देशभरात सहकार भारतीच्या विस्ताराबरोबरच प्रशिक्षण सुविधा उपलब्ध करणार

0 Comments

विशेष मुलाखत

आगामी काळात देशाच्या विविध राज्यांत सहकार भारतीच्या कार्याचा विस्तार करण्या बरोबर नजीकच्या काळात नव्याने उभ्या राहणार्‍या सहकारी संस्थांसाठी प्रशिक्षण सुविधा उपलब्ध करून देण्यावर अधिक भर असणार आहे असे सहकार भारतीचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. उदय जोशी यांनी विशेष मुलाखतीमध्ये सांगितले. डॉ. जोशी यांची नुकतीच सहकार भारतीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाली. त्यानंतर त्यांनी विषेश मुलाखतीमध्ये सहकार भारती आणि एकूणच सहकार क्षेत्राविषयी मते मुलाखतीच्या माध्यमातून मांडली आणि आगामी काळातील योजनांचे सुतोवाच केले. सहकार भारतीच्या विस्तार कार्याबाबत ते म्हणाले, आजमितीस देशातील 28 राज्य आणि 650 जिल्ह्यांत विस्तार झाला आहे आणि सहकार भारतीच्या स्थापनेला 47 वर्ष पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्त यापुढील काळात भौगोलिक विस्तारावर अधिक प्रमाणात भर देण्यात येणार आहे. याबरोबर संस्थात्मक स्तरावरदेखील विस्तार करण्याचे उद्दिष्ट नक्की करण्यात आले आहे. आजमितीला देशात 55 विविध प्रकारच्या सहकारी संस्था कार्यरत आहेत. त्या प्रत्येक क्षेत्रात सहकारी संस्था उभारणी आणि कार्यकर्ता संमेलन याचे आयोजन करण्यात येत आहे. असे असले तरी प्रत्येक जिल्ह्यांत सहकार भारतीचे काम सुरू झाले पाहिजे यावर भर असणार आहे.

सहकार भारतीची प्रशिक्षणाची सुविधा -

देशाला पांच ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था बनविण्याचे उद्दिष्ट मोदी सरकारने नक्की केले आहे. यामध्ये सहकार भारतीची भूमिका कशी असणार या प्रश्‍नाल उत्तर देताना त्यांनी सांगितले की, पंतप्रधान मोदी यांनी सन 2021 मध्ये “सहकारीतासे समृद्धि’’ असा नारा दिला आहे. सध्याच्या स्थितीत देशाच्या विविध राज्यात एकूण आठ लाख 60 हजार सहकारी संस्था कार्यरत आहेत. यामध्ये 50 टक्के संस्था या गृहनिर्माण सहकारी संस्था आहेत आणि अंदाजे 29 कोटी लोकसंख्या या संस्थांशी जोडली गेली आहे. एका बाजूने उद्योग क्षेत्र झपाट्याने विकसित होत असताना ही विकासाची गंगा समाजातल्या शेवटच्या घटकापर्यंत जाण्यासाठी सहकार क्षेत्राखेरीज अन्य पर्याय नाही. हे लक्षात आल्याने केंद्र सरकारने विविध क्षेत्रामध्ये सुमारे दहा हजार सहकारी संस्था उभारणीचे उद्दिष्ट ठेवले आहे. या नवीन संस्थांसाठी आवश्यक त्या प्रशिक्षणाची सुविधा आणि नवीन संस्था उभारणे यासाठी सहकार भारती कार्यरत राहणार आहे .

सहकार क्षेत्राच्या स्तारीकरणावर विशेष भर -

महाराष्ट्रातील सहकार क्षेत्राविषयीचे भाष्य करतांना ते म्हणाले, सुरूवातीपासून महाराष्ट्र हे सहकार क्षेत्रात आघाडीवर राहिले आहे आणि त्यातही पश्‍चिम महाराष्ट्रात सहकार क्षेत्रातील महत्त्वाच्या नेत्यामुळे सहकार चळवळीला बळ मिळाले आहे. बदलत्या गरजा आणि काळानुसार विविध क्षेत्रात सहकार क्षेत्र अधिक प्रमाणात विकसित होत आहे. मुंबईतील वेगवान विश्‍वामुळे सहकार क्षेत्र रुजण्यासाठी मर्यादा असल्या तरी कोकण विदर्भ, मराठवाड्यात सहकाराचे तत्त्व पोहोचविण्यासाठी सहकार भारतीचे कार्यकर्ते जोमाने काम करीत आहेत.

गुजरातमधील अमूलचा विचार करायचा झाला तर या ब्रँडशी असंख्य शेतकरी जोडले आहेत. अमूलची दुध संकलन क्षमता देखील खूप मोठी आहे म्हणजेच ती आठ कोटी इतकी आहे. महाराष्ट्रचा विचार करता अनेकविध दुधाचे ब्रँड प्रचलित आहेत. मात्र अजूनही ते अमूलची उंची गाठू शकले नाहीत हे वास्तव आहे. त्यामुळे या क्षेत्रात राज्याला आणखी काम करण्याची संधी आहे.

सहकारी साखर कारखान्यांबाबत सहकार भारतीचा प्रस्ताव -

सहकारी साखर उद्योगाबाबत विचारता ते म्हणाले, सहकारी साखर उद्योग हा देशातील एक महत्वाचा असा उद्योग आहे. ग्रामीण भागाचा विकास आणि उभ्या राहिलेल्या पायाभूत सुविधा यामागे सहकारी साखर कारखाने आहेत हे लक्षात घ्यायला हवे. मात्र या क्षेत्रात देखील राजकीय भूमिकेने प्रवेश केला आहे आणि एक अनिष्ट प्रथा सुरू झाली आहे. चांगल्या स्थितीत असणार्‍या सहकारी साखर कारखान्याचा ताळेबंद खराब करायचा आणि मग तो डबघाईला आला की मग खासगी क्षेत्राला विकायचा. मग तो चांगला चालायला लागतो. यामुळे अनेक सहकारी साखर कारखाने बंद पडले आहेत. याबाबत सहकार भारतीने सरकारला एक प्रस्ताव पाठविला आहे. असा एखादा साखर कारखाना बंद पडला की, तो एखाद्या सहकारी संस्थेला विकण्यात यावा. जेणेकरून त्याची मालकी सहकार क्षेत्राकडे राहील. उत्पादन खर्च कमी करण्यासाठी कच्ची साखर विकणे, इथेनोल उत्पादन, सहविजनिर्मिती यासारखे प्रयोग सहकार भारतीच्या माध्यमातून सुरू झाले आणि यशस्वी होत आहेत, असे ते म्हणाले.

जुन्या इमारतींचा पुनर्विकास प्रश्‍न महत्त्वाचा -

राज्याच्या विविध भागातील महत्वाचा प्रश्‍न म्हणजे जुन्या इमारतींचा पुनर्विकास होय. याबाबत विचारता ते म्हणाले, सहकार क्षेत्रातील एकूण संस्थांपैकी अर्ध्या संस्था या गृहनिर्माण संस्था आहेत. आणि या संस्थांचा महत्वाचा प्रश्‍न म्हणजे या संस्थांच्या सभासदांचा असहकार होय. त्यापुढे आणखी एक बाब म्हणजे स्वयंपुनर्विकास योजनेसाठी बँकाकडून कर्जाची उपलब्धता होणे आवश्यक आहे. तसेच जागाहस्तांतर हादेखील एक प्रश्‍न आहे. याबाबत सहकार भारतीने समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न केला आहे आणि यापुढील काळात देखील सतत पाठपुरावा करण्याची सहकार भारतीची भूमिका असणार आहे, असे त्यांनी नमूद केले.

नवीन तंत्रज्ञानाच्या वापरासाठी आग्रही भूमिका -

प्रशिक्षणाच्या प्रक्रियेबाबत सांगताना ते म्हणाले, सहकार भारतीने माहिती तंत्रज्ञान आणि सायबर सिक्युरिटी सेल, या दोन्हीच्या माध्यमातून सहकारी संस्थांना प्रशिक्षण देणे तसेच संस्थांनी नवीन तंत्रज्ञानाचा अधिकाधिक प्रमाणात वापर करावा यासाठी सहकार भारतीच्या वतीने प्रशिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देत आहे. कारण या विषयाची व्याप्ती खूप मोठी आहे. या विषयावरील जागृतीसाठी सहकार भारती प्रयत्नशील आहे आगामी काळात हे सेल प्रत्येक विभागात स्थापन करण्याचा सहकार भारतीचा प्रयत्न आहे असे त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts

संपादकीय…

सहकारी संस्थांच्या माध्यमातून महिला सबलीकरण - सतीश मराठे सांगली -…