‘महाराष्ट्र सहकारी मुद्रणालया’चे शिल्पकार : नरूभाऊ लिमये

0 Comments

‘महाराष्ट्र सहकारी मुद्रणालया’चे शिल्पकार : नरूभाऊ लिमये

स्व. नरुभाऊ लिमये

ज्येष्ठ पत्रकार, स्वातंत्र्यसैनिक, सहकार नेते स्व. नरुभाऊ लिमये यांच्या मार्गदर्शनाखाली ‘महाराष्ट्र सहकारी मुद्रणालय’ ही संस्था स्थापन झाली. ही संस्था राज्यात मुद्रण क्षेत्रात एक अव्वल दर्जाची संस्था म्हणून काम करीत आहे. या संस्थेस नुकतीच पन्नास वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्ताने विशेष लेख…..

पुण्यातील मुद्रण क्षेत्रात विसाव्या शतकाच्या सुरुवातीस नामदार गोपाळ कृष्ण गोखले यांनी सर्व्हंट्स ऑफ इंडिया’ या ‘आर्यभूषण’ संस्थेची स्थापना केली. त्या संस्थेने जनजागरणासाठी ‘आर्यभूषण मुद्रणालय’ आणि ‘ज्ञानप्रकाश’ दैनिक सुरू केले. ‘आर्यभूषण भवन’ ही भव्य वास्तू आणि परिसर चांगला जोपासला जावा म्हणून विश्‍वस्तांनी यशवंतराव चव्हाण यांना विनंती करून ‘आर्यभूषण’ परंपरा चालू ठेवली व त्यातून प्रिमियर प्रिंटर्स को-ऑप. संस्था’ तीन जुलै 1974 रोजी स्थापन करण्यात आली. 25 मे 1975 रोजी यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते संस्थेचे उद्घाटन करण्यात आले. महाराष्ट्रात राज्य पातळीवर सहकारी मुद्रणालयाचा प्रयोग नवीन होता. पण यशवंतराव चव्हाण व त्यांचे मित्र प्रा. गोवर्धन पारिख यांनी ही संस्था उभी केली. सहकार नेते शंकरराव कोल्हे, नरुभाऊ लिमये यांचा संस्थेच्या विकासात मोठा वाटा आहे. गोविंदराव तळवलकर, यशवंतराव मोहिते, वसंतदादा पाटील यांचेही त्यांना मोठे सहकार्य लाभले.

संस्थेच्या उभारणीत नरुभाऊ लिमये यांचा सिंहाचा वाटा आहे. पत्रकारिता, साहित्य, नाट्य आणि सहकारी आदी क्षेत्रांत काम करताना नरुभाऊंनी आपली प्रतिमा स्वच्छ राखली. समाजहिताची दृष्टी ठेवली. त्यांच्या कार्याचा आदर्श सतत राहावा म्हणून संस्थेने ‘आर्यभूषण पुरस्कार’ सुरू ठेवला आहे. महाराष्ट्रातील दोन पिढ्यांचे राजकारण पाहणारे निर्भीड पत्रकार, सिद्धहस्त लेखक म्हणून नरुभाऊ ओळखले जातात. पारदर्शक व्यक्तिमत्त्व, आदर्श सहकारी कार्यकर्ते मार्गदर्शक अशीही त्यांची ओळख तयार झाली, ती त्यांच्या चौफेर कर्तृत्वामुळे. ते जाऊन आता 27 वर्षे होत आली आहेत. तरुणांनाही लाजवेल अशी कार्यक्षमता, गुणवत्ता, अखंड वाचन करणारे नरुभाऊ सतत सभोवतालच्या माणसांच्या सुखदुःखाचा विचार करत असत.

नरुभाऊंचे आईवडील त्यांच्या लहानपणीच निवर्तले. त्याची त्यांना सतत जाणीव होती. त्यामुळे समाजातील शेकडो गरीब मुलामुलींना ते आर्थिक मदतीचा हात ते देत असत. ’सहकारी महाराष्ट्र’च्या संपादक पदावरून मी निवृत्त झालो, त्यावेळी निरोप समारंभानिमित्त नरुभाऊंनी मेजवानीचे आयोजन केले होते. त्या आठवणीने आजही मन भरून येते. नरुभाऊ कट्टर काँग्रेसवाले. बारा वर्षे ते आमदार होते. एक गरीब होतकरू मुलगा बोरीबंदर स्टेशनवर म्हणजे सध्याच्या छत्रपती शिवाजी टर्मिनसवर त्यांना नेहमी भेटत असे. त्याला मदत व्हावी यासाठी ते त्या मुलाकडून बुटांना पॉलिश करून घेत असत. एकदा गाडीला काही वेळ असल्याने त्यांनी त्या मुलाचे जीवन समजून घेतले. सुट्टीचा दिवस पाहून ‘ना. म. जोशी मार्गा’वर ज्या ठिकाणी तो मुलगा राहत होता त्या ठिकाणी ते गेले. तेथील आरोग्यदृष्ट्या गलिच्छ वातावरण, दारिद्र्य पाहून त्यांना त्या मुलाची दया आली. नरुभाऊंनी त्या मुलाची पुण्यातील एका वसतिगृहात मोफत राहाण्याची, जेवणाची व्यवस्था केली. त्याला शिकविले आणि नोकरीलाही लावले. हा मुलगा आपल्या कर्तृत्वाने अधिकारी बनला आणि त्याने स्वतःचे घर बांधले. त्या घराला त्याने ‘नरुभाऊ लिमये स्मृती’ असे नाव दिले. अशा किती तरी मुलांना त्यांनी मदत केली. जात, धर्म या पलीकडे जाऊन ते विचार करीत असत.

समाजातल्या अशा किती तरी गरजू मुलांसाठी त्यांनी उपक्रम राबविले होते. यशवंतराव चव्हाण यांच्या जीवनावर एक ध्वनिचित्रफीत तयार करून त्यांचे कार्य समाजात रुजविण्याचे काम नरुभाऊंनी निष्ठेने केले. राजकारण, समाजकारण, सहकार, पत्रकारिता, संगीत, कला या क्षेत्रातील त्यांचे योगदान उल्लेखनीय होते. 1942 च्या स्वातंत्र्यलढ्यात त्यांनी तुरुंगवास भोगला. 1966 ते 78 अशी बारा वर्षे ते आमदार होते. अनेक वर्षे नरुभाऊ महाराष्ट्र सहकारी मुद्रणालयाचे ते अध्यक्ष होते. या संस्थेला त्यांनी दिशा दिली. कामगारांसाठी त्यांनी सहकारी तत्त्वांवर गृहबांधणी प्रकल्प राबविला. त्या काळात संस्था फायद्यात चालविली. राजकारणात, सार्वजनिक कार्यात, सहकारात, नाट्य-कला क्षेत्रात आणि पत्रकारितेत नरुभाऊंनी अनेकांना मार्गदर्शन केले. आणि मदतही केली. लोकशक्ती, विशाल सह्याद्री, प्रकाश या दैनिकांचे संपादन केले. दैनिक ‘सकाळ’चे ते सातार्‍याचे बातमीदार होते. संपादक, स्तंभलेखक आणि बातमीदार अशा भूमिकेत ते सतत वावरले. रामशास्त्री बाण्याची पत्रकारिता निर्भय पत्रकारिता त्यांनी जपली. त्यांच्या कार्यात शिस्त होती. पत्रकार म्हणून महाभारतातील विदुराचा वारसा त्यांनी जपला. त्यांचे आत्मचरित्र ‘वीस चोक ऐंशी’ विशेष उल्लेखनीय असेच आहे. तसेच उद्योगपती डॉ. निळकंठराव कल्याणी यांचे चरित्र त्यांनी लिहिले. सहकारी मुद्रणालयाच्या कार्याला त्यांनी शिस्त आणली. कामगार, सेवक आणि संचालक मंडळ यांच्या कामात त्यांनी समन्वय साधून सहकार शिस्त लावली.

ज्येष्ठ पत्रकार

जयराम देसाई

76206 95155

******

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts

सहकाराच्या क्षेत्रात तंत्रज्ञानाच्या माध्यमातून परिवर्तन घडवून आणणे शक्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सूतोवाच

सहकाराच्या क्षेत्रात तंत्रज्ञानाच्या माध्यमातून परिवर्तन घडवून आणणे शक्य पंतप्रधान नरेंद्र…