशाली आवाडे, सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक राजेंद्र राजपुरे, सहकार विभागाचे जिल्हा उपनिबंधक संजय सुद्रीक, महाबळेश्‍वरचे सहाय्यक निबंधक क्षीरसागर उपस्थित होते.

    देशातील 1400 बँकांमध्ये एकही बँक पीसीएमध्ये (प्राँम्प्ट करेक्टिव्ह अँक्शन) नाही. ही समाधानकारक बाब आहे. असे नमूद करून ते म्हणाले, देशातील 55 कोटी सर्वसामान्यांची जनधन खाती नागरी सहकारी बँकांमध्ये आहेत, त्यामुळे सामान्यांना सहज बँकिंग सेवा उपलब्ध करून देणारी प्रणाली नागरी बँकांकडे आहे. देशातील 100 कोटींहून अधिक लोक मोबाईलचा वापर करतात तर 75 कोटी जनता इंटरनेट वापरत आहे. सायबर सिक्युरिटी ही बाब सर्वांना पाळावी लागणार आहे. सायबर घटना ही समस्या सरकारपुढे आव्हान निर्माण करीत आहे. नागरी सहकारी बँकांनी आपली टेक्नॉलॉजी वरचेवर अपग्रेड करणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे व्यवसाय वाढवून कर्मचारी खर्च व भांडवली खर्च कमी ठेवण्याचा प्रयत्न करावा, असे त्यांनी सांगितले.

    सहकारी बँकांमध्ये समन्वय ठेवून एकमेकांची टेक्नॉलॉजी वापरता येतेय का, ते पाहावे. मोठ्या बँकांनी छोट्या बँकांना माफक दराने टेक्नॉलॉजी उपलब्ध करून द्यावी. भारतीय रिझर्व्ह बँक जगभरातील मध्यवर्ती बँकांच्या तुलनेत चांगली कामगिरी करीत आहे. अनेक देशाच्या मध्यवर्ती बँका भारतीय रिझर्व्ह बँकेच्या तंत्राचा अभ्यास करण्यासाठी भारतात येत आहेत, ही देशाच्या दृष्टीने अभिमानाची बाब आहे. देशातील बँकांमध्ये ग्रॉस एनपीएचे प्रमाण 2 टक्क्यांपेक्षा कमी तर नेट एनपीए एक टक्क्यांपेक्षा कमी आहे. भारतात साडेसात लाख गावे आहेत. जगाच्या मानाने भारताने पेमेंट सिस्टिममध्ये खूप मोठी प्रगती केली आहे. त्यात दिवसेंदिवस वाढ होत असून टेक्नॉलॉजीमध्येही झपाट्याने बदल होत आहे. ज्या गतीने यामध्ये बदल होत आहे. ते पाहता येत्या चार-पाच वर्षांत बँकिंग क्षेत्राला प्रगती करण्यासाठी चांगला वाव आहे. संधी आहेत, त्या दृष्टीने सहकारी बँकांनी आपली दिशा ठरवली पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.

    रिझर्व्ह बँकेचे निवृत्त अधिकारी अविनाश जोशी यांनी सहकारी बँकांच्या बदलेल्या लेखापरीक्षणाची माहिती सांगितली. रिझर्व्ह बँकेने सहकारी बँकांच्या अंतर्गत व वैधानिक लेखापरीक्षणासाठीचे बदलेले परिपत्रक विस्तृतपणे उपस्थितांसमोर मांडले.

    वस्तू व सेवा करविभागाचे निवृत्त सहआयुक्त विद्याधर गोखले यांनी प्रतिनिधींना केवायसीबाबत दक्षता घेण्यास सांगितले. शासनाच्या प्रिव्हेन्शन आँफ मनी लाँडरिंग अ‍ॅक्टविषयी माहिती सांगितली. सहकार भारतीचे कोल्हापूर विभाग प्रमुख चंद्रकांत धुळप, सहप्रमुख नरेंद्र गांधी, सातारा जिल्हा अध्यक्ष डॉ. रवींद्र भोसले, प्रदिप दिक्षित, श्रीकांत पटवर्धन, धोंडीराम पागडे, दीपक बावळेकर, मल्हारी पेटकर, प्रशांत कात्रट, दत्तप्रसाद जाधव, दत्तात्रय पवार, विनायक भिसे, शशिकांत पवार आदींनी स्वागत केले. आनंद शेलार यांनी सूत्रसंचालन केले.

     

  • देशाच्या विकासात सहकाराचे महत्त्वपूर्ण योगदान केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा

    देशाच्या विकासात सहकाराचे महत्त्वपूर्ण योगदान : – केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा

     

    जनता सहकारी बँकेच्या अमृत महोत्सवी वर्षाची सांगता

    सहकारी बँकिंग क्षेत्रात स्वकर्तृत्वाचा ठसा उमटवणाऱ्या येथील जनता सहकारी बँकेने नुकताच अमृत महोत्सवी सोहळा साजरा केला. गेल्या 75 वर्षांच्या काळात बँकिंग क्षेत्राबरोबरच सामाजिक क्षेत्रात देखील विविध उपक्रम यशस्वीपणाने राबविले आहेत.

    पुणे – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सन 2047 पर्यंत देशाला पूर्ण विकसित राष्ट्र करणे आणि सन 2027 पर्यंत त्याच्या अर्थव्यवस्थेला 5 ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी करणे हे दोन संकल्प राष्ट्राच्या समोर ठेवले आहेत. सहकारी क्षेत्राच्या योगदानाने दोन गोष्टी साध्य करता येऊ शकतात. प्रत्येक व्यक्तीला त्याच्या क्षमतेनुसार काम देणे आणि प्रत्येक व्यक्तीला देशाच्या विकासाशी जोडणे, प्रत्येक कुटुंबाला समृद्ध करणे हे केवळ सहकारी चळवळीच्या माध्यमातून शक्य आहे, असे मत केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी व्यक्त केले.

    जनता सहकारी बँक पुणे बँकेच्या अमृत महोत्सवी वर्षाची सांगता करण्यात आली. अध्यक्षस्थानी केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा होते. अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय सहकार आणि नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण आणि संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटील, बँकेचे अध्यक्ष रवींद्र हेजीब, उपाध्यक्ष अलका पेटकर, मुख्य कार्यकारी अधिकारी जगदीश कश्यप उपस्थित होते. जनता सहकारी बँकेच्या स्मरणिकेचे प्रकाशन यावेळी करण्यात आले. अंब्रेला ऑर्गनायझेशनसाठी 5 कोटींचा धनादेश यावेळी बँकेच्या वतीने देण्यात आला.

    * छोट्या लोकांची मोठी बँक –

    सहकारमंत्री शहा म्हणाले, छोट्या लोकांची मोठी बँक हा विश्वास जनता सहकारी बँकने सार्थ केला आहे. देशातील पहिली को ऑपरेटिव्ह डिमॅट संस्था बनण्याचा बहुमान बँकेने प्राप्त केला आहे. जनता बँकेची ठेवी 9600 कोटींपेक्षा अधिक आहे, हे बँकेचे यश आणि लोकांचा विश्वास आहे. सामाजिक कार्यात देखील बँक अग्रेसर आहे. कोणतीही संस्था जेव्हा सातत्यपूर्ण प्रगती करते, तेव्हा त्यांचे संस्थापक, संचालक, सदस्य हे तिघे सगळ्या उद्देशांना पूर्ण करतात तेव्हाच ही प्रगती शक्य आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

    * महाराष्ट्रात सहकारी बँकांचे मोठे जाळे –

    देशात 1465 सहकारी बँका आहेत आणि त्यापैकी 400 हून अधिक फक्त महाराष्ट्रात आहेत. आम्ही एक अंब्रेला संस्था सक्रिय करत आहोत, जी सर्व सहकारी बँकांना शक्य त्या सर्व प्रकारे मदत करेल. अंब्रेला संस्थेसाठी सहकारी बँकांनी 300 कोटी रुपयांचे भागभांडवल उभे केले आहे. यामध्ये केंद्र सरकारचे देखील सहकार्य आहे. पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली सहकार मंत्रालयाने शहरी सहकारी व्यवसाय वाढवण्यासाठी अनेक उपक्रम हाती घेतले आहेत. देशातील पहिले सहकारी संस्थांचे केंद्रीय निबंधक कार्यालय मुरलीधर मोहोळ यांच्या पुढाकाराने पुण्यात सुरू होत असल्याचेही त्यांनी सांगितले.

    * बँकेचा अमृत महोत्सव हा सुवर्णक्षण –

    अध्यक्ष हेजीब म्हणाले, अनेक आव्हानांना तोंड देत समर्थपणे आपल्या विचारांचा वारसा जपत अमृतमहोत्सवी वर्षामध्ये केलेल्या कामगिरीचे सिंहावलोकन करण्याचा हा सुवर्णक्षण आहे. बँकेवर काम करणारे भागधारक, निष्ठावान खातेदार, निस्वार्थी संचालक आणि प्रामाणिक सेवक ही या बँकेची खरी शक्तिस्थाने आहेत. समाजातील सर्वसामान्यांचे जीवनमान उंचविण्यासाठी बँकेने मागील 75 वर्षे आपली भूमिका अत्यंत प्रभावीपणे निभावली आहे, असे सांगत बँकेच्या योजना आणि सामाजिक कार्यातील उपक्रमांची माहिती दिली.

    जगदीश कश्यप यांनी स्वागत केले. रवींद्र हेजीब यांनी प्रास्ताविक केले. अलका पेटकर यांनी आभार मानले.