अंत्योदय संकल्पना प्रत्यक्षात येईल का?

0 Comments

अंत्योदय संकल्पना प्रत्यक्षात येईल का?

मानवी समाजाच्या उत्क्रांतीचा आढावा घेतल्यावर असे लक्षात येते की, मानवाच्या जगण्याच्या संदर्भात संघर्ष करण्यासाठी अतिप्राचीन काळापासून माणसाने या ना त्या स्वरूपात सहकाराचा आधार घेतलेला दिसून येतो. सहकार ही समाजाने समाजासाठी निर्माण केलेली एक व्यवस्था आहे. सहकार हा मानवी समाजाचा स्थायी भाव आहे. इतकेच नव्हे तर सहकार ही एक चळवळ आहे. आपला महाराष्ट्र तर सहकाराचे बीज आहे. सहकार हा साम्यवाद आणि भांडवलवाद अशा विचारांना दिलेला बंधुतेचा पाया आहे. सहकार ही चळवळ नसून तो एक अर्थ विचार आणि जीवन विचार आहे. इतकेच नाही तर सहकार चळवळ ही तात्त्विकदृष्ट्या एकात्म मानववादाचे प्रात्यक्षिक आहे.

* एकात्म मानववाद – अनेकांच्या बलिदानाने आणि समर्पणाने आपल्याला स्वराज्य मिळाले. मिळालेल्या या स्वराज्याचे सुराज्यात रूपांतर कसे करता येईल या दृष्टीने चिंतन सुरू झाले. स्वातंत्र्यानंतर देश कसा चालवायचा हा प्रश्‍न स्वाभाविकपणे सर्वांसमोर उभा होता. यासाठी पाश्‍चात्त्य तत्वज्ञान, साम्यवाद आणि समाजवादात काही उत्तर आहे काय हे शोधण्याचाही प्रयत्न झाला. परंतु भारतासारख्या थोर परंपरा असलेल्या राष्ट्रात हा मार्ग चुकीचा आहे, हे स्वातंत्र्यानंतर दहा पंधरा वर्षांत लक्षात येऊ लागले. या पार्श्‍वभूमीवर पंडित दीनदयाल उपाध्याय यांनी ‘एकात्म मानव दर्शन’ या तत्त्वज्ञानाची मांडणी केली. पुढे त्याला “एकात्म मानववाद’’ असेही संबोधले जाऊ लागले. पंडित दीनदयाल उपाध्याय यांनी मांडलेल्या या तत्त्वज्ञानाचे सार थोडक्यात सांगायचे झाल्यास असेही म्हणता येईल की, “शरीर, मन, बुद्धी आणि आत्मा यांचे उपभोगाबरोबर संयमाचे आणि समर्पणाचे अधिकारासोबत कर्तव्याचे, व्यक्ती बरोबर समष्टी-सृष्टी- परमेष्टी याचे अखंड अवधान ठेवून चालणारे एकात्म सुख म्हणजेच “एकात्म मानववाद’’! ‘एकात्म मानव दर्शन’ हे केवळ तत्त्वचिंतन नाही, तर या तत्त्वज्ञानाच्या आधाराने युगानुकुल परिवर्तन घडवून आणून ‘अंत्योदय’ साध्य करण्याचे काम आहे.

* अंत्योदय विचार – पं. दीनदयाल उपाध्याय यांनी आपल्या प्रदीर्घ चिंतनातून एकात्म मानववाद मांडत असतांना त्याचा अंतिमत: उपयोग कोणाला? असा विचार केला तेव्हा त्यांनी एक शब्द दिला तो म्हणजे ‘अंत्योदय’’. अंत्योदय म्हणजे समाजाच्या शेवटच्या व्यक्तीच्या समग्र विकासात प्रत्येक वंचित, दुर्बल, उपेक्षित घटकाचा प्राधान्याने केलेला विचार. मानवाचे व मानवी मूल्यांचे अवमूल्यन न होता विकासाचा केंद्रबिंदू अखेरचा म्हणजेच तळागाळातला माणूस हवा. अंत्योदय हा विचार गरीब दरिद्री नारायणाचा विचार करणारा आहे. गरीबीरेषेखालील निम्नस्तरीय समाजाचे जीवन जगणारा, अन्न-वस्त्र-निवारा या मूलभूत गरजाही ज्याला प्राप्त होत नाही अशा घटकाला आर्थिक मदत प्राप्त करून देणे यामध्ये अभिप्रेत आहे. दीनदयालजींनी एकात्म मानववादाच्या अनुषंगाने अंत्योदयाची उद्दीष्ट्ये सांगितली आहेत. त्यात प्रामुख्याने प्रत्येक व्यक्तीला किमान जीवनमानाची निश्‍चिती, प्रत्येक व्यक्तीला रोजगार, हर हाथ को काम और हर खेत को पानी, श्रमप्रधान उत्पादन प्रक्रिया यांचा समावेश आहे.

* सहकारातून अंत्योदय – सहकार चळवळीचा उपयोग समाजातील दुर्बल घटक, कामगार, गरीब, शेतमजूर, छोटे शेतकरी, छोटे व्यवसायीक, कलाकार इत्यादींना सहज करून घेता येतो. खरे म्हणजे या प्रकारच्या सर्व दुर्बल आणि उपेक्षित घटकांच्या गरजा फारच मर्यादित असतात. त्या सहकारातून पूर्ण करणे सहज शक्य आहे. सहकारी अर्थकारणाचा लाभ हा दुर्बलांचे संरक्षण करण्यासाठी, त्यांना मदत करण्यासाठी असतोच. त्याशिवाय अर्थकारणातील मक्तेदारीला आळा घालण्यासाठी पर्यायी शक्ती निर्माण करण्यासाठीही असतो. सहकारातून दुर्बल घटकांमध्ये अधिक समावेशी लोकशाही राबविण्यासाठी तसेच अधिक समन्यायी वाटप करण्यासाठीही मदत होऊ शकते. यामुळे अशा गरजू घटकांना सहकारातून आर्थिक मदत मिळाली तर एक आर्थिक क्रांती निर्माण होऊ शकते, शिवाय सत्तेचे विकेंद्रीकरणही होण्यास मदत मिळू शकते.

सहकारातून अंत्योदय ! हे कसे शक्य आहे यासाठी एक छोटे उदाहरण पाहू. समजा एका गावात सहकारी तत्वावर एक दूध संकलन केंद्र आणि डेअरी गावकर्‍यांनी एकत्र येऊन सुरू केली. स्वाभाविकपणे गावातील दूध जे तो शेतकरी शहरातील हॉटेलला किंवा मोठ्या डेअरीला स्वत:च्या वाहनाने घेऊन जायचा तो ते घेऊन जाणार नाही. ते दूध आता आपल्याच गावातील सहकारी दूध संकलन केंद्रावर घेऊन जाईल त्यामुळे त्याचा बाहेरगावी जाण्याचा त्रास, वेळ आणि पैसाही वाचला. गावात दूध डेअरी आल्यामुळे तिथे मनुष्यबळ लागणार, एक ऑफिस लागणार, त्यासाठी वाहने लागणार, म्हणजे किमान दहा-बारा लोकांना रोजगार मिळणार. डेअरी सहकार तत्वावर असल्याने होणारा नफा हा सभासद शेतकर्‍याला मिळणार. थोडा व्यवसाय चांगला वाढला. तर दूध संकल्पनासोबतच डेअरी प्रॉडक्ट विक्रीस ठेवले जाणार अशा पद्धतीने ‘अंत्योदय’ या संकल्पनेची पूर्तता होणार.

पंडित दीनदयाल उपाध्याय यांनी मांडलेले एकात्म मानवदर्शन आणि त्यातून पुढे आलेला अंत्योदयाचा विचार हा सहकाराच्या माध्यमातून सामाजिक परिवर्तन आणि विकासाची दिशा ठरविणारा आहे. वनवासी क्षेत्रातील स्थलांतर, कुपोषण, बेरोजगारी, शेतकर्‍यांच्या समस्या, आरोग्य, शिक्षण इत्यादी क्षेत्रांतील समस्यांचा विचार सहकारातून अंत्योदय ही संकल्पना सार्थ होण्यासाठी महत्वाचा आहे. आदिवासी योजनांच्या माध्यमातून, वनौषधींचे जतन यासारख्या गोष्टी स्थानिक स्तरावर सहकारी संस्था स्थापन करून सहज शक्य आहे.

पंडित दीनदयालजी यांचे अंत्योदयाचे तत्त्वज्ञान आपण सहकाराच्या माध्यमातून व्यवहारात आणले तर खूप गतीने आपल्या समाजाचे उत्थान होईल. पंडितजींनी अंत्योदयाची जी व्याख्या केली, त्या आधारे असे म्हणता येईल की, या देशातील सर्वात गरीब असणार्‍या व्यक्तीचा उदय म्हणजे अंत्योदय. त्याला विकास आणि मूलभूत गरजांची परिपूर्ती केली जाईल, तेव्हा देशाचा भाग्योदय होईल. शेतकर्‍याला खासगी सावकारांच्या पाशातून सोडविण्यासाठी आपल्या देशात सहकार चळवळीचा जन्म झाला असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. या एका उदात्त भावनेतून गरजेपोटी जन्मलेल्या या सहकार चळवळीचे आज संपूर्ण देशात विशाल वटवृक्षात रूपांतर झाले. जीवनाच्या विविध क्षेत्रात सहकार चळवळीचा यशस्वी शिरकाव झाला. मोठ्या उद्योगांसोबत देशातील ग्रामीण भागातील छोट्या उद्योगांना मदत करण्यासाठी सहकार आणि सहकारी वित्तीय संस्था पुढे सरसावल्या आहेत, ज्यामुळे अंत्योदय हा विचार साध्य होण्यास मदत मिळेल. आदिवासी, लहान शेतकरी, भूमिहीन मजूर, ग्रामीण शेतमजूर, बेरोजगार, शिल्पकार, मध्यमवर्गीय, दारिद्ˆय रेषेखालील लोक, बारा बलुतेदार इत्यादींसाठी सहकार क्षेत्र रक्षकाच्या भूमिकेत असायला पाहिजे. त्या दृष्टीनेही विचार होणे गरजेचे आहे.

आंतरराष्ट्रीय सहकारिता वर्ष 2025 मध्ये सहकारातून अंत्योदय ही संकल्पना प्रत्यक्षात अंमलात येईल अशी अपेक्षा ठेवू या !

– डॉ. नितीन खर्चे अध्यक्ष, दि यवतमाळ अर्बन को-ऑप. बँक लि., यवतमाळ   मो. नं. – 94228 92768   *****

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts

सहकाराच्या क्षेत्रात तंत्रज्ञानाच्या माध्यमातून परिवर्तन घडवून आणणे शक्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सूतोवाच

सहकाराच्या क्षेत्रात तंत्रज्ञानाच्या माध्यमातून परिवर्तन घडवून आणणे शक्य पंतप्रधान नरेंद्र…