सहकार भारती आयोजित बचत गट महोत्सव

0 Comments

सहकार भारती आयोजित बचत गट महोत्सव

महिला सक्षमीकरणासाठी सकारात्मक व्यासपीठाला पुणेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

वैविध्यपूर्ण उत्पादने ठरली महोत्सवाचे आकर्षण

महिला बचत गटाच्या माध्यमातून उत्पादित केलेल्या अनेकविध वस्तूंचा दोन दिवसीय महोत्सव सहकार भारतीच्या वतीने प्रथमच पुण्यनगरीत आयोजित करण्यात आला होता. राज्याच्या विविध जिल्ह्यातून या महोत्सवात बचत गट सहभागी झाले होते. यापुढील काळातही हा उपक्रम दरवर्षी हाती घेण्यात येणार आहे.

पुणे – राज्याच्या विविध जिल्ह्यातील महिला बचत गटांनी तयार केलेली विविध उत्पादने, खाद्यपदार्थ आणि वस्तु याला बाजारपेठ मिळावी. तसेच महिला सक्षमीकरणासाठीचे एक सकारात्मक पाऊल यादृष्टीने सहकार भारतीच्या वतीने दोन दिवसीय बचत गट महोत्सवाचे प्रथमच आयोजन करण्यात आले होते. एका अर्थाने नवे व्यासपीठ मिळवून देण्याचा यशस्वी प्रयत्न करण्यात आला. विशेष म्हणजे या महोत्सवाला उस्फूर्त प्रतिसाद मिळाला.

दोन दिवसीय बचत गट महोत्सवात विविध जिल्ह्यातील जवळपास 90 विविध उत्पादनांचे स्टॉल्स होते. त्यामध्ये सोलापूर, सांगली, नाशिक, सातारा, कोकण, पुणे अशा विविध जिल्ह्यातून बचत गट सहभागी झाले होते. उत्पादनामध्ये विविधता असल्याने निवडीसाठी ग्राहकाना भरपूर वाव मिळाला. विशेष म्हणजे या स्टॉलमध्ये चार स्टॉल हे दिव्यांगांसाठी होते. या महोत्सवात जवळपास पांच लाखांपेक्षा अधिक उलाढाल झाली असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.

* विविध उत्पादनांनी स्टॉल्स सजले –

या स्टॉलवर विविध प्रकारचे खाद्यपदार्थ, मसाले, विविध प्रकारचे पापड, सोलार दिवे, पुजा साहित्य, कॉस्मेटिक वस्तू, कपडे, दैनंदिन वापरातल्या वस्तू आणि उत्पादने, विविध वासांचे साबण, तसेच भांडी उपलब्ध करण्यात आली होती. यातील अनेक पदार्थ पारंपरिक पद्धतीने तयार करण्यात आले होते. घरगुती पद्धतीने आणि बचत गटाच्या माध्यमातून तयार करण्यात आलेली उत्पादने विक्रीसाठी स्टॉलवर होते. विशेष म्हणजे सहकार भारतीच्या या उपक्रमाला पुणेकरांनी तितकेच उचलून धरले. एका अर्थाने महिला सक्षमीकरणाच्या प्रयत्नाला पुणेकरांनी मोठा प्रतिसाद देऊन हातभार लावला.

केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, राज्य सहकारी बँक प्रशासक विद्याधर अनास्कर, सहकार भारती प्रदेश महामंत्री विवेक जुगादे, प्रदेश संघटक शरद जाधव, सहकार भारती शहर अध्यक्ष सीए दिनेश गांधी, पुणे विभाग प्रमुख गिरीश भवाळकर, महिला बचत गट प्रमुख मंगल सोनवणे, बुलढाणा अर्बनचे शिरीष देशपांडे, राष्ट्रीय बँक प्रकोष्ठ प्रमुख अभय माटे, सहकार सुगंध संपादक भालचंद्र कुलकर्णी, प्रदेश कार्यालय प्रमुख श्रीकांत पटवर्धन, प्रदेश सहकोषाध्यक्ष औदुंबर नाईक, आयटी प्रकोष्ठ प्रमुख अजय निकुंभ, राज्य अर्बन को-ऑप. बँक असोसिएशन अध्यक्ष भाऊ कड, शहर महामंत्री वसंत गुंड, पुणे महानगर संघटन प्रमुख नीलकंठ नगरकर, बचत गट प्रकोष्ठ प्रमुख भाग्यश्री बोरकर, सहप्रमुख सुवर्णा भरेकर, आमदार हेमंत रासने तसेच सहकार भारतीचे शहराचे पदाधिकारी, आदींनी महोत्सवाला भेट दिली.

* बचत गटांना एक नवे व्यासपीठ –

सहकार राज्यमंत्री मोहोळ यांनी महोत्सवास भेट देऊन विविध स्टॉल्सवर जाऊन माहिती घेतली. त्यानंतर बोलताना सांगितले की, सहकार भारतीच्या वतीने घेण्यात आलेला सामाजिक उपक्रम हा नक्कीच स्वागतार्ह आहे. या माध्यमातून बचत गटांना एक व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. सहकार चळवळीला सक्षम करण्याच्या प्रक्रियेला हातभार लागला आहे आणि महोत्सवाच्या माध्यमातून ग्राहकांना विविध उत्पादने उपलब्ध होणार आहेत.

* …..तर बचत गटांना उज्ज्वल भवितव्य –

महोत्सवाचे उद्घाटन करताना प्रशासक अनास्कर यांनी सांगितले की, महिलांनी तयार केलेल्या विविध वस्तू आणि उत्पादने यांना योग्य बाजारपेठ मिळणे आवश्यक आहे. विविध सहकारी संस्थांच्या माध्यमातून महिलांना सहकार्य मिळाल्यास उत्पादने जगभर जाण्यास मदत होणार आहे. महिला कष्ट करतात आणि कितीही अडचणी आल्या तरी त्यावर मात करून पुढे जाण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. सहकारी बँका अथवा सहकारी संस्थांच्या वतीने बचत गटांनी तयार केलेली विविध उत्पादने दिवाळीनिमित्त भेटवस्तू म्हणून देण्याची आवश्यकता आहे. तसेच बचत गटांसाठी स्वतंत्र मॉल तयार करण्याची गरज आहे, यासाठी आवश्यक ते सहकार्य देण्याची तयारी आहे. बचत गटांच्या उत्पादनांना योग्य बाजारपेठ मिळाली तर बचत गटांना उज्ज्वल भवितव्य आहे, यापुढील काळात देखील ठिकठिकाणी महोत्सवाचे आयोजन करण्यात यावे, असे ते म्हणाले.

* बचत गट महोत्सव दरवर्षी होणार –

शहराध्यक्ष गांधी यांनी सांगितले की, यंदा प्रथमच ना नफा ना तोटा या तत्त्वांवर बचत गट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून या पहिल्या वहिल्या प्रयत्नास अभूतपूर्व असा प्रतिसाद मिळाला आहे. बचत गट सक्षम झाले पाहिजेत हा या आयोजनेमागचा हेतू होता. या उपक्रमासाठी राज्य सहकारी बँक, पुणे महानगर पालिका आणि अन्य सहकारी संस्थांचे सहकार्य मिळाले. त्यामुळे स्टॉल धारकांना माफक दरात सुविधा उपलब्ध करून देता आल्या. हा महोत्सव दरवर्षी म्हणजेच ऑक्टोबर ते डिसेंबर दरम्यान आयोजन करण्याचा प्रयत्न आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेला अधिक सक्षम करण्यामध्ये सहकार क्षेत्राचा मोठा वाटा आहे. महोत्सवाच्या ठिकाणी ग्राहकांना खाद्य पदार्थ तयार करून देता आले नाही. तसेच स्टॉल धारकांना निवासाची व्यवस्था उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आहे असे ते म्हणाले.

* प्रतिक्रिया –

* पारंपरिक पद्धतीचे खाद्यपदार्थ –

नाशिकच्या प्रतिसाद बचतगटाच्या प्रमुख रूपाली माळी यांनी सांगितले की, पारंपरिक पद्धतीने तयार केले पदार्थ, घिबडी तसेच मसाले, विविध प्रकारचे पापड तयार करून स्टॉलवर उपलब्ध करण्यात आले. विशेष म्हणजे विविध प्रकारचे पदार्थ गेली 25 ते 30 वर्षे घरगुती व्यवसायाच्या माध्यमातून तयार करण्यात येतात. तसेच बचत गटांच्या महिलांना प्रशिक्षण देण्याची सुविधा करण्यात आली आहे. बचत गट महोत्सवाला मिळालेला प्रतिसाद उत्साहवर्धक होता.

* नैसर्गिक साबण उपलब्ध –

वसुंधरा क्रिएशनच्या स्मिता कुंजीर यांनी सांगितले की, घरगुती स्तरावर जवळपास दहा विविध स्वरूपाचे आणि सुगंधी युक्त नैसर्गिक असे साबण तयार करण्यात येतात. त्याला मागणीचे प्रमाण चांगले आहे. याखेरीज विविध प्रकारचे ड्रेस, लेहेंगे, बेबी फ्रॉक, साडी कव्हर, हँडबॅग, मनीबॅग आदी वस्तू तयार करून देण्यात येतात. विविध वस्तूंना विविध भागातून येणारी मागणीदेखील मोठ्या प्रमाणावर आहे असे त्यांनी सांगितले.

* नाचणीचे अनेकविध खाद्य पदार्थ –

सातारा जिल्ह्यातील नारीज फूड्सच्या वतीने चवीला उत्तम, जीवनसत्त्वयुक्त, लोहयुक्त असे अनेकविध खाद्यपदार्थ महोत्सवात उपलब्ध करण्यात आले होते. यामध्ये नाचणी सत्त्व मिक्स फ्रूट्स, तसेच काजू बदाम, ड्राय फ्रूट्स, नाचणी पाणी पुरी आणि मसाला भाकरी, रागी भाकरी, जीरा भाकरी, बाजरा मेथा भाकरी, फराळी भाकरी आदी पदार्थ स्टॉलवर ठेवण्यात आले होते आणि ग्राहकांच्या पसंतीस उतरले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts