पतसंस्थांनी वाढीचा ध्यास धरावा, पण वाढ सातत्यपूर्ण, प्रमाणबद्ध असावी

पतसंस्थाचा आकार, अर्थकारण, सभासद संख्या द्रुतगतीने वाढते आहे. महाराष्ट्रातील काही संस्था ही 10 हजार कोटींचा ठेव टप्पा पार करण्यात यशस्वी झाल्या तर काही संस्था हा टप्पा पार करण्याकडे वाटचाल करताना दिसतात. एका बाजूला 8 हजारांपेक्षा अधिक संस्था 1 कोटी पेक्षा कमी ठेवी असलेल्या आहेत. त्याचवेळी हजारो कोटींच्या ठेवी जमा करणार्या संस्था आपण पाहतो आहोत. गेल्या 5 वर्षांत 100 वर संस्था या 100 कोटींपेक्षा जास्त ठेवी संकलित करणार्या संस्था ठरल्या. पतसंस्थांच्या मार्गक्रमणात द्रुतगतीने संस्थांचे अर्थकारण वाढण्याची ही पहिलीच वेळ असावी.
* पतसंस्थाचे वाढते अर्थकारण –
संस्था वाढते याच कारण संस्थेचे सादरीकरण आकर्षक असते. संस्था चालकांचा प्रभाव असतो. विश्वासार्हता ही अत्यंत महत्त्वाचा मुद्दा ठरतो. संस्थेची उपयुक्तता प्रामुख्याने ग्राहकांबरोबरचे संबंध, ग्राहक सेवेचा दर्जा आणि अत्यंत आकर्षक ठेव व्याजदर यामुळे संस्था वेगाने वाढत जातात. पतसंस्था जगतामध्ये वाढणार हे अर्थकारण खूप उत्साहवर्धक आहे. पतसंस्था क्षेत्राचे स्थान अधोरेखित करणारी ही वाढ आहे. राष्ट्रीय स्तरावर दखल घेतली जावी अशी स्थिती आहे असा आभास निर्माण करणारी ही स्थिती आहे.
* सावधगिरीने काम करून अर्थचक्र गतिमान करणे –
पतसंस्थांनी खूप सावध भूमिका घेणे आवश्यक ठरते. केवळ आर्थिक आकार वाढीचा ध्यास दूरगामी प्रवासासाठी योग्य ठरत नाही. पतसंस्था चालकांनी वाढीचा सांख्यांकीय वेग आणि आर्थिक शिस्त, प्रमाणबद्धता याचे समीकरण नेमके जमवणे आवश्यक आहे. अर्थकारणामध्ये अर्थगतीला खूप महत्त्व आहे. अर्थगती त्यातले सातत्य प्रामुख्याने संपूर्ण अर्थचक्र गतिमान ठेवणे आवश्यक ठरते. एकतर्फी फक्त येणारा पैसा किंवा एकतर्फी बाहेर जाणारा पैसा हे अर्थचक्र नाही. पैसा येतो तो कर्जरूपाने गुंतवणूक रूपाने प्रमाणबद्ध वितरित होतो. ठराविक हप्त्यात कर्जाची वसुली होते. गुंतवणुकीवर व्याज मिळते. या जमा रकमेतून विहित व्यवस्थापन खर्च होतात. उर्वरित रकमेतून कर्ज वितरण होते. परत वसुली असे चक्र सातत्याने सुरू राहण आवश्यक ठरते.
पतसंस्थांना मध्यवर्ती बँकांपेक्षा अधिक ठेव व्याजदर ठेवण्याची मुभा असते. स्वाभाविकपणे पतसंस्थांचे व्याजदर आकर्षक असतात. संस्थांची कार्यालय रचना आकर्षक असते. पदाधिकारीही त्या भागातले विश्वासू व्यक्तिमत्त्व असते. या पार्श्वभूमीवर संस्थेकडे ठेवींचा ओघ सुरू होतो. अधिकचा व्याजदर देत असल्याने ठेव उभारणी ज्यादा दराचे आमिषाने होते. स्वाभाविकच फंड रेझिंग कॉस्ट वाढलेली असते. ठेव येण्याचे वेळापत्रक हे निश्चित नसते. ठेवींचा फ्लो अनईव्हन असतो. काही वेळा ही ठेव रक्कम नुसती आयडल पडून राहते आणि कॉस्ट अधिक वाढते.
* पिग्मी ठेवींचे योग्य नियोजन –
मोठ्या संस्थाकडे पिग्मी एजंट मार्फत मोठ्या प्रमाणावर पिग्मी ठेव जमा होते. मात्र पिग्मी विड्रॉॅवल प्रमाण हे खूप जास्त असते. रोज जमा होणार्या लाखो रुपयांच्या पिग्मी रकमेतून कर्ज वितरणासाठी वापरण्यायोग्य रक्कम हाती राहत नाही. जमा होणार्या पिग्मीमधून पिग्मी ठेव परतावा होतो. फंड कॉस्ट वाढते. मात्र संयत स्वरूपात पिग्मी जमा करणे हे संस्थेला बाजारपेठेत जागती ठेवण्यासाठी उपयुक्त ठरते. एजंटच्या माध्यमातून संस्था रोज व्यापारापर्यंत पोचते. या गोष्टीचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. प्रत्येक संस्थेने पिग्मी एजंट किती नेमावे? त्यांनी किती रक्कम जमा करावी ? याचे स्वतःचे गणित ठरवले पाहिजे. नाहीतर मनमानी स्वरूपात अतिरिक्त जमा होणारी पिग्मी रक्कम आपली फंड कॉस्ट अधिक वाढवते याचे भान ठेवणे आवश्यक ठरते. अन्य संस्थांशी स्पर्धा करण्यासाठी पिग्मी खाती वाढवणे याला कोणताही अर्थ नाही. नेमकी गरज, पिग्मीसाठी पडणारी कॉस्ट आणि सर्वात महत्त्वाच म्हणजे पिग्मी ठेवी माध्यमातून उपलब्ध होणार्या रक्कमेची कर्ज वितरणासाठी गरज याचे गणित नीट मांडणे आवश्यक आहे.
* ठेवी व कर्ज यांची योग्य सांगड –
मोठ्या प्रमाणावर ठेवी जमा होतात. ठेवींचा वाढीव आकडा अभिमानाने मान ताठ करतो हे खरे असले तरी जमा झालेली ठेव रक्कम कशा पद्धतीने विनियोगात येते? किती कालावधीत ही रक्कम कर्जासाठी वितरित होते याचं भान ठेवणे आवश्यक आहे. जमा झालेली रक्कम आयडल पडून राहणार नाही. कर्ज मागणी निर्माण करून योग्य कर्ज मागणी पूर्ण करण्यासाठी ही रक्कम विनियोगात येईल अशी व्यवस्था विकसित करणे आवश्यक असते. मोठ्या प्रमाणावर ठेवी जमा होऊ लागल्या की कर्ज वितरणाची निकड निर्माण होते आणि मग साधक बाधक विचार न करता, फिजिबिलिटी न तपासता कर्ज मंजूर केली जातात. पुढे योग्य फिजिबिलिटी नसलेली वितरित झालेली ही प्रकरणे थकबाकी वाढवतात आणि पैसा ब्लॉक होण्याचे दुष्टचक्र सुरू होते. एकदा थकबाकी, छझअ वाढला की नफ्यावर अतिरिक्त बोजा पडतो. तरतुदीची सूज आर्थिक पत्रकाला येते. कर्ज प्रकरण योग्य अभ्यास करून, योग्य कागदपत्रे, तारण मालमत्ता प्रामुख्याने परतफेड क्षमता पाहून देणे आवश्यक ठरते. कर्ज प्रकरणांची छाननी, कर्जदार, जामीनदार यांच्या जागृतपणे घेतलेल्या मुलाखती, कर्जदार, जामिनदारांची संकलित केलेली माहिती, कर्ज रकमेचा विनियोग नेमका काय तारण मालमत्तेची प्रत्यक्ष पाहणी या सर्वांवर आधारून अत्यंत डोळसपणे कर्ज मंजुरी आणि वितरणाची कार्यवाही झाली तर भविष्यातल्या अनेक कटकटी वाचतात. ठेव रक्कम मोठ्या प्रमाणात वाढत जाते. दुसर्या बाजूला थकबाकीही वाढती असते. मग खेळ सुरू होतो.
सी.डी.रेशो मेन्टेन करण्यासाठी ठेव उभारणी अधिक वाढवावी लागते. वाढती ठेव उभारणी फंड कॉस्ट वाढवत नेते. वाढती थकबाकी प्रत्यक्ष उत्पन्न घटवते आणि नफ्यावर दबाव वाढतो. हे सर्व टाळता येणे आवश्यक आहे. संस्थेने प्रत्येक वर्षी आपली उद्दिष्टे नक्की केली पाहिजेत. उद्दिष्टे ठरवतांना ती वास्तवाचा विचार करून ठरवली पाहिजेत. आर्थिक वर्षात किती ठेवी उभारायच्या? कोणत्या तिमाहीत कर्ज वितरणासाठी अधिक रक्कम लागेल? कोणत्या तिमाहीत पूर्वीच्या ठेवींची मुदत संपते आहे? सणासुदीचे दिवस कोणते आहेत? तसेच कोणत्या कालावधीत परिसरात जास्त पैसा असण्याची शक्यता आहे? याचा नीटपणे अभ्यास करून ठेव उद्दिष्ट ठरवले पाहिजे. वार्षिक ठेवींचे उद्दिष्टांची दर तिमाही उद्दिष्टात वर्गवारी केली पाहिजे. त्यानुसार ठेव संकलनाचे उत्तम कर्जदार पाहून कर्ज वितरणासाठी प्रयत्न केले पाहिजेत. अनिर्बंध पद्धतीने केवळ स्पर्धा म्हणून, मोठेपणा म्हणून एकाच वेळी भरपूर ठेव संकलित करणे हे आर्थिक हिताला छेद देणारे ठरू शकते. त्यापेक्षा सातत्याने प्रमाणबद्ध ठेव संकलन खूप उपयुक्त ठरते.
* ठेव व कर्जावरील व्याजदर नियंत्रित ठेवणे महत्त्वाचे –
संस्थेच्या ठेवींचा डोंगर वाढलेला दिसतो. मात्र पूर्ण बॅलन्सशीट पाहिली कि अनेक कच्चे दुवे दिसतात. प्रामुख्याने थकव्याज तरतूद वाढती दिसते. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट स्टेटमेंटला ठेवींवर द्यावे लागणारे व्याज आणि कर्जावर मिळणारे व्याज या रकमेत बरोबरी होण्यासाठी स्पर्धा दिसते. वसुलीवर होणारा खर्च वाढता दिसतो. गुंतवणुकांमध्ये होणारी वाढ खूप मंदावलेली जाणवते. उत्पन्न आणि खर्च यामधील अंतर कमी होत गेलेले दिसते. नफा घटतो म्हणजे केवळ ठेवी वाढवून अग्रनामांकन हे आर्थिक स्वास्थ्याचे लक्षण नाही. ठेव वाढीच्या प्रमाणात कर्ज आणि गुंतवणुकांची प्रमाणबद्ध वाढ, नियमित वसुली, ठेवीवर देय होणारे व्याज आणि कर्जावरील व्याज या रकमेत कर्जावरील व्याज अधिक दिसणे महत्त्वाचे ठरते. हे साध्य करण्यासाठी ठेवींवरील व्याज दर नियंत्रित हवेत. चढ्या दराने ठेवी स्वीकारल्यास आर्थिक पत्रकात ठेवींवरील व्याज खूप अधिक होते. त्यामुळे नफ्यावर दबाव वाढतो म्हणून पतसंस्थांनी ठेव संकलन हे सातत्यपूर्ण मात्र नियंत्रणात ठेवणे आवश्यक ठरते. नेमकी नैसर्गिक गरज किती ते पाहून कॉस्टचा विचार करून ठेव व्याजदर ठरवत योजना जाहीर केल्या पाहिजेत. एखादी तात्कालिक संधी साध्य करण्यासाठी विशेष बाब म्हणून ठेव व्याजदर वाढवता येतात. पण त्यासाठी डोळसपणे पॉलिसी तयार केली पाहिजे. वाढीव व्याजदराने जमा होणारी रक्कम कशी वापरणार? त्यावर परतावा किती कालावधीपासून मिळू लागणार हे सर्व तपासणे आवश्यक ठरते.
* ठेवींसाठी लागणारा योग्य कालावधी –
ठेव संकलित करताना ठेव कालावधीलाही महत्त्व आहे. ठेवी 1 वर्ष, 3 वर्षे, 5 वर्षे या मुदतीने सर्वसाधारणपणे उभारल्या जातात. ठेवींवरचे व्याजदर ठरवताना आर्थिक जगताचा अंदाज घेणे महत्त्वाचे ठरते. तसेच ठेवींमधून किती कालमर्यादेचे कर्ज वितरण होणार आहे, याचेही निकष ठरवणे महत्त्वाचे असते. नाहीतर कमी कालावधी असलेल्या ठेवींमधून दीर्घ मुदतीचे कर्ज अधिक प्रमाणात दिले गेले तर ठेव मुदत संपताना त्या ठेवी परत देण्यासाठी परत अतिरिक्त व्याजाने ठेवी जमवण्याचे आव्हान सामोरे येते. त्यामुळे ठेव कालावधी कर्ज परतफेडीचा कालावधी याचा साकल्याने अभ्यास करावा लागतो. ठेवींचे व्याजदर ठरवतांनाही हा मुद्दा विचारात घेणे श्रेयस्कर ठरते.
* सशक्त अर्थकारण व प्रमाणाबद्ध आणि सातत्यपूर्ण वाढ –
पतसंस्थांनी अर्थकारण सशक्त करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. केवळ ठेवींमध्ये वाढ हा सशक्तपणाचा मार्ग नाही. आर्थिक पत्रकांची प्रमाणबद्ध वाढ होणे याला महत्त्व दिले पाहिजे. अर्थकारण यशस्वी आणि सशक्त करायचे असेल तर अर्थचक्रातून योग्य प्रमाणात नफा झाला पाहिजे. नफ्यातून रक्कम स्वनिधी वाढवण्यासाठी वर्ग व्हायला पाहिजे. वेगवेगळे अनिवार्य निधी, तरतुदी करून सुद्धा नफा शिल्लक राहिला पाहिजे. त्यातून बाह्य देयता नसलेले निधी तयार झाले पाहिजेत. नफाखोरी करणे हा उद्देश नाही पण अर्थकारणात ठेवीदारांना न्याय द्यायचा असेल तर पैशाचा सर्वोत्तम सर्वोत्तम विनिमय करून नफा प्राप्त करावाच लागतो. संस्थेच्या अर्थकरणात केवळ ठेवी, केवळ कर्ज वाढवून चालणार नाही, तर प्रमाणबद्ध आणि सातत्यपूर्ण वाढ यासाठी प्रयत्न आवश्यक आहे.
पतसंस्थांची विश्वासार्हता वाढत असताना उत्साहवर्धक स्थितीचा लाभ घेण्यासाठी केवळ संख्यात्मक वाढीपेक्षा प्रमाणबद्ध, सातत्यपूर्ण, विश्वासार्ह प्रतिमा निर्माण करीत असलेल्या संधी साध्य करण्याची दूरदृष्टी वापरून मार्गक्रमण करूया.
– दीपक पटवर्धन, रत्नागिरी
*****